सायकलवरून पाव विकणाऱ्याचा ऑडी कारपर्यंतचा प्रवास

शिरोळ तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक शेतीने सधन झालेला भाग. कृष्णा पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यात काळ्या मातीने शेतकर्यांना भरभरून दिले. अख्ख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त उसाला उतारा इथे मिळतो. तर याच शिरोळ तालुक्यातील सर्वात सुपीक गावांपैकी एक म्हणजे नांदणी.

या नांदणीमध्ये मात्र ऊसापेक्षा भाजीपाला जास्त पिकतो. तोही एक्स्पोर्ट क्वालिटीचा. दररोज गावातून भाजीपाला भरलेले ट्रक देशभर जातात. एक काळ होता प्रत्येक गावकरी शेतीशी निगडीत व्यवसायाशी जोडलेला. कष्टाला हयगय न करणारे नांदणीकर शेतीमध्ये विक्रमावर विक्रम रचत होते.

मात्र पूर्णतः निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीचा भरवसा मात्र कोणीच देत नाही. कधी पंचगंगेला आलेला महापूर तर कधी अडत्यांनी पाडलेला दर यामुळे मोठा फटका कधी बसेल याची खात्री नाही. 

यामुळेच शेतकऱ्याची पुढची पिढी हळूहळू नोकरीच्या मागे लागली. घरची शेती संाभाळून महिन्याच्या महिन्याला हमखास पगार देणारी शिक्षकाची नोकरी तेव्हा हिट होती. गावात घरटी एक तरी मास्तर असायचाच. पोरग मास्तर झालं म्हणजे पार पडलं अस लोक म्हणायचे.

असच एक शिक्षकाच कुटुंब म्हणजे बाळासाहेब चकोते. शिक्षकाचे घर म्हटल्यावर एक सहाजिक अपेक्षा असते की पोरगं शाळेत हुशार पाहिजे. पण चकोते सरांचा मुलगा अण्णा म्हणजे वर्गात सगळ्यात टारगट म्हणून प्रसिद्ध. अभ्यास सोडून मित्रांना गोळा करून क्रिकेट शाळेतल्या निवडणुकावगैरे उद्योग चालायचे. जेमतेम बारावीपर्यंत पोहचला.

अण्णा चकोतेनी ठरवलं आता शिक्षण बास. आता पैसा कमवायचा. घराला हातभार लावायचा. 

पण हे कोणालाच आवडल नाही. गुरुजींचा मुलगा पण शिक्षण पूर्ण केलं नाही म्हणून जाईल तिथे टोमणे बसायचे. कुठल्यातरी सुतगिरणीत चिकटवायचं अस वडिलांनी ठरवलं पण मुलगा आपल्या म्हणण्यावर ठाम होता. नोकरी करायची नाही. स्वतःचा धंदा सुरु करायचा.

चकोते गुरुजींचा पोरगा वाया गेला म्हणून गाव भर चर्चा झाली.

स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा तर भांडवल पाहिजे. त्याकाळी शिक्षकाचा पगार खूप नसायचा. एकत्र कुटुंबाचा गाडा ओढे पर्यंत वडिलांना नाकीनऊ आलेल. मग त्यात उनाड मुलाला धंद्यासाठी पैसे कुठून देणार. त्यांनी नकार दिला. बेकारीमुळे मुलगा कुठल्यातरी वाम मार्गाला लागेल या भीतीने आईचा जीव तुटायचा. नवऱ्याच्या विरोधात जाऊन तिने अण्णाला सांगितलं,

“पिठाची गिरणी, मिरची कांडप असला धंदा सुरु कर. मी तुला मदत करेन”

त्यांच्या नावावर थोडीफार जमीन होती. त्यावर भूविकास बँकेकडून कर्ज मागितलं होतं. सुरवातीला तिथला मॅनेजर दारातही उभा करून घेत नव्हता. जामीनदार नव्हता. खूप पाठपुरावा केल्यावर कसबस २५ हजारांच कर्ज मिळालं. त्यातून पिठाची गिरणी आणि मिरची कांडप मशीन आणण्यात आली.

अण्णाच्या पाठीशी त्याचे पाच मामा खंबीरपणे उभे होते. पण लढायची खरी प्रेरणा आईमुळे मिळाली.

घरचं काम सांभाळून ती अण्णाच्या मिरची कांडप व्यवसायाकडे बघायची. अण्णा पिठाची गिरणी चालवत होता. या व्यवसायात नवीन असल्यामुळे चुका व्हायच्या. एकदा पीठ दळून गेलेला माणूस परत यायचा नाही. घरोघरी जाऊन हातपाय पडून लोकांना विनंती करावी लागत होती. पिठाचा धंदा काही गती घेत नव्हता. हे अपयश मात्र बरच काही शिकवून जाणार होतं.

