३० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गांगुलीला एका वादामुळे टीममधून बाहेर हाकललं होतं
वर्ष १९९१-९२. भारतीय क्रिकेट टीम अवघड अशा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आली होती. जवळपास पाच सात वर्षांनी भारतीय टीमने ऑस्ट्रेलियन भूमीवर पाउल ठेवल होतं. अनेक खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या वेगवान पीचवर खेळणार होते. तिथल्या खेळाडूंच्या, स्टेडियममधून जोरदार चीअरअप करणाऱ्या पब्लिकच्या शिव्या खायची देखील सवय नव्हती.
टीमचा कर्णधार होता मोहम्मद अझरूद्दीन. शतकातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू म्हणून ओळख मिळवलेले कपिल देव अजूनही खेळत होते. के श्रीकांत, रवी शास्त्री, वेंगसरकर, सिद्धू, संजय मांजरेकर असे तगडे प्लेअर्स अजूनही टीममध्ये होते.
अशातच एक नवीन खेळाडू आपल्या कारकिर्दीला सुरवात करणार होता. नाव सौरव गांगुली.
त्याच वय होतं अवघ १९. यापूर्वी पश्चिम बंगालकडून रणजीमध्ये खेळताना गांगुलीने खोऱ्याने धावा ठोकल्या होत्या. एवढ्या कमी वयात इतक्या अवघड दौऱ्यावर निवड होणे ही एका अर्थी त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती पण त्याच बरोबर तिथे चांगली कामगिरी करता येईल का याचे टेन्शन देखील होते.
वयाच कारण देता येत नव्हत कारण तेव्हा भारतीय टीममध्ये आधीच सचिन तेंडूलकर म्हणून १६व्या वर्षी टीममध्ये आलेल्या मुलाने जबरदस्त हवा करून ठेवली होती.
पहिल्यांदा तिथे वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया यांच्या सोबत वनडे सिरीज खेळवली जाणार होती. भारताची सुरवात बरी झाली. पहिलीच मॅच वेस्ट इंडीजबरोबर आश्चर्यकारकरित्या टाय झाली, दुसऱ्या मॅचमध्ये तर ऑस्ट्रेलियाला अवघ्या १०१ धावात गुंडाळून त्यांचा मोठा पराभव केला. त्यानंतर आपली वाटचाल तशी लडखडू लागली. वेस्ट इंडीजवर एक विजय मिळवला पण ऑस्ट्रेलियाने दोन वेळा हरवले.
आपले फायनलमध्ये जाण्याचे चान्सेस कमीकमी होत होते.
अखेर नवव्या सामन्यात गांगुलीला संधी मिळाली. वेस्ट इंडीजबरोबरच्या त्या मॅच मध्ये सचिन सोडला तर इतर सगळ्या भारतीय बॅट्समननी नांगी टाकली. सचिनने ७७ धावा बनवल्या. पहिलीच मॅच खेळणाऱ्या गांगुलीने १३ चेंडूत ३ धावा काढल्या. विंडीजची तेजतर्रार बॉलिंग तो खेळू शकला नाही. भारताने ती मॅच गमावली. पुढे आपण सिरीजमधून बाहेर पडलो.
यानंतर टेस्ट सिरीज होती. आपला तिथे प्रचंड मोठा लाजीरवाणा पराभव झाला. फक्त एकटा सचिन ऑस्ट्रेलियन बॉलिंगचा सामना करू शकला होता. सगळे सिनियर खेळाडू फेल गेले. गांगुली वाट बघत राहिला. पाच सामन्यांच्या कसोटीमध्ये त्याला एकदाही संधी दिली गेली नाही.
जवळपास तीन महिने चाललेल्या या दौऱ्यानंतर होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी गांगुलीला निवडलं नाही. गांगुलीला अपमानास्पदरित्या परत पाठवून देण्यात आले.
त्याला तडकाफडकी ऑस्ट्रेलियामधून परत धाडलं याबद्दल भारतीय मिडिया मध्ये खूप अफवा पसरल्या होत्या.
लहानपणापासून गर्भश्रीमंत घरात वाढलेल्या, महाराजा अशी ओळख असलेल्या सौरव गांगुलीने सिनियर खेळाडूंशी उद्धटपणा केला होता अशी चर्चा होती. काही जण असेही म्हणाले की राखीव खेळाडू असलेल्या गांगुलीने कपिल देव की अझरूद्दीनला मैदानात इतर खेळाडूना ड्रिंक नेऊन देण्यास नकार दिला होता.
“मै यहां खेलने आया हुं. ड्रिंक सर्व्ह करने नही.”
खर खोट माहित नाही. अशी घटना तो ज्युनियर टीमचा सदस्य असताना देखील झाली होती. काहीही असो पण गांगुलीच्या वर्तवनूकीबद्दल इतर खेळाडूंचे आक्षेप होते हे नक्की. गांगुलीने मात्र आपल्या पुस्तकात या सगळ्याचे खंडन केले आहे.
