शाहू महाराजांनी हॉटेल काढून दिलेल्या गंगाराम कांबळेच पुढं काय झालं…?

गंगाराम कांबळे फक्त एक हॉटेल चालवणारे व्यक्ती नव्हते तर कोल्हापूर संस्थानातील दलित चळवळीचे अध्वर्यू होते. 

शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी कायदे केले. आपल्या संस्थानात अस्पृशता बंदी आणली. त्यांनी गंगाराम कांबळे या व्यक्तिस हॉटेल काढून दिले. इतकेच नाही तर भाऊसिंगजी रोडला गंगाराम कांबळेने काढलेल्या हॉटेलवर महाराज स्वत: चहा पीत असत.

अनेकांनी अगदी लहानपणापासून वाचलेली, ऐकलेली ही गोष्ट. या गोष्टीतले शाहू महाराज आपणा सर्वांच्या परिचयाचे मात्र गंगाराम कांबळे कोण होता, त्याचं पुढे काय झालं याबद्दल काहीचं माहिती नसते. त्यासाठीच हा लेख. कारण,

गंगाराम कांबळे फक्त एक हॉटेल चालवणारे व्यक्ती नव्हते तर कोल्हापूर संस्थानातील दलित चळवळीचे अध्वर्यू होते. 

गंगाराम कांबळे यांचा जन्म १८९७ सालचा. त्यांच्या बायकोचे नाव रखमाबाई. गंगाराम कांबळेचं लिहता वाचण्यासारखं शिक्षण झालं होते. गंगाराम कांबळे हा महाराजांच्या सरकारी पागेतील मोतद्दार होता. नवीन राजवाड्याजवळ घोड्यांच्या तबेल्यात महार मोतद्दारांची संख्या मोठी होती. हे सर्वजण घोड्यांची निगा राखत. 

असाच एक उन्हाळ्याचा दिवस होता.

दूपारच्या जेवणासाठी सर्व कर्मचारी न्याहारी उघडून जेवणासाठी बसले होते. मात्र पाणीच नव्हते. बिनापाण्याची भाकरी खाणं अशक्य झालं. हौदावर जावून नळ सोडावा तर आपण जातीने महार. त्यामुळे मोतद्दार शांत बसून होते. गंगाराम कांबळेने धाडस केलं आणि हौदावर जावून त्याने नळ सोडला.

गंगाराम कांबळेने नळ सोडला तसे सवर्ण हिंदू लोकांनी दंगा करण्यास सुरवात केली. महाराने हौद विटाळला म्हणून गलका सुरू झाला. सर्व सवर्ण गोळा झाले. नेमक्या या क्षणी शाहू महाराज दिल्लीला गेले होते. सवर्णांनी चाबूक घेवून गंगारामची पाठ फोडून काढली. गंगाराम रक्तबंबाळ होवून पडला.

त्यानंतर शाहू महाराज कोल्हापूरात आले. शाहू महाराज आल्याची वर्दी मिळताच गंगाराम कांबळे शाहू राजांना जावून भेटला. झालेला प्रसंग सांगून त्याने आपली पाठ दाखवली. महाराजांनी त्यांची रक्तबंबाळ पाठ पहाताच सर्व मारेकऱ्यांना बोलवण्याचे आदेश दिले.

महाराजांनी स्वत: हातात हंटर घेतला आणि मारेकऱ्यांच्या पाठीवर हंटरचे तडाखे दिले. 

महाराजांनी लागलीच आदेश दिला,

सरकारी कॅपातील कुठल्याही विहरीवर हौदावर कोणीही पाणी भरताना कुठल्याही सबबीवर मज्जाव करता येणार नाही. त्याचे क्षणी महाराजांनी एक वटहूकूम काढून सार्वजनिक विहरी, नळ, पाणवठे सर्व जातीधर्मांसाठी खुले केले. जर कुणी उच्चनिच केले तर तो दंडनीय अपराध ठरवला.

या घटनेनंतर सवर्ण शांत बसणं शक्य नव्हतं.

महाराजांनी गंगाराम कांबळेच्या पाठीवर हात ठेवला होता. याच गंगाराममुळे आपल्याला मार खावा लागल्याचा राग सर्वणांना होता. त्यातून गंगाराम कांबळेवर चोरीचा आळ घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महाराजांच्या इन्फंट्रीत संतराम नावाचा शिपाई होता. त्याला जुगाराचा नाद होता. तर याच इंन्फंट्रीत किसन नावाचा कोचमन होता. त्याच्या कामावर खूष होवून शाहू महाराजांनी त्याला जरीचा फटका आणि काही रुपये बक्षिस दिले होते. जुगारी असणाऱ्या संतरामने ते पैसे चोरले. मात्र ही संधी साधून मारेकऱ्यांनी गंगाराम कांबळेवर चोरीचा आळ घेण्याचा कट घेतला.

