गणपतीबाप्पाला मोदक कधी पासून आवडू लागला?

आज गणपती बसले. कोरोनाच्या संकटात गणरायाच स्वागत नेहमी प्रमाणे वाजत गाजत करता आलं नाही मान्य आहे. गणपती बाप्पाला सुद्धा या लॉक डाऊन मध्ये थोडं ऍडजस्ट करायला सांगावं लागतंय. अगदी लालबागचा राजा, दगडूशेठ सारखी मोठी मंडळे संपूर्ण देशात एक आदर्श घालून देत आहेत.

बाकी सगळं ऍडजस्ट होईल पण बाप्पाचा नैवेद्य मोदक. याच्या बाबत मात्र ऍडजस्ट कोणीही करू शकत नाही. ना बाप्पा ना बाप्पाचे भक्त.

गणपतीला मोदक लागतो म्हणजे लागतोच. शास्त्र असत ते.

गणराया येणार म्हणून घरातल्या डेकोरेशन पासून ते दुर्वा निवडण्या पर्यंत सगळी कामे वाटली जातात. पण आईच मुख्य लक्ष असत मोदक बनवण्याची तयारी करण्याकडे. आणि घरातल्या वानरसेनेच सुद्धा मोदक कधी बनतात या कडे.

बाप्पाची प्रतिष्ठापना झाली कि पहिला नैवेद्य मोदक.  

शास्त्र असत हे मान्य केलं तरी भिडू ला इतिहासात पुराणात घुसण्याची वाईट खोड आहेच. कारण जुन्या लेण्या, जुनी चित्रे वगैरे बघितली तरी गणरायाच्या हातात कधी मोदक दिसत नाहीत. महाराष्ट्रातल्या प्राचीन वेरूळ लेण्या मध्ये जरी बघितलं तरी गणेशाच्या हातात मोकळे वाडगे दिसते.

एक वेळ बाप्पाने सगळे मोदक खाल्ले असं मान्य केलं तरी बाकीच्या ठिकाणी सुद्धा असच दिसत, कुठे कुठे लाडू दिसतात तर कुठे काहीच नाही.

मग हि शंका आली की मोदक कधी आले? बाप्पाला मोदक कधी पासून आवडू लागले.

पुराणात देखील पाहिलं तर विशेष उल्लेख आढळत नाही. गणपती बाप्पा फुडी आहेत याचा उल्लेख आहे. एका राक्षसाला त्यांनी खाल्लं तेव्हा पोटात दाह होऊ लागला तेव्हा औषध म्हणून दुर्वा दिल्या व तेव्हा पासून बाप्पाला दुर्वा चढवल्या जाऊ लागल्या हे आपण ऐकलेलं.

असं म्हणतात की एकदा अत्रि ऋषींच्या घरी डिनरला गेले असता बाप्पाला अत्री ऋषींच्या पत्नीने म्हणजेच अनुसूयेने एक गोड पदार्थ खाऊ घातला. ती स्वीट डिश बाप्पाला खूप आवडली. तो खाऊन त्यांनी २१ वेळा ढेकर दिली.

पार्वतीमातेने अनुसूये कडे त्या पदार्थाची रेसिपी मागितली. तो पदार्थ म्हणजे मोदक !!

हि स्टोरी फेमस आहे. पण ही  कथा खूप नंतरहुन आली असं म्हणतात. कारण अगदी वेदांमध्ये देखील गणरायाला अद्याप ती पोजिशन दिली नव्हती. शंकर महादेवाच्या गणांचा अधिपती म्हणून तो गणपती होता. तो विघ्नहर्ता होता.

साधारण इसवी सणाच्या सातव्या शतकात गणपती बाप्पा घरोघरी पोहचू लागला. आदि शंकराचार्यांच्या काळात गणपती बाप्पाची पॉप्युलॅरीटी वाढली. त्यांनीच एका श्लोकामध्ये मोदकाचा उल्लेख केला आहे. हा मोदक या पदार्थाचा पहिला उल्लेख असावा असं म्हणतात.

मुदाकरात्त मोदकं सदाविमुक्ती साधकम

प्राचीनकाळी धर्म शास्त्रामध्ये पंच महाभूतांनाच देव मानलं गेलं होतं. शेतीचा शोध लागल्यापासून जमीन,जल,वायू हेच आपले खरे रक्षण करते होते. त्यांच्या बद्दल कृतज्ञता म्हणून आपल्या शेतीत जे पिकत ते नैवेद्य सोडण्याची प्रथा निर्माण झाली.

पुढे होम हवन आले, कर्मकांड आले. पण नैवेद्याची परंपरा कायम राहिली.

आता गणपतीला मोदकच नैवेद्य का याच कारण काहीसं  भौगोलिक देखील आहे. भारतातल्या अनेक भागात तांदूळ पिकतो. नारळ आणि गूळ तर सर्व व्यापी आहे. याच खोबरे गूळाला सर्व प्रथम गणरायाला नैवेद्य म्हणून चढवत असावेत. पुढे त्याला बांधून ठेवण्यासाठी तांदळाच्या कणिकेच कोंदण आलं.

साधारण बघितलं तर मोदक हा महाराष्ट्र, ओरिसा,तामिळनाडू या तांदूळ पिकणाऱ्या प्रदेशात जास्त फेमस आहे. त्याची नावे देखील सगळीकडे वेगवेगळी आहेत. पुढे तो देशभर पसरला. संस्कृत मध्ये मोद म्हणजे आनंद. हा मोद देणारा मोदक हे नाव सर्वमान्य सर्वरूढ झाले.

आता काय  खोबऱ्याचे, खव्याचे, पुरणाचे, सुक्यामेव्याचे एवढंच नाही तर चॉकलेट मोदक सुद्धा मिळतात. काही जण मोमोच आणि मोदकाचं रिलेशन शोधायला पण जातात.

चीन मधून नालंदा वगैरेर विद्यापीठात शिकायला आलेले प्रवासी परत जाताना मोदक घेऊन गेले आणि त्याच मोमो बनवलं अशी देखील आख्यायिका आहे.

आख्यायिका काहीही असोत. मोदक आपल्याला प्रिय आहे. त्याहूनही बाप्पा आपल्याला जास्त प्रिय आहे. म्हणूनचं कितीही हे कोरोनाचे विघ्न आले तरी आपण मोदकाशी तडजोड आपण करू शकणार नाही. हा विघ्नहर्ता गणराया मोदक खाऊन तृप्त होईल आणि जगावरच संकट दूर करेल अशीच त्याच्या चरणी प्रार्थना.

संदर्भ- मोद वाढवणारा मोदक पराग दिवेकर सा.सकाळ 

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.