गटारी अमावस्येचा पण इतिहास आहे, वाचा आणि पवित्र व्हा !

आज दिव्यांची अमावस्या अर्थात गटारी. अंधकारातून उजेडाकडे घेवून जाणारा आजचा दिवस. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांच स्वागत करणारा आजचा दिवस.

लोड झालं नं भावांनो !!! लोड घेवू नका. आज गटारीच आहे आणि आज गटारीच  साजरी होणार. काळजी करायचं कारण नाही कारण आजपर्यन्त तरी या सणावरुन कुठलाच राडा झाल्याचं, कोणी जनहित याचिका दाखल केल्याचं, कुणाच्या भावना दुखावल्याचं ऐकण्यात आलं नाही. 

कारण “आहे सण मोठ्ठा, नाही उत्सवाला तोटा”.

तर आज गटारी अमावस्या. आज काय करायचं असतं तर मटण खावून दारू पिवून लोळायचं असतं. गटारी प्रत्येकाच्या नशीबात असतातच असं नाही. खूप कमी जणांना थेट गटारीत जाण्याचं भाग्य मिळतं. असो तर आजच्या दिवसाचं महत्व काय तर श्रावण पाळणाऱ्याहून श्रावण न पाळणारे कार्यकर्तेच अधिक प्रमाणात  या सणात सक्रिय सहभाग नोंदवत असतात. खरतर गटारी हा मराठी माणसाचा ३१ डिसेंबर आहे. पण याची सुरवात नेमकी कधी, कुठ, कशी झाली. 

शप्पथ सांगतो शास्त्र काय सांगतं ! 

शास्त्र कधीच दारू पिण्यास सांगत नाही. पण हा मटण खाण्याबद्दल आपल्याच प्रथा परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्या कशा दर पहिला देवदेव करुन नंतर मटणावर ताव मारणाऱ्या प्रथा. आदल्या दिवशी देवाची पालखी दूसऱ्या दिवशी मटण. आदल्या दिवशी संक्रात दूसऱ्या दिवशी किंक्रातीच मटण. आदल्या दिवशी होळी दूसऱ्या दिवशी धुलवड अस आपल्या सणांच स्वरुप. मग श्रावण संपल्यावर गटारी पाहीजे होती ती आधी कशी काय. 

खर सांगू का या गोष्टीला काहीच लॉजीक नाही. तस दारू पिण्याला तरी काय लॉजीक आहे तर मग दारूच्या या सणाला लॉजीक असण्याची अपेक्षा करणचं चुकिचं आहे ! 

Screen Shot 2018 08 11 at 7.42.00 PM
youtube

तरी त्यातल्या त्याल आम्ही तुमचं समाधान करण्यासाठी गावभर विचारून माहिती गोळा केली. ती माहिती अशी की,गटारी अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या किंवा आषाढी अमावस्या. दूसरा दिवस  हा श्रावणाचा. श्रावणाचा महिना हा पवित्र, सणउत्सवांचा असल्यानं श्रावणात सामिष आहार आणि मद्याला  हात न लावण्याचा दंडक. त्यानंतर लगेचच गणपती उत्सवाचा पंधरा दिवसाचा कालावधी. त्यानंतर नवरात्र व नंतर दसरा. थोडक्यात काय तर काहीजण आज मटण खाण्याच सोडलं की थेट दसरा झाल्यानंतरच खाण्यास सुरवात करतात. म्हणूनच आजच्या दिवशी घराघरात मासे, चिकण, मटण खाण्याचा बेत आखला जातो. 

गटारीची घरातून दाराकडे वाटचाल ! 

मटण आलं म्हणजे ओघाने मद्यपान आलं. घरात मटण आहे आणि पुढचा महिना खाडं जाणार म्हणल्यानंतर आत्ता टाकून गेलं पाहीजे हे लॉजिक निर्माण झालं. मटण चालतं म्हणून दारू चालत नाही हे लोकांना चांगलच माहिती म्हणून गटारी घराबाहेर करण्याची प्रथा चालू झाली. त्यातही आषाढ सरीमुळे आसपासच्या डोंगरदऱ्या फुलून गेल्यामुळे माणसांनी या घाटाघाटां रस्ता निवडला. याच मुख्य कारण म्हणजे पिल्यानंतर तसही नागमोडी वळणं घेत चालावं लागतं. अशा काळात नागमोडी रस्त्यावरच आपण गेलो तर सुखरुप घरी जावू असा विचार मद्यपान करणाऱ्याकडून केला गेला असावां. 

गटारी दारातून बाजाराकडे ! 

भारतीय अर्थव्यवस्था हि सर्वात जास्त चान्स मारणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. एकदा बकरा बाहेर आलाय म्हणल्यानंतर त्याला गावठी कोंबडा द्यायची व्यवस्था मार्केटने केली. आमच्याकडे उत्तम गटारी साजरी करून मिळेल इथपासून खास चुलीवरची गटारी असे बोर्ड घाटाघाटात दिसू लागले. प्या आणि लोड व्हा या एका नियमानंमुळे माणसं खर्च करू लागली. त्यातही आत्ता कुठं महिनाभर खर्च आहे अस नैतिक कारण माणसांकडे होतचं. त्यातून मार्केट सजलं. लोकांनी फायदा घेतला आणि गटारी सण माणसांना जोडणारा म्हणून गणला जावू लागला. दिवे लावून दिव्याची अमावस्या करणारे दिवे लावून दिवाळ काढाय लागले. 

गटारी आंतराष्ट्रीय पातळीवर घेवून जाणं काळाची गरज !! 

गटारी अमावस्याचं सध्याचं स्वरुप पाहतां गटारीला आत्ता जागतिक पातळ्यांवर घेवून जाणं मराठी माणसांसाठी अत्यावश्यक आहे. हा असा एकमेव सण की ज्यामध्ये आपण कुटूंबासोबत सहभागी होवू शकत नाही म्हणून त्याचं वेगळं पण आहेच. असा हा सण आपण जागतिक पातळीवर घेवून जावा अस आम्हाला मनोमन वाटतं. 

टिप –  दारू पिणं गुन्हा नाही, दारू पिवून गाडी चालवणं गुन्हा आहे. गुन्हा करु नका मज्जा करा !! 

धन्यवाद 

1 Comment
  1. Raj kusale says

    😂गटारी फालतुगिरी आहे, ओरिजनल फक्त दीप अमावस्या

Leave A Reply

Your email address will not be published.