गेट वे ऑफ इंडियाची वास्तू नक्की कोणत्या कारणासाठी उभारण्यात आली होती?

गेट वे ऑफ इंडिया… मुंबईची शान आणि मुंबईचा ताजमहाल असा उल्लेख या गेट वे ऑफ इंडियाच्या ऐतिहासिक वास्तूचा नेहमी केला जातो आणि २०२४ मध्ये तर या वास्तूला १०० वर्ष पूर्ण होतायत. पण आज हा विषय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या ऐतिहासिक वास्तूला आता धोका निर्माण झाला आहे. भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू वर्षानुवर्षे समुद्राच्या तुफान लाटा आणि वादळ झेलत गेली 99 वर्षे उभी आहे. पण आता या वास्तूचं अस्तित्व धोक्यात आल्याची बाब महाराष्ट्र पुरातत्व विभागाने केलेल्या स्ट्रक्टरल ऑडिट रिपोर्टमधून समोर आलीये.

गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक वास्तूविषयी सांगायचं झालं तर या वास्तूच्या बांधणीला सुरवात झाली होती ३१ मार्च १९११ साली.

खर म्हणजे गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास तसा फार जुना नाही. भारत पारतंत्र्यात होता तेव्हा ब्रिटनचे सम्राट जॉर्ज आणि क़्विन मेरी १९११ ला भारत भेटीवर आले होते. त्यांना त्यावेळी भारताचे राजे आणि राणी म्हणून घोषित केलं होतं आणि त्यांचा सन्मान म्हणून गेट वे ऑफ इंडिया ही वास्तु उभारण्यात आली. त्यांची भारत भेट ही ऐतिहासिक व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. यानंतर १९२४ रोजी ही वास्तू सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली.

दरम्यान इंग्रजांची शेवटची तुकडीही याच गेट वे ऑफ इंडियामधून भारतातून निघून गेली आणि भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला होता.

गेट वे ऑफ इंडिया या वास्तुची पायाभरणी ३१ मार्च १९११ ला मुंबईचे राज्यपाल सर जॉर्ज सिडनहैम क्लार्क यांनी केली. गेट वे ऑफ इंडियाच्या बांधकामाचा स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट यांनी तयार केलेला अंतिम आराखडा ३१ मार्च १९१४ ला मंजूर झाला. आराखडा मंजूर करुन गेट वे ऑफ इंडिया वास्तुचं बांधकाम गॅमॉन इंडिया लिमिटेड या बांधकाम क्षेत्रात नावाजलेल्या कंपनीला देण्यात आलं. गेट वे ऑफ इंडिया स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमूना आहे.

या वास्तूचं प्रवेशद्वार पिवळ्या बेसाल्ट आणि काँक्रीटने बांधण्यात आलं होतं.

प्रवेशद्वाराच्या मध्यवर्ती घुमटाचा व्यास अंदाजे ४८ फूट आहे तर उंची ८३ फूट आहे. प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी लागणारे दगड हे जवळच्या ठाणे जिल्ह्यातल्या खरोदी खाणीतून आणले होते. तर जाळीदार खिडक्या ग्वाल्हेरहून आणण्यात आल्या होत्या. सागराभिमुख असलेल्या या वास्तुच्या बांधकामासाठी तब्बल अकरा वर्षे लागली होती. आणि वास्तुच्या बांधकामासाठी त्या काळात २१ लाख रुपये खर्च आला होता.

गेटवे ऑफ इंडियाचं स्ट्रक्चरल डिझाईन 26 मीटर उंचीच्या मोठ्या कमानीच्या स्वरूपात बनवलं आहे.

वास्तुच्या बांधकामासाठी अपोलो बंदराला जमीन प्राप्त करण्याचं काम १९१५ मध्ये सुरु झालं. प्रत्यक्षात बांधकाम १९१९ ला सुरु झालं आणि १९२४ ला पूर्ण झालं.

गेट वे ऑफ इंडियाचं बांधकाम हे इंडो – सेरासेनिक स्थापत्य शैलीत केलं गेलय. थोडाफार गुजराती शैलीच्या बांधकामाचाही प्रभाव या गेट वे ऑफ इंडियाच्या बांधकामावर दिसून येतो. गेट वे ऑफ इंडियाचे निमूळते मनोरे, घुमट, मिनार अतिशय सुबक पद्धतीने केलेले आढळतात.

आयताकृती असलेल्या या वास्तुचे मुख्यता तीन भाग आहेत.

गेट वे ऑफ इंडियाची मधली कमान सुमारे ८५ फुट उंच आहे. मध्यवर्ती भागात असलेला घुमट ८३ फुट उंच असून त्याचा व्यास ४८ फुट एवढा आहे. आता हा जो घुमट आहे तोच या वास्तुचं मुख्य वैशिष्ट्य आणि एकंदरीतच पर्यटकांसाठीचं आकर्षण आहे. वास्तूच्या कमानीमध्ये असलेल्या मोठ्या हॉल मध्ये एका वेळी जवळपास ५०० ते ६०० लोक येऊ शकतात.
गेट वे ऑफ इंडियाच्या मागच्या भागात पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या थेट अरबी समुद्रात उतरतात आणि तिथून जे अरबी समुद्राचं दर्शन घडतं ते एक नंबर असतं. उगाच नाही या वास्तूला मुंबईचं ताजमहाल म्हणत. इथूनच आपल्याला घारापुरी बेटावर एलिफंटा लेणी बघण्यासाठी बोटीने जाता येतं. गेट वे ऑफ इंडिया हून दर दोन तासांनी बोट असते. शिवाय, गेट वे ऑफ इंडियावरून जेटीने तुम्ही तासाभरात अलिबागला सुद्धा जाऊ शकता.

या वास्तूचे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लीम वास्तूकलेतलं कोरीव काम, घुमट इत्यादी शैलींचा वापर यात करण्यात आलाय…

त्यामुळे या भव्य इमारतीच्या संरचनेत हिंदू, मुस्लिम स्थापत्य शैलीच्या खुणा सुद्धा आढळून येतात. या वास्तूमध्ये स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्त्यासुद्धा बसवण्यात आल्या आहेत. फक्त आपल्या देशात नव्हे तर परदेशातल्या पर्यटकांसाठी सुद्धा गेट वे ऑफ इंडिया एक आकर्षणाचं ठिकाण आहे. मुंबईत येणारे फोरेनेर्स सुद्धा गेट वे ऑफ इंडियाला आवर्जून भेट देतात. त्यामुळे आता या ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण वास्तुचं योग्य रित्या संवर्धन करणं हि आपली महत्वाची जबाबदारी आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.