सगळं जुळून आलं असतं तर श्रीयुत गंगाधर टिपरे स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते.

श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका कोण विसरेल? दिलीप प्रभावळकर यांच्या रंगवलेल्या गोड आजोबांनी म्हणजेच आबांनी मराठी टीव्हीवर धुमाकूळ घातला होता.

या सिरियलची मुख्य कथा दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या लोकसत्ता दैनिकात प्रसिद्ध होणार्‍या सदरांवर आधरित होती. टिपरे कुटुंबात घडणार्‍या दैनंदिन घटना या ह्या सदराचा आधार होता. पुढे ह्या सदरांचे ‘अनुदिनी’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

तेव्हा अजून नवोदित असलेला दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रभावळकर यांना या पुस्तकावर सिरीयलसाठी गळ घातली.

दिलीप प्रभावळकर तयार झाले मात्र त्यांनी या सिरीयल मध्ये अभिनय करण्यास नकार दिला होता. पण केदारच्या अनेक विणवण्यानंतर ते आबांची भूमिका करण्यास तयार झाले.

शेखर-श्यामल टिपरे हे मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय चाकोरीबद्ध जोडपे, त्यांचा क्रिकेटर होण्याची स्वप्ने पाहणारा शिऱ्या हा मुलगा तर मॉडेल होण्याची स्वप्ने पाहणारी शलाका ही मुलगी आणि तोंडाचे बोळके झालेले गंगाधर टिपरे उर्फ आबा म्हणजे प्रचंड खेळकर आजोबा.

तुमच्या आमच्यासारखे पगारातून महिनाभराचा खर्च काटकसरीने करणारं साधसुध कुटुंब. त्यांच्या दैनंदिन गंमतीजमती त्यातून निर्माण होणारा सदाबहार विनोद एवढीच या सिरियलची कथा होती.

संपूर्ण टिपरे फॅमिली अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी बनली होती मात्र सगळ्यात खास होते आबा.

आपल्या नातवंडांना समजून घेणारे, या वयातही आपला प्रेमळ धाक शाबूत ठेवून असलेले, प्रॅक्टिकल, समंजस, चिरतरुण आजोबा ५६ वर्षांच्या दिलीप प्रभावळकर यांनी ताकदीने उभे केले.

दात असतानाही बोळकं दाखवणं हे खूपच कठीण. नुसतं दिसणंच नाही तर हावभाव, देहबोली यातून त्यांनी खूप छान आबा साकारले. विनोद हे किती सहज असतात, हे या मालिकेतून समजतं.

कोणावरही टीका न करता प्रत्येक घटनेवर मार्मिक भाष्य या मालिकेतून केले गेले.

संपूर्ण कुटूंबाला बसून पाहता येणारी ही मालिका जवळपास ४ वर्षे चालली. गंगाधर टिपरेंची लोकप्रियता शिखरावर होती.

अशातच एक दिवस दिलीप प्रभावळकर यांना एक फोन आला. एक अमेरिकन वळणाच इंग्लिश बोलणारी महिला होती. तिने प्रभावळकर यांना एका हॉलिवूडच्या सिनेमासाठी ऑडिशन देणार का अस विचारलं. दिलीप प्रभावळकर यांनी सिनेमा बद्दल विचारलं.

तो स्पिलबर्ग यांचा सिनेमा होता, हिरो होता टॉम हँक्स.

विमानतळावर अडकलेला, तिथे बेकायदेशीररित्या राहणाऱ्या माणसाची ही गोष्ट. विमानतळावर स्वच्छतेच काम करणाऱ्या व त्या अडकलेल्या माणसाला मदत करणाऱ्या गुप्ता नामक म्हाताऱ्या भारतीय माणसाचा रोल प्रभावळकर यांना ऑफर झाला होता.

प्रभावळकर यांना फोन करणारी ती महिला होती लवलीन टंडन.

तिने यापूर्वी मीरा नायर यांच्या हॉलिवूड सिनेमासाठी असिस्ट केलेलं. याशिवाय तिथे ती कास्टिंग डिरेक्टरच काम करत होती. स्पिलबर्गच्या सिनेमासाठी ८६ वर्षीय भारतीय माणसाची भूमिका शोधण्याचं काम तिलाच मिळालेलं.

