पाकिस्तानच्या सिक्युरीटीला गंडवून कबाब खाणाऱ्या दादाला पत्रकारानं ओळखलं आणि राडा झाला !!

जवळपास १५ वर्षांनी भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होती. अटलबिहारी वाजपेयींनी कारगिल युद्धानंतर पाकिस्तानशी बंद पडलेला संवाद परत सुरु व्हावा या साठी पाऊल उचललं होतं याचाच एक भाग म्हणून ही क्रिकेट डिप्लोमसी खेळली होती.

पण त्यापूर्वी भारतीय खेळाडूंचे मत नक्कीच विचारात घेतले होते कारण जर काही वाईट घटना घडली तर त्यांचे प्राण पणाला लागणार होते.

पण गांगुलीच्या टीमने एकमताने निर्णय घेतला की आपण पाकिस्तानला जायचं आणि त्यांना तिथे हरवायचं. हे एक मोठ्ठ धाडस होतं आणि गांगुलीच्या नेतृत्वाखाली सगळेजण यासाठी तयार होते.

जेव्हा आपल्या टीमच विमान पाकिस्तानमध्ये उतरलं तेव्हा अनेकांच्या मनात धाकधूक होती. दहशतवादी हल्ल्यांमुळे तिथली कुप्रसिद्धी एवढी झाली होती की आपल्या टीमच्या सुरक्षिततेसाठी अख्खा देश प्रार्थना करत होता. पण खेळाडूंनी जेव्हा विमानतळाबाहेर पाउल ठेवल तेव्हा मात्र त्यांना वेगळच चित्र दिसल.

रस्त्यारस्त्यांवर पाकिस्तानी नागरिक गोळा झाले होते आणि भारतीय खेळाडूंचे स्वागत करत होते. कुठेही द्वेशाची भावना दिसत नव्हती. सगळ्यांना हे चित्रच नवीन होतं.

लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा काळ. 

कोणताही धोका नको म्हणून भारतीय टीमला प्रचंड मोठ्या सुरक्षिततेमध्ये ठेवलं होतं. हॉटेलचे रुपांतर एखाद्या किल्ल्यामध्ये केलं गेल होतं. प्रत्येक खेळाडूच्या रूम बाहेर दोन एके४७ घेतलेले जवान उभे असायचे. अशाच कडक सिक्युरिटी मध्ये सामने खेळवले गेले.

यापूर्वी कधीही झालं नव्हत ते झालं. गांगुली आणि टीमने  इंझमाम उल हकच्या तगड्या पाकिस्तानी टीमला वनडे सिरीज मध्ये सहज हरवले. कसोटी सिरीजमध्ये सुद्धा भारतीय खेळाडूच राज्य करत होते. आता शेवटचे दोन सामने उरले होते. हा सामना लाहोरमध्ये होता.

तो पर्यंत भारतीय टीमला पाकिस्तानमध्ये येऊन महिना उलटून गेला होता.

यापैकी मोठा मुक्काम लाहोरच्या स्विसपर्ल कॉन्टीनेन्टल हॉटेलमध्येच होता. एवढ्या सिक्युरिटीची सवय नसल्यामुळे आपले खेळाडू आता वैतागू लागले होते. शेवटी सिक्युरिटी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं की,

“कृपया त्या एके४७ घेतलेल्या जवानांना माझ्या दारात उभं करू नका. ते लॉबीमध्ये उभे राहिले तरी चालेल पण रोज सकाळी पहिलं त्यांचं दर्शन घेऊन आम्हाला कंटाळा आला आहे”

ही मागणी मान्य करण्यात आली. पण याचा फायदा घेतला कप्तान सौरव गांगुलीन. पाकिस्तानी सुरक्षाव्यवस्थेच्या काळ कोठडीत राहून तो वैतागला होता. एका सुट्टीच्या दिवशी मध्यरात्री त्याने या जवानांना गुंगारा दिला आणि कोणतीही सिक्युरिटी न घेता हॉटेलच्या बाहेर पडला.

आपल्या मित्रांच्या बरोबर त्याचा प्लॅन बनला होता.

लाहोर मध्ये गवालमंडी नावाची एक जागा आहे तिथे खाण्यापिण्याची प्रचंड रेलचेल असते. तिथले चिकन कबाब तर वर्ल्ड फेमस आहेत. हेच कबाब खाण्याच्या लालसेन गांगुली वेषांतर करून तिथे पोहचला. फक्त टीमचे मनेजर रत्नाकर शेट्टीनां हे माहित होतं.

निम्म तोंड झाकलेली माकडटोपी घालून गांगुली मन लावून कबाब खात होता तेवढ्यात अचानक एक आवाज आला,

“अरे कॅप्टन गांगुली रस्त्यावर कबाब खातोय? “

हे दुसर तिसर कोणी नव्हत तर भारतीय पत्रकार राजदीप सरदेसाई होते.

सरदेसाई यांच्या सोबत भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद सुद्धा होते. ही दोघ सुद्धा मध्यरात्रीचा कबाब खाण्याचा आनंद लुटायला आले होते. पण राजदीपच्या त्या ओरडण्याने गडबड झाली. लोकांनी अचानक त्याच्याभोवती गर्दी केली. गांगुलीला कबाब अर्ध्यावर टाकून तिथून पळ काढावा लागला.

गांगुलीच्या मित्राने त्याला आपल्या कार मध्ये बसवले आणि भरधाव हॉटेलच्या दिशेने निघाले. थोड्या वेळात त्यांना लक्षात आले की कोणी तरी मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग करत आहे.

त्या माणसाने गांगुलीच्या कारला गाठलं आणि चालू कारच्या खिडकीला टिकटिक केलं. कार मधले सगळे घाबरले. 

गांगुलीला खिडकी उघडू नको अशी सूचना मिळाली पण तरीही दादाने धाडस केलं आणि खिडकीची काच खाली केली. तो एक पाकिस्तानी फॅन होता. त्याने दादाच्या हातात हात दिला आणि परत निघून गेला. गांगुली सुरक्षितपणे हॉटेलवर पोहचला.

पण दुसऱ्या दिवशी भारत पाकिस्तानच्या सगळ्या वर्तमानपत्रात गांगुलीचा स्टंट छापून आला होता. स्वतः राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी फोन करून गांगुलीची कानउघडणी केली. परत असे धाडस करायचे असेल तर सोबत बॉडीगार्ड नेण्याची सूचना दिली.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.