पाकिस्तानातून आलेल्या सिंधी लोकांमुळ कोल्हापूरची एक ग्रामपंचायत कोट्यवधींची उलाढाल करते

दिलावर राज्य करणार गाव म्हणजे कोल्लापूर. इथल्या लोकांचं काम आबन्ड असतंय. आता इतर भागातल्या लोकांना आबन्ड म्हणजे काय हे कळणार नाही. आबन्ड म्हणजे अफाट. म्हणजे नाद करावा तर कोल्हापूरकरांनी. इथली कुस्ती, इथला ऊस, इथला तांबडा पांढरा, इथली चप्पल, इथला महापूर, अहो अगदी इथल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुका देखील इतर ठिकाणच्या लोकांना चक्कर यायला लावतील अशा आबन्ड असतात.

अशीच कोल्हापूरची आणखी एक आबण्ड गोष्ट म्हणजे गांधीनगर

आता तुम्ही म्हणाल की गांधीनगर तर तिकडं गुजरातमध्ये आहे. तर त्यांचा आणि कोल्हापूरचा काय कनेक्शन. तर भावा त्यांचा आणि आपला काय कनेक्शन नाही. आपला असलाच तर कनेक्शन थेट पोलंडशी आहे. याच पोलन्डने कोल्हापूरला गांधीनगर दिलंय.

लै कन्फ्युज होऊ नका. सगळं इस्कटून सांगतो.

तर गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात होऊन गेलेल्या शाहूरायाने संपूर्ण देशाला राज्यकारभार कसा करायचा याची घडी घालून दिली होती. त्यांच्या आदर्शावर पुढच्या पिढ्यानी राज्य चालवलं. म्हणूनच कि काय दुसऱ्या महायुद्धात जेव्हा पोलंडच्या ज्यू लोकांवर हिटलरचे अत्याचार सुरु झाले तेव्हा ती मंडळी पळून भारतात आली तेही थेट कोल्हापूरला.

तत्कालीन छत्रपतींनी या लोकांना आपल्या संस्थानातील वळिवडे येथे वसवलं.

जवळपास ५००० पोलिश ज्यू भारतात कोल्हापूर संस्थांनमध्ये जवळपास सात वर्ष राहत होते. शेजारून वाहणारी पंचगंगा नदी, उसाची शेती, आल्हाददायक वातावरण यामुळे पोलिश लोक इथे चांगलेच रमले. त्यांची मुलं कोल्हापुरात शिकली, इथल्या पोरांबरोबर फुटबॉल खेळली. पुढे जेव्हा महायुद्ध संपलं तेव्हा हिटलरचा पराभव झाला यामुळे खुश होऊन आपल्या मातृभूमीला परत गेली.

नेमक्या याच काळात भारत स्वतंत्र झाला. दुर्दैवाने देशाची फाळणी झाली. इंग्रजांनी जाता जाता भारत पाकिस्तान हे दोन तुकडे केले. मग काय इकडचे मुसलमान तिकडं गेले आणि तिकडचे हिंदू, शीख भारतात आले. या स्थलांतरावेळी झालेल्या दंगलीत दोन्ही बाजूंची लाखो लोकं दगावली.

पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या हिंदूंमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण सिंधी लोकांचं होतं. सिंधू नदीच्या किनाऱ्यावर राहणारी हि व्यापारी मंडळी आपलं घरदार जमीन जुमला सोडून फटके कपडे, मोडलेला संसार घेऊन दंगलीच्या ताज्या जखमा सावरत भारतात आली. त्यांना वसवणे गरजेचं होतं.

त्यावेळी भारत सरकारने ठिकठिकाणी या सिंधि लोकांना जागा दिल्या.

कोल्हापूर संस्थानने निर्वासितांना आश्रय देण्याची परंपरा पुढे चालू ठेवली आणि पोलंडचे लोक गेल्यावर मोकळ्या पडलेल्या पोलिश कॅम्पची जागा सिंधींना दिल्या. वळिवड्याच्या त्या दगडी पोलिश बराकीतच सिंधी लोकांनी आपले संसार थाटले. फाळणीतून आलेल्या या शेकडो कुटूंबांना भारत सरकारने सहारा दिला.

या उपकाराची जाण म्हणून त्यांनी आपल्या वस्तीला नाव दिले

गांधीनगर

सिंधी लोक जात्याच व्यापारी बुद्धीची. मांजर जसं कितीही उंचावरून पडलं तरी ते आपल्या चारी पायांवर पडत तस सिंधी समजच आहे. सर्वात मोठ्या संकटातून बाहेर पडले होते, जेवणाखाण्याचे वांदे होते, काहीही भांडवल नव्हतं,  इथली भाषा ओळखीची नव्हती. तरीही त्यांनी जिद्दीने शून्यंप्सून सुरवात केली.

संकटातून बाहेर पडलेला सिंधी समाज एकमेकांना मदत करण्याचं महत्व जाणून होता. देशभरात पसरलेल्या या समाजाचे होलसेल मार्केट वर वर्चस्व होते. त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या बांधवांना आपला धंदा उभा करण्यास मदत केली. फक्त विश्वासाच्या बळावर माल दिला. गांधीनगर मध्ये छोटी मोठी दुकाने उभा राहिली. या निर्वासितांनी आपल्यावर ज्यांनी विश्वास टाकला त्यांचा भरवसा मोडू दिला नाही.

