राजे महाराजे राजकारणी यांच्या BCCI वर दादा येतोय.

आज बातमी आली की बंगालचा दादा माजी कप्तान सौरव गांगुली बीसीसीआयचा नवा चेअरमन होणार. गेल्या काही वर्षापासून फक्त भारतातच नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये बीसीसीआयची दादागिरी चालते. एवढच काय आपल्या आयपीएलचा विचार करून वर्ल्डकपच टाईमटेबल ठरवलं जात. हा जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे.

पण कित्येक वर्ष यावर राजा महाराजा, राजकारणी पुढारी यांचच वर्चस्व होतं.

या बोर्डची स्थापनाच एका महाराजाने केली होती. पतियालाचे सुप्रसिद्ध महाराज भूपिंदरसिंग.

साधारण १७०० च्या सुमारास गुजराती कच्छच्या रणात इंग्लंडहून आलेल्या खलाशांनी भारतात पहिल्यांदा क्रिकेट खेळल. तिथून ब्रिटीश सैनिक, अधिकारी यांचा वेळ जाण्यासाठी खेळला जाणारा गेम म्हणून या क्रिकेटला पाहिलं जायचं. लगान मध्ये दाखवल आहे त्याप्रमाणे सर्व सामान्य माणूस लांब कुंपणाच्या बाहेर बसून पांढऱ्या कपड्यातले इंग्रज का करत आहेत ते पहायचा.

साधारण १७९१ साली इंग्रजांनी आपल्या राजधानीत म्हणजेच कलकत्यामध्ये क्रिकेट क्लब (सीसीसी) स्थापन केला. तो आजही अस्तित्वात आहे.

अठराव्या शतकात भारतातले राजे महाराजे राजकुमार क्रिकेटमध्ये सामील झाले. ब्रिटीशांचे मांडलिकत्व घेतल्या पासून शिकार करणे, महागड्या गोष्टीचा शौकीनपणा करणे या व्यतरिक्त त्यांना काम ही काही नसायचे.

ते सुद्धा क्रिकेट खेळू लागले. त्यांच्या आगमनामुळे हा खेळ हाय क्लास जंटलमन्स गेम बनला. जामनगरच्या रणजीतसिंहनी तर या इंग्रजांच्या खेळावर राज्य केलं.

या नतर भारतात क्रिकेट फेमस झालं. सुरवातीला पारसी समाजातील लोक क्रिकेट खेळू लागले. त्यांनी पहिल्यांदा इंग्रजांचा त्यांच्याच त्यापाठोपाठ बाकीच्या समाजांनी सुद्धा आपापल्या टीम उतरवल्या. भारतात सुप्रसिद्ध क्वाडरँगल मॅचेस होऊ लागल्या.

सर्वसामान्य भारतीय लोक क्रिकेट खेळू लागले. पण राजे महाराजे अजूनही क्रिकेटवर राज्य करायचे. कप्तानी त्यांच्या कडे असायची. फिल्डिंग, बॉलिंग असली श्रमाची कामे ते करायचे नाहीत. फक्त बॅटींगला मात्र उतरायचे. 

रणजीतसिंह यांच्यापासून प्रेरणा घेतलेले पतियालाचे महाराज भूपिंदर सिंह यांनी सुद्धा क्रिकेटमध्ये आपले हात आजमावले. मात्र त्यांना भारत देशाची एक स्पेशल टीम असावी हे स्वप्न होतं. सगळ्या क्लबमधील चांगल्या चांगल्या खेळाडूंना एकत्र करून त्यांनी आलं इंडिया टीम बनवली आणि स्वतःच्या खर्चाने भारतीय क्रिकेटला पहिल्या इंग्लंड दौऱ्यावर घेऊन आले.

तो पर्यंत जागतिक क्रिकेटच्या नियमनासाठी आयसीसीची स्थापना झाली होती.

पहिल्या महायुद्धानंतर क्रिकेटचे सामने वाढले. यावर नियंत्रण राहावे, खेळाचे नियम वगैरे वर चर्चा करण्यासाठी म्हणून आयसीसीने प्रत्येक देशातल्या क्रिकेट क्लबला आमंत्रित केले. भारतातून कलकत्ता क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी गेले.

पतियाळा महाराजांना राग आला. पूर्ण देशाच प्रतिनिधित्व करणारे कलकत्तावाले कोण? पण तेव्हाच्या आयसीसीच्या चेअरमनचा त्यांच्या डोक्यावर हात होता.

त्या आयसीसीच्या मिटिंगमध्ये ठरल की इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर जाईल. त्याप्रमाणे आर्थर गिलिगनच्या नेतृत्वाखाली एमसीसी इंग्लिश टीम भारतात आली. आर्थर गिलिगन क्रिकेटमधला प्रभावशाली व्यक्ती होता. त्याच्यासोबत पतियालाच्या महाराजांनी एक मिटिंग बसवली. संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या क्रिकेट क्लबचे मेम्बर्स तिथे आले.

त्या सगळ्या मिटिंगमधून बीसीसीआयची स्थापना झाली. भारताचा आयसीसीने समावेश करून घेतला. पण कसोटी खेळण्याची संधी १९३२ साली मिळाली. 

पतियालाचे महाराज भूपिंदर सिंग यांनी हट्टाने ही संस्था स्थापन केली पण त्यांना याचा अध्यक्ष होता अल नाही. तेव्हाचे व्हाईसरॉय लॉर्ड विलिंग्डनशी त्यांचे वाद होते. एक ब्रिटीश उद्योगपती रेमंड ग्रांट गोवनला बीसीसीआयचा पहिला अध्यक्ष करण्यात आलं. प्रकृती अस्वस्थाच्या कारणावरून पतियालाचे महाराज पहिल्या कसोटीचे कप्तानसुद्धा बनू शकले नाहीत.