विरोधक जागे झाले आणि  त्यांनी गंगाराम कांबळेवर चोरीचा आळ घेवून मारहाण करण्यास सुरवात केली.

गंगाराम काकुळतीला ऐवून म्हणत होता अहो नाही चोरले पैसे पण गर्दी त्याचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. गर्दीला एकजण म्हणाला हौदाला हात लावतो, वरतून महाराजांना सांगतो. थांब. तेव्हा गंगारामला चोरीचा आळ घेण्यामागचं राजकारण समजून आलं. अंगावरचे कातडे सोलून निघण्यापर्यन्त त्याला मारहाण करण्यात आली आणि पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलं. गंगारामची अवस्था पाहून पोलिस प्रमुख फर्नांडिस आणि फौजदार म्हैसकर यांना दया आली व त्यांनी गंगारामला सोडून दिले.

यावेळी घटनेवेळी महाराज दिल्लीत व्हॉयसरॉयच्या भेटीसाठी गेले होते. मारेकऱ्यांनी डाव साधून चोरीचा आळ घेतला होता.

महाराज दिल्लीवरून येवून सोनतळीला गेले होते. गंगाराम आपल्या सहकाऱ्यांसोबत महाराजांना भेटण्यासाठी गेला व तिथे घडलेला प्रकार सांगितला. गंगारामची पाठ पाहून महाराज गलबलून गेले. त्यांनी गंगारामच्या पाठीवरून हात फिरवला व त्यास म्हणाले, जा तुला नोकरी माफ केली. तू कोणताही स्वतंत्र धंदा कर मी मदत करतो.

पाण्याच्या हौदाला शिवल्यानंतर हे रामायण झाले, म्हणून महाराजांनी गंगारामला स्वतंत्र धंदा सुरू करण्यास सांगितलं. योग्य ते भांडवल दिलं व त्यातूनच सत्य सुधारक हॉटेल नावाचे सुसज्ज विश्रांतीगृह टाऊन हॉलच्या आग्रेय कोपऱ्यावर भाऊसिंगजी रोडला उभारण्यात आलं.

भर वस्तीत अस्पृशाचं हॉटेल कसं चालतं हे पहायला सवर्ण मंडळी तयार झाली… 

हे हॉटेल कसं चालणार हा प्रश्नच होता. मात्र समाजसुधारक मंडळी मुद्दाम इथे जावू लागली. गंगारामने इथे ठेवलेली स्वच्छता व टापटिपीचे कौतुक होवू लागले.  पांढऱ्याशुभ्र कपड्यात भगवा फेटा बांधलेल्या गंगाराम व त्यांचे महार समाजातील सहकारी सेवा देवू लागले.

विशेष म्हणजे रोज चहा घेण्यासाठी महाराजांचा रथ इथे थांबू लागला. स्वत: महाराज हॉटेलबाहेर थांबून गंगाराम चहा अशी ऑर्डर देत आणि गंगाराम बटलरी थाटात चहाचा ट्रे भरून रथावर पोहचवत असतं. ट्रे मिळताच महाराज स्वत:च्या हाताने आपल्या सहकार्यांसाठी चहाचा कप भरत. महाराज चहा देवू करत असल्याने विटाळ मानणाऱ्या लोकांना देखील तो नाकारता येत नव्हता.

गंगाराम कांबळे फक्त आपल्या व्यवसायापुरता मर्यादित राहिला नाही तर शाहू महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालू लागला. तो महार मांग मातंग समाजील व्यक्तिंसाठी सामाजिक कार्यात सक्रिय झाला.

पुढे शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेच काम पाहून समाजाच्या उपदेशाकरिता दिनांक १६ ऑगस्ट १९२१ रोजी एक हूकूम काढून गंगाराम कांबळे, पंजाब ईश्वरा नालबंद, बळवंत शिंगे, परशुराम कांबळे, आप्पाजी मंडपाळे यांना दोन महिन्याची रजा मंजूर करुन लोकांना उपदेश देण्यासाठी यांनी फिरावे असे सांगण्यात आले.