पिठाची गिरणी चालत नसली तरी अण्णाचा खटपट्या स्वभाव स्वस्थ बसणाऱ्यातला नव्हता. जिकडे जाईल तिकडे नवीन व्यवसाय कोणता सुरु करायचा याचं विचारचक्र सुरुच असायचं. एकदा मावशीच्या गावी गेल्यावर स्टँडपासून घरी चालत जाताना खमंग असा वास आला. उत्सुकतेने बघित्ल्यावर पावाची भट्टी लावलेली दिसली. प्रत्येकवेळी मावशीच्या घरी जाताना अण्णा त्या भट्टीपाशी थांबून तिचं निरीक्षण करायचा.

“आपण देखील हा व्यवसाय सुरु केला तर चालेल.”

आज गल्लीबोळात बेकरी असते त्याप्रमाणे तेव्हा नव्हत. मुळात खेड्यात लोक भाकऱ्या सोडून ब्रेडबटर खाणे म्हणजे काही तरी पाप करतोय अशी भावना असणारे होते. मग पावाचा व्यवसाय चालणार काय? शिवाय हा व्यवसाय सुरु करायचा तर पाव बनवणारे कुशल कामगार हवेत, भांडवल हवं , जागा हवी.

वडिलांचा धंद्याला विरोध कायम होता. अजूनही नोकरी बघ असा त्यांचा लकडा सुरूच होता. 

 पण पावाच्या भट्टीने डोक्यात भट्टी पेटली होती.

जे होईल ते होईल म्हणत अण्णाने गावातल्याच सावकाराकडून १५-२० हजाराच कर्ज घेतल. गिरणीच्या धंद्यात केलेल्या प्रामाणिकपणामुळे यावेळी एक जामीनदार देखील पाठीशी उभा राहिला. आपल्याच गिरणीच्या शेडमध्ये भट्टी उभा केली. मशीन नव्हते, कामगारही नव्हता मग स्वतःच हाताने जमेल तस पीठ मळून बनपाव वर्की बनवायला सुरवात केली.

अखेर त्याच्या कष्टाला फळ मिळाल. एक कामगार मिळाला. धंद्यातील खाचखळगे त्याच्याकडून शिकत अण्णानी सुरवात केली.

दररोज पहाटे पाच वाजता अण्णा स्वतः भट्टी पेटवायचे. ५० किलो मैदा आणि 3-४ लिटर तेल घेवून ६००-७०० रुपयांचा माल बनवायचे. हा तयार झालेला माल विकायला न्यायला स्वतःची दुचाकी देखील नव्हती. सायकलवरून आसपासच्या गावात फिरून अण्णा पाव विकू लागला.

नुकताच झालेल्या जागतिकीकरणाचे इफेक्ट छोट्या छोट्या गावात दिसू लागले होते. ब्रँडेड कंपन्याचे बिस्कीट गावातल्या दुकानातही मिळू लागले होते अशा वेळी सायकलवर बसून पाव विकणाऱ्या मुलाकडून कोण माल घेणार? तरी त्याची जिद्द कायम होती. जवळपास ३ वर्ष हे चालू होतं.

हळूहळू पावाच्या क्वालिटीमुळे अण्णाच नाव होऊ लागलं. चार पैसे हातात येऊ लागले.

पोराचे कष्ट बघून अखेर वडिलांच्या काळजाला पाझर फुटला. त्यांनी आपल्या शिक्षक बँकेतून काही कर्ज काढल आणि अण्णाला दिल. अण्णाने सर्वात आधी एक मिक्सिंगच मशीन घेतल. त्यापाठोपाठ एक एम-८० गाडी घेतली. धंद्यातला पैसा धंद्यातच गुंतवायचा हे गणित संभाळल. कामगार वाढवले. व्याप वाढला.

आता अख्ख्या तालुक्यात गाडीला पावाची पिशवी अडकवलेली अण्णाच्या M-८०ची स्वारी दिसू लागली.

व्याप वाढला तसा प्रश्नदेखील वाढले. अनेक दुकानदार उधारीवर माल घ्यायचे. त्यातले बरेच उधारी चुकवायचेच नाहीत. कर्जाचे हप्ते तटू लागले. बाप परत आपल्या पोराच्या मागे उभा राहिला. परत बँकेतून कर्ज काढल. आईवडील दोघे पिठाची चक्की सांभाळू लागले. अण्णा पूर्णवेळ पावाच्या भट्टीमध्ये राबू लागला. पुढे एकाच्या पाच भट्ट्या उभ्या केल्या. वर्की बनपाव बरोबर बिस्कीट ब्रेड वगैरे माल बनवण्याचा प्रयत्न सुरु केला

काळ सरकत होता तस अण्णाच बघून आसपासच्या गावात अशाच भट्ट्या उभ्या राहत होत्या पण त्यापुढे त्यांना जायचं नव्हत. अण्णाचे स्वप्न मोठे होते.