झालं अस होतं की त्या काळात भारतीय टीममध्ये अनेक गट होते.
एक गट उत्तर भारतीय खेळाडूंचा होता, दुसरा दक्षिणेतल्या खेळाडूंचा होता आणि शिवाय मुंबईच्या खेळाडूंचा वेगळाच गट होता. गांगुली या कुठल्याच गटात बसत नव्हता. त्या टीममध्ये त्याचा असा कोणी गॉडफादर नव्हता. बाकीचे सगळे खेळाडू आपआपल्या गटातल्या खेळाडूंशी गप्पा मारायचे तेव्हा हा एका कोपऱ्यात बसलेला असायचा.
त्यामुळे गांगुलीबद्दल इतर खेळाडूंच्या मनात एक अढी बसली होती.
त्यातल्या त्यात रूममेट असणाऱ्या सचिन तेंडूलकरबरोबर त्याचे चांगले सूर जुळले. अंडर-१४ च्या टीमपासून त्यांची ओळख होतीच. तेव्हा सचिन आणि कांबळीबरोबर त्याची भांडण सुद्धा झाली होती. दोघे समवयस्क होते. आवडीनिवडी सेम होत्या. झोपेत चालणाऱ्या सचिनची काळजी गांगुली घ्यायचा.
बाकी टीममध्ये काही आलबेल नव्हतं.
सगळेच प्लेअर्स आपल्या खराब कामगिरीमुळे वैतागले होते. त्यातूनच संजय मांजरेकरने एकदा आपला राग सगळ्यात ज्युनीअर असणाऱ्या गांगुलीवर काढला. जवळपास अर्धा तास त्याला शिव्या दिल्या आणि कारण देखील सांगितले नाही.
तेव्हा कोणताही सिनियर खेळाडू गांगुलीच्या मदतीला आला नाही. वरून एका सामन्यातील खराब परफोर्मन्समुळे त्याला बाहेर बसवलं, काही दिवसांनी त्याला नेट्समध्येही बॅटींग द्यायचं बंद करण्यात आल. इतर खेळाडूना सरावासाठी बॉल टाकणे एवढ त्याला काम उरल होतं.
अखेर एक दिवस त्याला सांगण्यात आलं की तुला परत पाठवण्यात येत आहे.
गांगुलीला ही हे अपेक्षित होतं. पण तरीही ते शब्द ऐकून डोक्यावर एखादा पहाड कोसळतोय अस वाटू लागलं. कसबस आपले अश्रू सावरत आपल्या रूममध्ये आला, बॅग भरायला सुरवात केली. रूममेट असणाऱ्या सचिनला सांगितलं की मी परत जातोय. सचिनसुद्धा वयाने अल्लडच होता. त्याने अभावितपणे गांगुलीला विचारलं,
“बर ठीकाय. तू आता खेळणार नाहीस तर मला तुझी बॅट देशील? “
सचिनला गांगुलीची जड बॅट खूप आवडली होती. येणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये ती आपल्याला उपयोगी पडेल एवढाच त्याच्या मनात हिशोब होता. गांगुलीचे सांत्वन करावे एवढाही विचार त्याच्या डोक्यात आला नाही. चिडलेला गांगुली म्हणालाच,
“भाई टीमसे निकाल दिया है. बॅट भी ले लिया है. अब क्या नंगा करके भेजोगे ? “
थोड्या वेळाने गांगुलीचा राग शांत झाला. त्याने ती बॅट सचिनला दिली. सचिनने त्याच बॅटने १९९२चा वर्ल्डकप गाजवला. अश्रू सावरत विमानात बसलेल्या गांगुलीने मनाशी गाठ मारली,
“मै वापस आऊंगा.”
परत आल्यावर त्याने दुप्पट कष्ट घेतले. मिडिया मध्ये चाललेल्या वादाकडे दुर्लक्ष केलं. प्रचंड धावा काढल्या. अखेर गांगुलीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेल्या निवडसमितीला त्याला परत बोलवावच लागलं. १९९६ मध्ये त्याने पुनरागमन करून पहिल्याच मॅच मध्ये लॉर्डसवर सेंच्युरी मारली.
आपल्या भोवतीचे सगळे वाद धुवून टाकले. गांगुलीच्या त्याच शतकामुळे संजय मांजरेकरचे भारतीय टीममध्ये पुनरागमनाचे सर्व दार कायमचे बंद झाले.
हे ही वाच भिडू.
- आणि त्या दिवशी गांगुली आणि सचिननं मॅच फिक्सिंगला हरवलं !!
- अझरूद्दीनने शिवी देण्याची चूक केली म्हणून गांगुलीला चान्स मिळाला.
- कोचने सेहवागला कानफटात मारली आणि गांगुली भडकला.