गांगुलीने रोहित शर्मा बद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली !

वर्ष २०११. कप्टन कुल धोनीच्या नेतृत्वाखाली आपण वर्ल्ड कप जिंकला होता. एकेकाळी क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलियाच राज्य होतं तसं भारताचं राज्य सुरु होईल असंच सगळ्यांना वाटत होतं. तेव्हाच्या टीममध्ये सचिन द्रविड सेहवाग हे दिग्गज खेळाडू होते पण सोबतच गंभीर, युवराज, रैना, धोनी हे गेल्या काही वर्षात नाव कमावलेले खेळाडू देखील होते.

आपल्याला आता कोणीच हरवू शकत नाही हा अतिआत्मविश्वासाचा भोपळा मात्र काहीच महिन्यात फुटला. 

भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर आली होती. ४ कसोटीची सिरीज आपण ४-० ने हरलो. कित्येक वर्षांनी अस घडलेलं.  पूर्वी सत्तरच्या दशकात भारतीय टीमची परदेश दौऱ्यावर जी अवस्था व्हायची ती अवस्था २०११ साली वर्ल्डकप जिंकलेल्या टीमची इंग्लंडमध्ये झाली होती.

राहुल द्रविड वगळता इतर एकही खेळाडू अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. खुद्द सचिन तेंडूलकरने चार कसोटीमध्ये फक्त दोन वेळा अर्धशतक पार केलं होतं. मॅचविनर सेहवागने तर अख्ख्या सिरीजमध्ये मिळून ५० धावा बनवल्या होत्या. धोनी, लक्ष्मण असे भरवशाचे खेळाडू प्रचंड अपयशी ठरले होते.

या अपयशामागे कारण काय याची चर्चा सगळ्या देशभरात सुरु होती. 

शेवटची कसोटी झाली होती. आता टी२० सामना होणार होता. भारताचा माजी कप्तान सौरव गांगुली कोमेंट्री साठी इंग्लंडमध्ये आला होता. मचच्या आदल्या दिवशी पव्हेलीयनमध्ये गांगुली व आणखी एक पत्रकार नेट प्रक्टीस बघत बसले होते. तेव्हा त्या पत्रकाराने गांगुलीला विचारले,”दादा आपको क्या लगता है टीम इंडिया को किस चीझ कि जरुरत है?”

गांगुलीने उत्तर दिलं की,

” टीम को पुरा का पुरा ट्रान्स्फॉर्म करना पडेगा. पुराने प्लेअर्स निकाल के नये प्लेअर्स लाने पडेंगे”

पत्रकाराला आश्चर्य वाटलं. खरं तर हे सगळे महान खेळाडू होते. त्यापैकी अनेकांना गांगुलीने टीममध्ये आणलं होतं. आणि आता तोच म्हणत होता की त्यांना काढून टाकलं पाहिजे. पत्रकाराने गांगुलीला विचारलं की

“मगर नये खिलाडी कहां है? इनको निकलकर खिलायेंगे किसे?”

गांगुलीने तिथे छोट्या सायकलवर फिरत असलेल्या आणि सारखं पडत असलेल्या एका खेळाडूकडे बोट दाखवलं आणि म्हणाला,

“ये पगला है. मगर ये बनेगा अगला सबसे बडा प्लेअर.”

तो रोहित शर्मा होता. २००७ पासून तो भारतीय टीममध्ये होता मात्र आपल्या खेळात सातत्य नसल्यामुळे त्याला अजून कसोटी टीममध्ये संधी मिळाली नव्हती. त्याच्या खेळावर विनोद प्रसिद्ध झाले होते. तो काही करु शकेल याबद्दल कोणाचाच विश्वास नव्हता.

मात्र गांगुलीने भविष्यवाणी केली आणि आज पाहिलं तर कळेल की ही भविष्यवाणी खरी ठरली.

हळूहळू लक्ष्मण सचिन द्रविड सेहवाग गंभीर युवराज रैना हे खेळाडू टीममधून बाहेर गेले आणि नवीन तरुण टीम उभी राहिली. आज कोहली आणि रोहित शर्मा हे फक्त भारतातीलच नाही तर सगळ्या जगातील सर्वात मोठे प्लेअर्स बनले आहेत. याच नव्या दमाच्या खेळाडूंच्या जोरावर भारतीय टीम जगातली नंबर एक ची टीम बनली आहे.

हे ही वाच भिडू.