कष्टाने मेहनत करून त्यांनी आपले धंदे स्थिरस्थावर केले. लोकांची देणी मिटवली. सिंधी लोकांच्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ म्हणतात. त्यांनी मराठी शिकून घेतली, अगदी कोल्हापुरी शिव्या देत ग्रामीण भागातून आलेल्या पब्लिकला जिंकायचं कसब त्यांनी आत्मसात केलं. दुनियेच्या पाठीवर अशी कोणती गोष्ट नसेल जी गांधीनगर मध्ये मिळत नाही.

पश्चिम महाराष्ट्राचे उल्हासनगर अशी ओळख त्यांनी निर्माण केली.

बघता बघता गांधीनगर बाजारपेठ फुलून आली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं होलसेल मार्केट म्हणून गांधीनगर कडे पाहण्यात येऊ लागलं. बाहेरून आलेली  सुखवानी, पंजवानी, सावलानी, चंचलानी अशा आडनावाची लोकं इथं राज्य करू लागली.

इथे प्रत्येक दुकानदाराची मोठमोठी गोडाऊन आहेत. रेल्वे स्टेशनवर गाव असल्यामुळे दूरदूरच्या खेड्यातले दुकानदार आपला माल भरण्यासाठी गांधीनगरला येतात. महानगरपालिका हद्दीच्या बाहेर असल्यामुळे इथला माल अधिक स्वस्त मिळतो. कोल्हापूर पुणे पॅसेंजर गाडीतून अगदी पाच दहा रुपयात गांधीनगरला येणारे आणि स्वस्तातला माल आपल्या गावी घेऊन जाणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतील.

हिवाळ्यातळे स्वेटर, पावसाळी छत्र्या रेनकोटचा सीजन असो किंवा शाळा सुरु होण्याचा दफ्तर स्टेशनरी वाला सीजन. गांधीनगर च्या मार्केट मध्ये काय मिळतं नाही असं नाही. चीन अमेरिकेत तयार होणाऱ्या वस्तू गांधीनगर मध्ये देखील हमखास मिळतात असं बोललं जातं. प्रत्येक सीजन प्रमाणे आपलं नवीन रूप घेऊन गांधीनगर चकमत असतं.

मात्र किती जरी झालं तरी इथली मेन ओळख आहे तो म्हणजे गांधीनगरचा कापड बाजार

कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात होणाऱ्या लग्नांचा बस्ता गांधीनगर मध्ये बांधला जातो. अगदी नऊवारी पैठणी पासून ते आहेरात दिल्या जाणाऱ्या ब्लाउज पीस पर्यंत सगळ्या गोष्टी इथं अगदी स्वस्त दरात मिळतात. गांधीनगर पेक्षा स्वस्त जगाच्या पाठीवर कुठे मिळणार नाही असा इथल्या दुकानदारांचा दावा असतो.

दिवाळीच्या सीजन मध्ये गांधीनगर तर एखाद्या नव्या नवरीप्रमाणे नटलेले असते. इथल्या अगदी गल्ली बोळात जरी गेला आणि तिथल्या १० बाय १० च्या छोट्या दुकानदाराकडे चौकशी केली तरी त्याचा महिन्याचा गल्ला लाखो रुपयांचा तरी सहज असतो. 

गंमत म्हणजे दररोज करोडो रुपयांची उलाढाल करणारे हे गाव इतकं असूनही हि अजून ग्रामपंचायत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात श्रीमंत गावात साध्या साध्या सुखसोयी नाहीत. बघावे तेव्हा इथले रस्ते माल उतरवून घ्यायला आलेल्या ट्र्कमुळे जॅम झालेले असतात. पण इथल्या लोकांना ते सवयीचं झालेलं आहे.

इतक्या वर्षात अजूनही लोकांकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही. हे सातबारा नसलेलं गाव १५० प्रॉपर्टी कार्डवर ग्रामपन्चायत द्वारे चालवलं जातं.

दाटीवाटीने उभी असलेली घरे, दुकाने, प्रचंड वाढलेलं अतिक्रमण याचा भार ग्रामपंचायतीवर वाढत चालला आहे. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीच्या बाहेर असल्याचा गांधीनगरच्या दुकानदारांना फायदा होतो आणि त्यांचा माल त्यांना कमी दरात विकत येतो. म्हणूनच इथे नगरपालिका स्थापन केली जात नाही किंवा फक्त ५ किमीवर असलेल्या महानगरपालिकेत देखील समावेश केला जात नाही.

पण त्याचा परिणाम गावातली बकालपण वाढण्यात झाला आहे. या सगळ्यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांपूर्वी प्राधिकरणाची स्थापना झाली आहे आणि गांधीनगर व आसपासच्या श्रीमंत खेड्यांचा विकास योग्य दिशेने व्हावा यासाठी पावले टाकली जात आहेत.

गेल्या वर्षी आलेला महापूर, त्यानंतर सुरु झालेलं कोरोना संकट हे गांधीनगर बाजारपेठेची कंबर मोडणारे ठरले आहे. दोन अडीच वर्षे इथला कारभार ठप्प झाल्यात जमा आहे. मात्र कितीही मोठी संकटे आपली तरी इथला सिंधी समाज डगमगणारा नाही. कितीही उंचावरून फेका आपल्या चारी पायांवर उभ्या राहणाऱ्या मांजराप्रमाणे हा समाज सगळी संकटे पचवून पुन्हा उभा राहील यात शंका नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.