ठरल्याप्रमाणे या महार समाजातील लोकांमध्ये क्रांतीची मशाल पेटवली. अस्पृश्यता निवारणाचे महत्व पटवून सांगितले. अन्यायाची भाषा खोलवर रुजवली म्हणून महाराजांनी प्रत्येकी ४० रुपये तसेच दरसाल २०० रुपये लागत होणारी जमीन देण्याचे मंजूर केले. पुढे जावून छ. राजाराम महाराजांनी गंगाराम कांबळे व सहकाऱ्यांना मौजे कोथळी फाटा येथे ही जंमीन दिली.

सत्यप्रसारक मंडळाची स्थापना. १९२०-२१ 

महाराजांचा ड्रायव्हर असणारा यल्लापा बेडकीहाळकर यांनी दलित उद्धारासाठी संस्था काढण्याची कल्पना गंगाराम कांबळे यांना सांगितली. महार समाज व मातंग समाज यांच्यात देखील एकी नाही. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतले आपआपसातले मतभेद संपून ऐकी निर्माण व्हावी हा विचार गंगाराम कांबळेने शाहू महाराजांना बोलून दाखवला.

शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे व त्याच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून या संस्थेला स्वत: दक्षिण महाराष्ट्र सत्यप्रसारक मंडळ असे नाव दिले. त्यासाठी जून्या पोस्टाच्या पिछाडीची जागा दिली. या मंडळाचे अध्यक्ष गंगाराम कांबळे होते तर उपाध्यक्ष बाबुराव कांबळे होते.

आयुष्यभर पैसै पुरतील यांची सोय महाराजांनी केली होती. 

गंगाराम कांबळेंनी हॉटेल सुरू केले होते. मात्र आपल्या पश्चात गंगाराम कांबळेच काय होईल याची चिंता देखील महाराजांना असावी म्हणून लिहता वाचता येणाऱ्या गंगाराम कांबळेस महाराजांनी हेडमास्तर केले होते. तहयात त्याला पगार मिळेल याची सोय केली होती. गंगाराम कांबळे शिकवत नसे, मात्र ते लोकजागृती करत असत म्हणून हा पगार अविरतपणे सुरू ठेवण्यात आला होता.

महारवाड्यात पहिले दलित सवर्ण स्नेहभोजन. 

१९३६ साली महारवाड्यात पहिले दलित सवर्ण स्नेहभोजन घडवून आणण्यात गंगाराम कांबळेचा सहभाग राहिला. सत्यवादीचे संपादक बाळासाहेब पाटील यांनी याबद्दल त्यांचे जाहिर आभार मानले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,

कोल्हापूरसंबधी एक गोष्ट अगदी निश्चित आहे, व त्यासाठी मला कोल्हापूरचा अभिमान वाटतो. ती म्हणजे शाहू महाराजांनी इथे लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली.

डॉ. बाबाासाहेब आंबेडकरांच एक वाक्य तंतोतत खरं करण्यासाठी गंगाराम कांबळे झटले. ३० डिसेंबर १९३९ साली कोल्हापूरात दलित प्रजा परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्या परिषदेचे चेअरमन गंगाराम कांबळे होते. दलित प्रजा परिषदेत पास झालेले ठराव घेवून स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजाराम महाराजांकडे गेले होते. ही परिषद यशस्वी करण्यात गंगाराम कांबळेच योगदान मोठ्ठ होतं.

महार समाजाच्या रेल्वेने घेतलेल्या जागांचा मोबदला देण्यात आला नव्हता, तेव्हा १९४१ साली “महार सत्याग्रह” करण्यात आला. यावेळीच्या आंदोलनात गंगाराम कांबळे यांनी दिलेले भाषण गाजले. 

शाहू महाराजांच्या निधनानंतर आपल्या लोकराजाचं स्मारकं उभारण्याच शिवधनुष्य गंगाराम कांबळेंनी खांद्यावर घेतलं.

त्यासाठी त्यांनी १९२६ साली शाहू स्मारक मंडळाची स्थापना केली. मात्र सर्वण समाजाला एक दलित शाहू महाराजांचे स्मारक उभारणा हे पटलं नाही व त्यांनी कुरघोड्या कऱण्यास सुरवात केली.

गंगाराम कांबळेंच्या आयुष्यात एक प्रसंग आला, शाहू महाराजांनी त्याला न्याय दिला व हा माणूस अखेरच्या क्षणापर्यन्त शाहूविचारांसाठी झटला अशी ही त्यांची गोष्ट. त्यांच्या पश्चात १९९७ साली टाऊन हॉल बागेजवळ स्मृतीस्तंभ उभारण्यात आला. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.