‘फ्लाइंग बीस्ट’ गौरव तनेजाला त्याच्याच बर्थडेला अटक झाली, प्रकरण नेमकं काय?
गुगल ट्रेंड्स, ट्विटर ट्रेंड्स ते सगळ्या वृत्तवाहिन्यांवर एक नाव खूप जास्त ट्रेंड होतंय. गौरव तनेजा. चांगल्या दणकट आणि पिळदार शरीरयष्टीचा हा व्यक्ती माध्यमांमध्ये झळकण्याचं कारण म्हणजे या व्यक्तीला झालेली अटक. नोएडा पोलिसांनी गौरव तनेजा अटक केली आणि त्यांची इतकी फॅन फोल्लोइंग आहे की, त्यामुळे त्यांच्या अटकेची प्रत्येक अपडेट व्हायरल झाली.
म्हणून नक्की कोण आहे गौरव तनेजा? आणि कोणत्या प्रकरणात ते सापडले आहेत? बघूया…
वयवर्षे ३६ असलेले गौरव तनेजा हे देशातील सर्वात लोकप्रिय यूट्यूबरपैकी एक आहेत. त्यांचं फ्लाइंग बीस्ट या नावाने युट्युब चॅनेल आहे. म्हणून त्यांना अनेक जण फ्लाइंग बीस्ट या नावाने देखील ओळखतात. त्यांच्या या यूट्यूब चॅनेलचे जवळपास ७.५ मिलियनपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत. प्रत्येक व्हिडिओला मिलियनमध्येच व्युज असतात. त्यांचे व्हिडीओ हे डेली व्लॉगचे असतात.
त्यांच्या चॅनेलला फ्लाइंग बीस्ट हे नाव देण्याचं कारण म्हणजे गौरव तनेजा स्वतः पायलट होते. आयआयटी खरगपूरमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बराच काळ पायलट म्हणूनही काम केलंय.
गौरव तनेजा बॉडी बिल्डिंगसाठी आणि न्यूट्रिशनिस्ट म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. म्हणून फ्लाइंग बीस्ट या चॅनेलसोबतच ‘फिट मसल टीव्ही’ आणि ‘रसभरी के पापा’ हे चॅनल्सही ते चालवतात. त्यावर ते फिटनेस टिप्स देत असतात. त्यांच्या या दोन्ही चॅनलला देखील मिलियनमध्येच सबस्क्राइबर्स आहेत. इंस्टाग्रामवर देखील त्यांचे ३० लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर ट्विटरवर देखील ७ लाखांपेक्षा जास्त लोक त्यांना फॉलो करतात.
तनेजा सध्या दिल्ली विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेत आहेत. नुकतंच त्यांनी L.L.B फर्स्ट ईअरची परीक्षाही पास केलीये.
असे हे सोशल मीडिया स्टार कोणत्या प्रकरणात अडकले आणि बातम्यांमध्ये आले? हे आता बघूया…
झालं असं की, काल ९ जुलैला गौरव तनेजा यांचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांची पत्नी रितू राठी तनेजा यांनी त्यांना सरप्राईज देण्याचं ठरवलं. त्यांनी गौरव यांच्या फॉलोअर्सना वाढदिवस साजरा करण्यासाठी आमंत्रित केलं. नोएडा सेक्टर -51 मेट्रो स्टेशन ही जागा ठरवण्यात आली. तेव्हा गौरव यांचे हजारो चाहते मेट्रो स्टेशनवर जमले त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
आपल्या आवडत्या युट्यूबरला पाहण्याची इच्छा असल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अचानक झालेल्या गर्दीमुळे मेट्रोच्या प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागल्याचं सांगण्यात आलं. सगळी वाहतूक ठप्प झाली होती.
जशी याची माहिती पोलिसांना झाली तसं पोलिसांची घटनास्थळी एंट्री झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून घटनास्थळावरून युट्यूबर गौरव तनेजा यांना ताब्यात घेतलं. दोन तास ताब्यात घेतल्यानंतर तनेजा यांना नोएडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर कलम ३४१ आणि १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
नोएडामध्ये कलम १४४ लागू असताना परवानगी न घेताच जमावाला सेलिब्रेशनला बोलावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मात्र, या प्रकरणी त्यांना जामीनही मिळाला आहे.
अशा या सगळ्या प्रकरणामुळे गौरव तनेजा ट्रेंडिंग होते. पण अशाप्रकारे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये.
२०२० मध्ये जेव्हा त्यांना एअरएशियाने पायलट म्हणून निलंबित केलं होतं, तेव्हा ते पहिल्यांदा चर्चेत आले. एअरएशिया कंपनीने स्वस्तात तिकीट देण्याच्या नादात सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप तनेजा यांनी केला होता, ज्यामुळे आपल्याला सस्पेंड करण्यात आलं होतं, असं गौरव म्हणाले होते. त्यांच्या सस्पेन्शननंतर एअरएशियाची चौकशी DGCA मार्फत केली गेली होती.
त्यानंतर मार्च २०२२ मध्ये जेव्हा काश्मीर फाईल्स चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा देखील गौरव तनेजा यांचं नाव पुढे आलं होतं. त्यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या समर्थनार्थ फ्री तिकीट वाटले होते. जे लोक तिकीट अफोर्ड करू शकत नाही अशांसाठी त्यांनी दिल्लीतील एक पूर्ण थिएटर बुक केलं होतं. ज्यामुळे चित्रपटाचे डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांना ‘थँक्स’सुद्धा म्हणलं होतं.
मे २०२२ मध्ये गौरव पुन्हा एका वक्तव्यामुळे प्रकाशझोतात आले होते. त्यांच्या ट्विटरवर कुटुंबासह हवन करतानाच फोटो त्यांनी शेअर केला होता. ज्याला कॅप्शन दिलं होतं – हिंदू धर्म ही विज्ञानाधारित जीवनपद्धती आहे. ३ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळ गॅस लीक घटनेपासून फक्त दोन कुटुंबे सुरक्षित राहिली होती. कारण त्यांनी हवन केलं होतं.
हवन केल्याने विषारी वायूपासून आपण सुरक्षित राहू शकतो, असा दावा त्यांनी केला होता. तेव्हा त्यांना खूप जास्त ट्रोल करण्यात आलं होतं.
असो, सोशल मीडिया स्टार कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यांमध्ये असतातच. पण कधीकधी ते अति उत्साहात मोठ्या गोत्यातही सापडतात, हेच आताच्या बर्थडे प्रकरणावरून स्पष्ट होतंय.
हे ही वाच भिडू :
- बाकीचे युट्युबर सोडा खुद्द दळणवळण मंत्री नितीन गडकरीसुद्धा युट्युब वापरून ४ लाख कमावतायत…
- या भिडूनं फक्त कंबर हलवून टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर कल्ला केलाय !
- यु ट्यूबवर धमाका करणारी मराठी पोरगी थेट मिशेल ओबामा यांच्यापर्यंत जाऊन पोहचलीय…