त्याला जाणवल की आपण पण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. नवीन नवीन ब्रांडेड मालाच्या तोडीस तोड माल आपण बनवतो. मग तस मार्केटिंगसुद्धा करायला काय हरकत आहे? गावात रहात असण्याच्या तोट्यापेक्षा एक मोठा फायदा होता की तिथल्या लोकांना नेमक काय हव याची माहिती होती. शहरात आपला निभाव लागणार नाही यात शंका नव्हती. मग मुख्य टार्गेट ग्रामीण भागाला करायचं ठरल. एम८०च्या जागी एका छोट्या रिक्षातून माल विकण्यासाठी बाहेर जाऊ लागला.

मार्केटिंगची सुरवात करायची तर ब्रँडला नाव पाहिजे. अण्णा आजोबांचा लाडका होता. त्यांच्या आठवणीवरून नाव देण्यात आलं,

“गणेश बेकरी”

१९९८-९९ साल आयुष्याला कलाटणी देणार ठरलं. अण्णांनी खूप दिवस बेकरी उद्योगात ओव्हन मशीनबद्दल ऐकल होतं. त्या मशीनची माहिती घेण्यासाठी बेळगाव, हुबळी, पुणे मुंबई वाऱ्या केल्या होत्या. सगळी माहिती काढली होती. प्रोजेक्टला  १५ लाख खर्च येणार होता. अण्णांनी धाडस करायचं ठरवलं. सर्वात आधी जमेल तशी काटछाट करून प्रोजेक्ट 10 लाखावर आणण्यात आला. सुदैवाने बँक ऑफ बडोदा कर्ज देण्यास तयार झाली.

थेट जर्मनीमधून नांदणीमध्ये मशिनरी आली.

ते मशीन चालवण्याच प्रशिक्षण अण्णांनी स्वतः घेतल, कामगारांना दिलं. खारी, बिस्कीट, ब्रेडच दर्जेदार उत्पादन सुरु झालं. मशीन आल्यावर सहाच महिन्यात प्रोडक्शन कित्येक पटीने वाढलं. ग्राहकांचा प्रतिसाददेखील वाढला. मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा आवाक्यात आली.

रिक्षाच्या जागी एक टेम्पो आला. नवनवीन प्रयोग करत राहणे थांबवल नाही. अपडेट राहण्याची वृत्ती अण्णांना इतरांपासून वेगळ बनवत होती.

काही दिवसातच नांदणीच्या माळभागावर दिमाखात गणेश बेकरीची फॅक्ट्री उभी राहिली. बेकरी वाल्या अण्णाचा अण्णासाहेब चकोते झाला. जे लोक वाया गेला म्हणून नावे ठेवत होते ते लोक पोराला बेकरीत नोकरीवर घ्या म्हणून भेटायला येऊ लागले.

हजारो हातांना काम दिल. फक्त शेतीवर अवलंबून असणारे नांदणी परिसरातील मुले बेकरीमध्ये कामाला लागली. भाजीपाल्याच्या ट्रकसोबतच गणेश बेकरीच्या मालाचे ट्रक नांदणीतून महाराष्ट्रभर फिरू लागले.

आज अशी वेळ आहे की अख्ख्या राज्यभर कानाकोपऱ्यातल्या गावात देखील स्टडवरच्या बेकरीमध्ये गणेश बेकरी नांदणीचे प्रोडक्ट हमखास मिळतात. गणेश बेकरी म्हणजे गुणवत्ता हे समीकरण झाल्यामुळे लोक डोळे झाकून ते विकत घेतात. आपल्या पैकी अनेकांनी रेडियोवर गणेश बेकरी नांदणीची जाहिरात ऐकली असेल, त्याचे प्रोडक्ट खाल्ले असतील.

अण्णासाहेब चकोतेंच्या बेकरीमुळे नांदणी गावाला महाराष्ट्रात नवी ओळख मिळाली.

 नांदणीमधल्या फक्ट्रीच्या यशानंतर अण्णासाहेब चकोतेंनी शेकडो किलोमीटर दूर असलेल्या मराठवाड्यात लातूरमध्ये गणेश बेकरीचे दुसरे युनिट सुरु केले. त्याच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून ते गोपीनाथ मुंडे, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी अशा अनेक नेत्यांची मांदियाळी जमली.   

आज करोडोंची किंमत असणाऱ्या चकोते ग्रुपचे ते मालक आहेत. बेकरी उद्योगाचा सम्राट म्हणून ओळख मिळाली आहे. एकेकाळी सायकलवरून पाव विकण्यापासून सुरु झालेला प्रवास गावातल्या घरासमोरच्या ऑडी कारपाशी पोहचला आहे.  महाराष्ट्र शासनाचा यशस्वी उद्योजक म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. ठिकठिकाणी समाजउपयोगी कामे सुरु आहेत. शेतकऱ्याचा हा नातू सेंद्रिय शेतीचे प्रयोग देखील करतोय.

शिक्षकाचा वाया गेलेला कॉलेजदेखील पूर्ण न करू शकलेल्या अण्णासाहेब चकोतेंच्या नावाने एक अद्यावत सीबीएसई स्कूल चालते. आपल्या छोट्या खेड्याला देशाच्या नकाशावर ओळख मिळवून दिली आहे यापेक्षा मोठे यश ते काय असेल?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.