इटलीच्या त्या दौऱ्यात आलेल्या अनुभवानंतर गौतम अदानी पवारांचे कायमचे फॅन झाले..

गौतम अदानी आणि शरद पवारांची आज भेट झाली आणि साहजिकच ही बातमी आली ट्रेंडिंगला. याआधी अदानींनी बारामती दौरा केला, तीही ब्रेकिंग न्यूज ठरली. सध्याच्या भेटीवरुन बरेच आडाखे बांधले जात आहेत…
मात्र शरद पवार आणि गौतम अदानी यांचे पुर्वापार संबंध खूपच चांगले आहेत. त्याचाच हा इतिहास..
सुरवात करुया शरद पवार गौतम अदानी यांच्याबद्दल काय लिहतात यापासून. तर शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात त्यांचा उल्लेख केला आहे.
यात ते सांगतात की
सध्या बोलबाला झाला आहे या तरुण उद्योजकाला मी फार वर्षांपासून ओळखतो. कमालीचा कष्टाळू आणि साधा. शून्यातून त्याने आपलं आजचं साम्राज्य उभे केलं आहे.
या पुस्तकात गौतम अदानी यांनी कसे मुंबईच्या लोकलमध्ये छोट्या छोट्या वस्तूंची विक्री करत आपल्या व्यवसायाला सुरवात केली, पुढे ते हिऱ्याच्या उद्योगात आले याच वर्णन केलेलं आहे. हिऱ्यांच्या व्यवसायात प्रचंड पैसा होता मात्र अदानी यांना त्यात विशेष रस नव्हता. त्यांचं लक्ष होत पायाभूत सुविधांच्या उद्योगउभारणीकडे. मधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला.
तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याशी गौतम अदानी यांचे जवळचे संबंध होते. यातूनच त्यांना मुंद्रा येथे बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव चिमणभाई यांच्यासमोर ठेवला. मुंद्रा हे वाळवंटी बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा जवळ असल्यामुळे तिथल्या बिकट परिस्थितीची जाणीव चिमणभाई यांनी अदानी यांना दिली होती. हे सर्व माहीत असूनही गौतम यांनी तिथे अत्याधुनिक बंदर उभारण्याचे शिवधनुष्य उचलले.
आज पन्नास हजार एकरमध्ये पसरलेले हे बंदर देशातील सर्वात मोठे आणि अद्यावत बंदर आहे.
पुढे गौतम अदानी हे वीजप्रकल्पाना कोळसा पुरवण्याच्या उद्योगात आले. या निमित्ताने त्यांची शरद पवार यांच्याशी काही वेळा भेट झाली. तेव्हा पवारांनी त्यांना सुचवलं,
“कोळसा पुरवण्याच्या सोबतच ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही तुम्हीच उतरा.”
पुढे एकदा भंडारा येथे प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी गोळा झाली होती. तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. पटेलांशी घरगुती मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे गौतम अदानी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या प्रसंगी आपल्या भाषणात बोलताना प्रफुल पटेल यांनी भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी शरद पवारांनी मदत करावी असे आवाहन केले. याच उत्तर देताना शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले,
” उद्योग येतील पण तुम्हालाही सहकार्य करावे लागेल. आज गौतम अदानी आले आहेत. त्यांना मी विनंती करतो की, ऊर्जानिर्मितीसाठी या परिसरात त्यांनी प्रकल्प उभा करावा.”
अदानी यांनी देखील आपल्या भाषणात याला सकारात्मकपणे प्रतिसाद दिला. शरद पवार म्हणतात,
“सर्वसाधारणपणे व्यासपीठावर केलेल्या वक्तव्यातून फार काही घडतंच असं नाही. पण गौतमनी हा विषय लावून धरला. त्यानं भंडाऱ्यात ऊर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला.”
तिरोरा येथे औष्णिक ऊर्जाप्रकल्प उभा करायचं ठरलं. राज्यापासून केंद्रपातळीवर याला मान्यता मिळाली.
तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतः या प्रकल्पाच्या उदघाटनासाठी भंडारा गोंदिया दौऱ्यावर येणार होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत ९ फेब्रुवारी २००८ रोजी हा कार्यक्रम होणार होता. पण दुर्दैवाने याच दिवशी थोर समाजसेवक पदमविभूषण बाबा आमटे यांचे निधन झाले आणि हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
गौतम अदानी यांनी विक्रमी वेळेत हा प्रोजेक्ट पूर्ण केला. सप्टेंबर २०१२ रोजी औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे पहिले युनिट कार्यान्वित करण्यात आले. आज अदानी उद्योगसमूहाचे जवळपास बारा हजार मेगावॅटचे ऊर्जाप्रकल्प उभे आहेत अथवा उभारणीच्या प्रक्रियेत आहेत.
शरद पवार सांगतात,
“रात्रंदिवस काम करणारा आणि अतिशय साधा असणारा हा तरुण उद्योजक जमिनीवर पाय ठेवून आहे.”
आत्ता गौतम अदानी शरद पवारांबद्दल काय लिहतात ते पाहूया,
शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त गौतम अदानी यांनी प्रेस नोट जाहीर केली, त्यामध्ये ते लिहतात,
एकदा मी शरद पवारांसोबत इटलीच्या दौऱ्यावर गेलो होतो. तिथल्या सुप्रसिद्ध नॅशनल बफेलो स्पेजिस फार्मस असोशिएशन ला आम्ही भेट दिली होती. त्या भेटील तिथले अधिष्ठाता आम्हाला पशुसंवर्धनाविषयी माहिती देत होते. म्हशींना कोणते खाद्य द्यावे लागले, दुधाचा निकष कसा ठरवावा लागतो, त्याचा चीजवर काय परिणाम होतो हे सर्व ते तज्ञ लोक सांगत होते. तेव्हा शरद पवारांनी त्यांना काही प्रश्न विचारले.
पवारांचे प्रश्न ऐकून तिथले तज्ञ चकित झाले. तिथले लोक शरद पवारांचे फॅन बनून गेले. सोबत गौतम अदानीसुद्धा.
अदानी कुटूंब व पवार कुटूंब एकत्र सहलीला गेलो होते. तेव्हा प्रत्येकाला बसायला जागा आहे हे ते शेवटपर्यन्त पहात मगच आपल्या जागेवर बसत. यातूनच पवारांची दूरदृष्टी दिसते.
अशा अनुभवांबाबत अदानींनी शरद पवारांवर लिहलेलं आहे.
हे ही वाच भिडू
- अदानी, बिर्ला ते हिरानंदानी : योगींनी युपीत 80 हजार कोटींची गुंतवणूक खेचून आणलेय..
- राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांच नाव चर्चेत आलं.. पण कुठून आणि कसं..?
- घोडेबाजारवरून आठवलं, पवारांनी एकदा घोड्यांच्या रेसमध्ये ५ रुपये लावून अन् ५५ रुपये जिंकलेले