तीसच्या दशकात भारतीय टीमचे इंग्लंड दौरे सुरु झाले. शेजारच्या श्रीलंकेची टीम भारतात येऊ लागली. १९३३ साली पंजाबचे नवाब सिकंदर हयात खान यांच्या रुपात पहिला भारतीय बीसीसीआयचा अध्यक्ष बनला. त्यानंतर भोपाळचे नवाब टायगर पतौडीचे आजोबा अध्यक्ष झाले. मग महाराजा रणजीतसिंह यांचे पुतणे दिग्विजयसिंह जाडेजा, विशाखापट्टणमचे महाराज, बडोद्याचे महाराज असे अनेक जण बीसीसीआयचे अध्यक्ष बनले.

स्वातंत्र्यानंतर कधीही क्रिकेट न खेळलेल्या राजकारण्यांचा बीसीसीआय मध्ये राबता वाढला.

सरदार माजीठा, चिदम्बरम, शेषराव वानखेडे, एनकेपी साळवे अशा अनेकानी बीसीसीआयच नेतृत्व केलं. माधवराव सिंधिया हे राजघराण्यातीलही होते आणि राजकारणीसुद्धा होते. राजसिंह डुंगरपुर राजघराण्यातील होते मात्र त्यांनी क्रिकेटही बरच खेळल होतं.

२००० साली बीसीसीआय एका कलकत्त्याच्या शेटजीच्या हाती आली. नाव जगमोहन दालमिया. याच सुमारास बंगालचाच गांगुली भारताचा कप्तान बनला होता. त्याने भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आणली, जिंकण्याची सवय लावली. दालमिया यांनीदेखील बीसीसीआयला आक्रमक आणि श्रीमंत बनवल. ही संघटना आयसीसीला देखील आपल्या बोटावर नाचवू लागली.

या दोन बंगालीनी जगात भारतीय क्रिकेटची दादागिरी सुरु केली.

त्यानंतर कसलेले राजकारणी शरद पवार यांनी दालमियांच्या जातून झालेल्या पराभवाचा वचपा काढत आधी बीसीसीआय आणि मग थेट आयसीसी आपल्या ताब्यात घेतली. त्यांनीच आपल्या नंतर शशांक मनोहर यांच्या मार्फत बीसीसीआयच राजकारण आपल्या हातात ठेवल.

तो पर्यंत बीसीसीआयने आयपीएलची सुरवात केली होती. पैसा पाण्यासारखा वाहू लागला. क्रिकेटलाही राजकारणच ग्रहण लागलं. वेगवेगळे गट आपल्या हातात ही पैशेवाली संघटना यावी म्हणून भांडत होते. प्रत्येकाचा डोळा बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर होता.

पवारांच्या सद्धी नंतर आलेल्या एन श्रीनिवास यांच्या कारभारावर जोरदार टीका झाली. त्यांच्याच मालकीची टीम चेन्नई सुपर किंग आयपीएल खेळत होती. फिक्सिंगचे आरोप जोरदार झाले. सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करत त्यांना हटवल.

शिवलाल यादव, सुनील गावस्कर अशा माजी खेळाडूंना बीसीसीआयच हंगामी काम सोपवलं गेल. पण बीसीसीआयची घडी विस्कटली होती.

दालमिया हे २०१५ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून परत आले मात्र दुर्दैवाने लवकरच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आलेल्या शशांक मनोहर यांना कारभार जमला नाही. सर्वात तरुण अध्यक्ष बनलेल्या भाजपच्या अनुराग ठाकूरनां नियमाचे उल्लंघन केल्या बद्दल सुप्रीमकोर्टाने काढून टाकलं.

बीसीसीआय वर प्रशासक आला. माजी कॅॅॅग विनोद राय यांना बीसीसीआयची घडी बसवण्याची जबाबदारी दिली.
आजही बीसीसीआय चाचपडत आहे. राजकारण्यांचा विळखा अजून उठलेला नाही. आजही श्रीनिवासन, अनुराग ठाकूर यांचा गट या श्रीमंत संघटनेवर आपलं वर्चस्व बसवण्यासाठी धडपडत आहे.

काल या सगळ्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांनी या सगळ्यातून तडजोडीचा मार्ग म्हणून गांगुलीच नाव पुढ केलं.

सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष तर अमित शहा यांचा चिरंजीव जय शहा बीसीसीआयचा सचिव, अनुराग ठाकूर खजिनदार बनतील.

सौरव गांगुलीने अनेक वर्ष भारतीय क्रिकेटच नेतृत्व केलं आहे शिवाय गेली काही वर्षे बंगाल क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष म्हणून त्याला प्रशासनाचा अनुभव देखील आहे. दालमिया यांचा शिष्य म्हणून त्यांचा वारसा देखील आहे. राजकारणापासून तो दूर आहे. गांगुलीला बंगालचा महाराज म्हटल जात पण त्याच्या फॅमिलीचा राजघराण्याची संबंध नाही.

पैसा, राजकारण यामुळे बदनाम झालेल्या बीसीसीआयचा चेअरमन गांगुलीसारखा मैदानात राबलेला खेळाडू होण्यामुळे भारतीय क्रिकेटच भविष्य बदलेल अशी शक्यता असं सगळी कडून बोलवून दाखवल जात आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.