पिल्यानंतर वास येवू नये म्हणून काय करावं ?

सर्वात प्रथम पिणाऱ्या आणि न पिणाऱ्या वाचकांना भिडू कडून  हार्दिक शुभेच्छा !!!

न पिणारे मटण खावून निवांत ताणून देतील. त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही इथ विषय आहे पिणाऱ्यांचा. उघडउघड घराच्या दारापर्यन्त नागिण डान्स करत येणाऱ्यांचा देखील काही मुद्दा नाही पण या सुशिक्षित समाजात असे बहुसंख्य नागरिक आहेत जे पितात पण कोणाला कळून देत नाहीत. आपला ठराविक ग्रुप सोडला तर आपण पिलोय हे कोणाला कळू नये यावर त्यांनी उत्तर कौशल्य आत्मसात केलेलं असतं.

पण बरेच लोक असे देखील असतात जे एक दिवस घेतलं तर काय होतं या भावनेच्या आहारी जावून गटारी साजरी करतात. मग त्यांच्या तोंडातून दारूचा वास येतो.  

बायको, आई, वडिल, मोठ्ठा भाऊ, शेजारचे काका, चौकातला दोस्त, दूसऱ्या गावातले पाहूने, बायकोकडचे पाहूणे, आजोळातले नातवाईक, काकाचा ह्यो मामाचा त्यो अशा कुठल्या ना कुठल्या माणसाला हमखास घावतात. घरातले असले तर घर बंद होतं आणि बाहेरचे असले तर घरापर्यन्त बातमी पाठवण्याच कष्ट केलं जातं.

त्यामुळं कस असतय लपून पिताना वास गेला पाहीजे याची काळजी घेणं मस्ट असतय. तर वास घालवण्यासाठी काय करायचं याची दिर्घ यादी आम्ही तुमच्यापुढे ठेवतोय. बोलभिडू वाचकांना हे फुटकच ज्ञान देताना आम्हाला जो आनंद होत आहे तो आम्ही शब्दात सांगू शकत नाही हे नक्की.

तर हा करा सुरवात.

१) बेल मारून खाली वाकण्याचं कौशल्य.

हा प्रकार पुर्णपणे स्वत:च्या शारिरिक कौशल्यावर आधारित आहे. यात तोंडाचा वास जात नाही पण पुढच्याला पिल्याचा थांगपत्ता लागणार नाही यासाठी उत्तम प्रकार आहे. यात काय करायचं घराची बेल, बेल नसेल तर कडी वाजवायची. दार उघडण्यासाठी आई/ वडिल आले की पायातले शूज काढण्यासाठी खाली वाकायचं आणि एकएक करत लेस खोलत बसायचं. या प्रकारामुळे काय होतं तर थेट चेहऱ्यासमोर चेहरा जात नाही. डोळे लाल झाले असतील तर ते दिसत नाही.

आमचा एक कोल्हापूरचा मित्र हाच प्रयोग करत असताना खाली वाकला. तो लेस काढत होता तरी त्याच्या वडिलांना तो सापडला. त्याच कारण म्हणजे त्याच्या पायात चप्पल होती. सो पिवून शूज की चप्पल असा विचार न करता लेसचे शूज घालूनच हा प्रकार करा. लाभ मिलैंगा.

२) वास येवू नये म्हणून पिण्यासारखे पेय.

वास येवू नये म्हणून काहीजण लिंबू पिळतात. पक्षांतर करुन पवित्र होण्याचा अभिमान बाळगणाऱ्यांसारखा हा प्रकार आहे. प्रत्यक्षात रिझल्ट शुन्य असतोय. वरुन वरुन वाटतं जमल पण तस नसतं. थोडक्यात लिंबू पिळून काही फरक पडत नाही. पण हा काही वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या नॉन-अल्कोहोलिक ड्रिन्क्स बाजारात आहेत. ज्या पिल्यानंतर दारूचा वास जातो. पण त्यातही ऐन टायमाला अगदी मुळापासून ढेकर आला तर मात्र तूम्हाला घावण्यापासून कोणिही थांबवू शकत नाही.

३) बाबा इलायची, बडिशेप आणि मसाले पान.

वर दिलेले पदार्थ खावून वास जातो. पण फक्त आपल्यापुरता !!!

दूसऱ्यांना यायचा तसा वास येतो. तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट अतीच असला तर स्वत:ला वास येवू नये म्हणून अशा प्रकारचा उपाय तुम्ही करु शकता. मिन्ट पासून बाबा इलायची किंवा बाबा इलायची बडिशेपमध्ये मिक्स करुन खाणे, किंवा मसाले पान खाणे यामुळे वरवरचा वास जावू शकतो. या प्रयत्नात तुम्ही घरी गेल्यानंतर घावणार नाही हे फिक्स.

४) इतकं श्रीमंत होणे की घराला चार प्रवेशद्वार असली पाहीजेत.

हा सगळ्यात रामबाण उपाय आहे. इतका पैसा मिळवायचा आणि इतकं मोठ्ठ घर बांधायचं की दूसऱ्यांच्याच काय आपल्याच बापाला पण कळलं नाय पाहीजे की, पोरगं कधी आलं आणि कधी झोपलं. घरातले या दारात असले की आपण त्या दारातून घरात प्रवेश करावा. घरात रोमिंग पडलं पाहीजे इतका पैसा कमवा. म्हणजे टेन्शन राहणार नाही.

५) प्यायचीच नाही.

आमच्या एका मित्राला विचारल्यानंतर त्याने हे उत्तर दिलं. सामाजिक पातळ्यांवर विचार करत हे उत्तर अतिशय समर्पक व कौतुकास्पद वाटतं. पण ऐकावे जनाचे करावे मनाचे अशी म्हण आपल्याकडे आहे ती खास पिणाऱ्यांसाठीच आहे अस आमचं ठाम मत आहे. सो दारू पिवू नये हा काय उपाय झाला नाही. जास्तित जास्त  उंची प्रकार पिलात, व्होडका पिलात तर पुरेसी किक आणि वासावर उपाय सापडू शकतो हे ध्यानात असू दे.

बाकी दैनदिंन समस्यांसाठी असच अधूनधून लेक्चर देण्यासाठी येतच राहू.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.