या लवलीन टंडनने दिलीप प्रभावळकर यांच्या टिपरे, गुब्बारे या सिरीयल पहिल्या होत्या. त्यांची वेबसाईट पाहिली होती. सगळी माहिती काढली होती. ती त्यांना म्हणाली,

“आय एम रियली इम्प्रेसड. यु आर सो डिफ्रंट इन इच ऑफ युवर रोल्स.”

दिलीप प्रभावळकर यांनी जेव्हा स्पिलबर्गचा सिनेमा हे शब्द ऐकले तेव्हा त्यांना आपले हात स्वर्गाला टेकल्याप्रमाणे वाटलं.

जॉर्ज, ज्यूरासिक पार्क पासून सेव्हिंग प्रायव्हेट रायन प्रमाणे लिजेंडरी सिनेमे डोळ्यासमोरून गेले. स्पिलबर्ग हा तेव्हाचा जगातलं सर्वोत्तम दिग्दर्शक होता.

दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट्च होता. त्यांनी जोर लावून ऑडिशन द्यायचं ठरवलं. फॅक्सने त्यांना स्क्रिप्ट पाठवण्यात आली. प्रभावळकर तेव्हा शूटिंगच्या निमित्ताने मुंबईच्या बाहेर होते. रातोरात बसने ते परत आले.

केदार शिंदेला फोन करून गंगाधर टिपरेंच्या भूमिकेसाठी वापरत असलेला विग, चौदा नंबरचा चष्मा वगैरे मागवून घेतलं.

माहिमला बॉम्बे स्कॉटिश स्कुलसमोर एका फ्लॅटमध्ये डिजिटल कॅमेऱ्यासमोर ऑडिशन घेण्यात आलं.

एकदा विग लावून, एकदा चष्मा लावून म्हाताऱ्याच्या बेअरिंगमध्ये समोर टॉम हँक्स आहे असं समजून प्रभावळकर यांनी ते इंग्लिश संवाद बोलून दाखवले. लवलीन टंडन खुश झाली. तो ऑडिशन जबरदस्त झाला होता.

प्रभावळकर यांना तुम्ही नक्की सिलेक्ट व्हाल अस सांगितलं.

सोळा आठवड्याच्या शूटिंग साठी लॉस एंजलीसला एक सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार वगैरे फॉर्मलिटी समजावून सांगितल्या. दोन आठवड्यात निर्णय कळवला जाणार होता.

दुर्दैवाने थोड्या दिवसाने प्रभावळकर यांना तुमची निवड झाली नसल्याचं कळवण्यात आलं.

कारण होतं की ते त्या रोलसाठी वयाने खूप तरुण होते. द टर्मिनल या सिनेमात टॉम हँक्स बरोबर गुप्ताच्या रोलसाठी खरोखरच्या एका ८६ वर्षाच्या म्हाताऱ्याला निवडण्यात आलं. तो ऍक्टर नव्हता पण त्याच दिसणं करेक्ट होतं.

स्टीव्हन स्पिलबर्गच्या हॉलिवूड सिनेमामध्ये टॉम हँक्स सारख्या दर्जेदार अभिनेत्यासोबत काम करण्याची एका मराठी माणसाची संधी हुकली.

सगळं अगदी जुळून आलं असतं तर श्रीयुत गंगाधर टिपरे हॉलिवूडमध्ये दिसले असते.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. अवि says

    जो नवीन माणूस घेतला तो अभिनेता नवता हे वाक्य चुकीचं आहे, त्यांचं नाव कुमार पल्लना आहे.

    https://en.m.wikipedia.org/wiki/Kumar_Pallana

  2. नितीन शुक्ल says

    सिनेमा फारच सुंदर होता, मी जेव्हा जेव्हा स्टार किंवा इतर इंग्लिश चॅनेल वर लागायचा तेव्हा आवर्जून पाहायचो। धन्यवाद।

Leave A Reply

Your email address will not be published.