निवडणुकीसाठी पक्षाला १ कोटींचा निधी गोळा करून दिला पण म्हणून मुख्यमंत्रीपद मिळालं नाही…

साधारण १९९० सालची गोष्ट असेल. शिवसेना भवनात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग बसली होती. येत्या निवडणुकीसाठी तयारी कुठं पर्यंत आली याची चाचपणी सुरु होती. रामजन्म भूमीचे आंदोलन, काँग्रेस वर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे संपुर्ण देशातील वातावरण ढवळून निघालं होतं. नव्यानेच झालेली शिवसेना भाजप युती जोरदार लढत द्यायची म्हणून सज्ज झाले होते.

 सेनेची लोकप्रियता जरी त्याकाळी वाढत साली तरी तेव्हा तो आकाराने लहान पक्ष होता. राज्यभरात त्यांचे उभे राहणारे उमेदवार पैशाच्या बाबतीत कमजोरच होते.

त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाला निवडणूक निधीची किती आवश्यकता आहे हे सांगितलं आणि ज्या ज्या नेत्यांना शक्य आहे त्यांनी स्वतः प्रयत्न करून किती निधी गोळा करता येईल हे विचारलं..

छगन भुजबळ, मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर असे एकाहून एक दिग्गज शिवसेना नेते हजर होते. त्यांनी प्रत्येकी पाच लाख, दहा लाख असा आकडा सांगितला. बाळासाहेब प्रत्येकाला विचारत होते आणि अचानक सर्वात मागच्या खर्चीतुन एक हात वर झाला,

“मी १ कोटी रुपये निवडणूक निधी आणतो.”

सगळेच चाट पडले. त्याकाळच्या मानाने १ कोटी हा प्रचंड मोठा आकडा होता. कित्येकजण उत्सुकतेने पाहत होते की हा गडी कोण?

तो शिवसैनिक होता नवी मुंबईचा वाघ गणेश नाईक 

१५ सप्टेंबर १९५० रोजी ठाणे जिल्ह्यातल्या खैरणे-बोनकोडे गावात जन्मलेल्या गणेश नाईक यांचा सार्वजनिक जीवनातला वावर ऐंशीच्या दशकात सुरू झाला. पनवेलजवळच्या रिलायन्स कंपनीत युनियन लीडर म्हणून काम करत असताना आक्रमक कामगार नेता म्हणून ते उदयास आले.

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ात येणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी ते झगडत होते. नेमकी याच काळात शिवसेना मुंबईच्या बाहेर आपले पंख विस्तारित होती. त्याकाळच्या अनेक मराठी तरुणांप्रमाणे गणेश नाईक देखील शिवसेनेकडे आकर्षिले गेले.

पुढे त्यांनी श्रमिक सेना या कामगार संघटनेची पाळेमुळे सर्वदूर रोवली. ३५० पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये श्रमिक सेनेचा भगवा फडकला. यात रायगड जिल्ह्यातील रिलायन्ससारख्या कंपनीचाही समावेश होता. युनियन लीडर म्हणून रिलायन्सचे सर्वेसर्वा धीरूभाई अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या अधिक जवळ गेले.

बाळासाहेबांचे लाडके शिवसैनिक साबीरभाई शेख यांच्या सोबतीने त्यांनी पक्ष रुजवला. १९९० साली ते पहिल्यांदा सेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले.

जेव्हा त्यांनी पक्षाला १ कोटी निधी देणार म्हणून घोषणा केली तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. इतर नेत्यांचा प्रचंड जळफळाट झाला. मात्र, त्याची तमा न बाळगता नाईकांनी आपल्या युनियनच्या माध्यमातून एक कोटी रुपये शिवसेनेला गोळा करून दिले.

एवढेच नव्हे तर बाळासाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६० रुग्णहिका वाटण्याचा संकल्प सोडून पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध भागात देण्यासाठी ४४ रुग्णवाहिकांचे लोकार्पण बाळासाहेबांच्या हस्ते केले.

साधारण याच काळात छगन भुजबळ पक्ष सोडून बाहेर पडले. कित्येकांना वाटलं होतं कि ओबीसी नेते असलेले गणेश नाईक देखील सेनेतून बाहेर पडतील पण तस झालं नाही. ते पक्षातच राहिले आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम करू लागले. बाळासाहेबांनी त्यांना विधिमंडळात शिवसेनेचा गटनेता बनवलं.

शिवसेनाप्रमुखांचा गणेश नाईकांवरील वाढता विश्वास पाहून पक्षातील त्यांच्या विरोधकांनी मोहीम तीव्र केली. 

अशातच १९९२-९३ च्या दंगलीत मुंबईत जळत असतांना तिची जुळी बहिण समजली जाणारी नवी मुंबई मात्र शांत होती. इकडे अनेक मुस्लिम बांधव बिनधास्तपणो रस्त्यांवर नमाज पढत होते. याचे श्रेय गणोश नाईकांनाच दिले गेले. यावरून सेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर मोठी टीका सुरु केली. ठाण्यातील एका बड्या शिवसेना नेत्यांने त्यांना बांगडय़ांचा आहेर पाठविल्याचे सांगितले गेले.

यानंतर मात्र, शिवसेनेतील ज्येष्ठांकडून त्यांची नाकेबंदी सुरू झाली. बाळासाहेबांची त्यांच्यावरील मर्जी कमी झाली. १९९५ सालच्या निवडणुकीत गणेश नाईक मोठ्या बहुमताने निवडणून आले. त्याच निवडणुकीत शिवसेनेकडे मुख्यमंत्री आलं. विधानसभेवर भगवा झेंडा फडकला. 

गणेश नाईकांना अपेक्षा होती की आपण सेनेचा गट नेता असल्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रीपद देण्यात येईल. पण  नेतृत्व सोडाच परंतु, त्यांचा मंत्रिमंडळातही समावेश झाला नाही. नंतर त्यांना पर्यावरण आणि वनमंत्री हे दु्य्यम खाते देण्यात आले. तिथेच गणेश नाईकांच्या मनात असंतोषाची ठिणगी पेटली.

राज्यस्तरावर नाही तर स्थानिक पातळीवर देखील पक्षातून त्यांची गळचेपी सुरु झाली.

महापालिकेत सत्ता असूनही त्यांचं म्हणणं डावललं जाऊ लागलं. गणेश नाईकांनी याविरुद्ध आवाज उठवला. अखेर बाळासाहेबांनी त्यांच्या कडे राजीनामा मागितला. तेव्हा नाईकांनी थेट माझी चूक काय आहे ते आधी सांगा मगच राजीनामा देतो, असे थेट आव्हान बाळासाहेबांना दिले.

बाळासाहेबांना असे आव्हान पहिल्यांदाच कुणी तरी दिले होते. यामुळे त्यांची मंत्रिमंडळाकडून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हकालपट्टी केली. हीच संधी साधून चाणाक्ष शरद पवार यांनी गणेश नाईकांना आपल्या गोटात ओढले. पुढे १९९९ साली गणेश नाईकांना त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभं केलं मात्र  बेलापुरातून आनंद दिघे यांनी अत्यंत नवख्या अशा सीताराम भोईर यांना उभं केलं आणि गणेश नाईक पराभूत झाले.

मुख्यमंत्रीपदाच्या ताकदीचे समजले जाणारे महत्वाकांक्षी गणेश नाईक यांच्या कारकिर्दीला इथून मोठा सेटबॅक बसला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.