गुजरातमध्ये एकदा गौतम अदानी यांनांच किडनॅप केलं होतं.

साधारण ऐंशीच्या दशकातली गोष्ट आहे. गुजरातच्या शांतीलाल आणि शांता अदानी या जोडप्याच्या सात पोराबाळा पैकी एक म्हणजे गौतम. शिकायला कॉलेजला मुंबईला. घरचा मूळ बिझनेस कापडाचा. गुजरातच्या रक्तात धंदा वाहतो. गौतमच्या डोक्यातसुद्धा कायम धंदाच असायचा. कॉलेजमध्ये लक्ष नव्हतं. तिथ सुद्धा हिरे विकायचा बिझनेस करता येत का बघायचा.

शेवटी मोठ्या भावाने परत गावी बोलवून घेतल. कॉलेजवालं शिक्षण निम्म्यात  सुटल. जिंदगीवाल शिक्षण सुरु झालं.

भावाने विक्रीपूर्वी साड्यांना झाकायला जे प्लास्टिक कव्हर असत ते बनवण्याचा बिझनेस सुरु केला होता. गौतमला त्यात घेतल. त्याने आपल्या अक्कलहुशारीने धंदा वाढवला. प्लास्टिक पाईपला भविष्यात मागणी आहे हे त्याने ओळखल. लायसन्स राजमुळे त्याकाळात प्लास्टिकच्या आयातीवर बरेच कडक नियम होते. गौतम अदानीने आपली खास चक्रे फिरवून हे लायसन मिळवले.

थोड्याच दिवसात पीव्हीसी पाईपचा तो गुजरातचा सर्वात मोठा आयातदार बनला.

वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्याने स्वतःची अदानी एक्सपोर्टस लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. काही वर्षातच आलेल्या जागतिकीकरणामुळे बऱ्याच भारतीय कंपन्यांचे नुकसान झाले पण धूर्त गौतम अदानीनी यातून फायदाच शोधला. आपला आयात निर्यातीचा धंदा मोठा केला. टेक्स्टाईल, केमिकल्स, अॅॅॅग्रोप्रोडक्टस अशा अनेक गोष्टी अदानींची फर्म एक्स्पोर्टइम्पोर्ट करू लागली.

बऱ्याचदा यासाठी मुंबई आणि कांडलाच्या बंदरावर अवलंबून राहावं लागत होतं. बऱ्याचदा अदानींचे कनसाइनमेंट अडकून पडलेले असायचे. गुजरातमध्ये एक नवीन बंदर व्हावे अशी गौतमभाईची इच्छा होती. त्याने आपल्या राजकारणी मित्रांच्या मार्फत सूत्रे हलवायला सुरवात केली. १९९४ साली तेव्हाच्या गुजरात सरकारने त्यांना मुंद्रा गावातील १००० हेक्टर जमीन मीठ बनवण्यासाठी कराराने दिली.

काही दिवसातच तिथे बंदर बांधण्याची घोषणा केली गेली. हे कॉन्ट्रक्ट सुद्धा गौतम अदानी यांना मिळालं. हाच तो क्षण होता की अदानीच भाग्य बदलणार होतं. 

कोणताही अनुभव नसताना गौतम अदानी यांनी पुढच्या चार वर्षात जागतिक दर्जाचं बंदर बनवून तयार केलं. त्यांच्या नावाचा डंका अख्ख्या गुजरातमध्ये वाजू लागला. आता नाव झालय म्हटल्यावर त्याच्या बरोबर साईड इफेक्ट सुद्धा येणार. तसच झालं.

गौतम अदानी यांना खंडनीसाठी धमक्या येऊ लागल्या. सहाजिकच त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.

१ जानेवारी १९९८ संध्याकाळची वेळ. गौतम अदानी आणि त्यांचा एक मित्र एका अलिशान कारने अहमदाबादमधल्या कर्णावत क्लबमधून निघाले. मोहमदपुराच्या आसपास पोहचल्यावर त्यांची कार एका स्कूटरने अडवली. चेहऱ्यावर कापड गुंडाळलेल्या दोन बदमाशांनी पिस्तुल दाखवून त्यांना बाहेर काढलं. पिक्चर मध्ये दाखवतात त्याप्रमाणे एक मारुती व्हॅन आली. गौतम अदानींना त्या व्हॅनमध्ये ढकलण्यात आलं.

काही वेळाने अदानींच्या घरी फोन आला,

“तुमचा नवरा किडनॅप झाला आहे.”

काही दिवसातच अदानींची सुटका झाली. असं म्हणतात की त्यांच्या कुटुंंबाने १५ कोटीची खंडनी नेऊन दिली. या किडनॅपींगची कधीच पोलीस केस करण्यात आली नाही. अदानीच्या साठी ते एक फक्त दुःखद स्वप्न होते. त्यांनी ते प्रकरण कायमचे आपल्या आयुष्यातून फाडून टाकले. तसंही १५ कोटी म्हणजे त्यांच्यासाठी चिल्लर होती. जीव वाचला हे महत्वाच.

कुजबुजत्या आवाजात चर्चा झालीच की फजलू रेहमान नावाच्या एका सराईत खंडनीखोराने त्याचं अपहरण केलं होतं. भारतातला सर्वात मोठा किडनॅपर बबलू श्रीवास्तवपासून अनेकांचं यात संगनमत होतं. सर्वात शेवटचा धागा दुबईला जाऊन मिळत होता. तक्रार नसल्यामुळे पोलीसानी काही कारवाई केली नाही.

पुढच्या काही वर्षात गुजरातमध्ये सत्तांतर घडून आले. पक्षाची आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्रे नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्याकडे सोपवण्यात आली. मोदी आणि अदानी यांची भेट पहिली कधी हे नक्की कोणी सांगू शकणार नाही.  दोघांची मैत्री मात्र घट्ट होती.

 २००२साली झालेल्या दंगलीनंतर अनेक कंपन्या गुजरातमध्ये येण्यास उत्सुक नव्हत्या. तेव्हा मोदींनी गुजरातमधल्या गुंतवणुकीचा विषय प्रतिष्ठेचा केला.

व्हायब्रंट गुजरात नावाचा एक कार्यक्रम मोठा गाजत वाजत केला, देशोदेशीच्या उद्योगपतींना बोलवलं, त्यांना गुजरातमध्ये कंपनीसुरु करण्याचे फायदे सांगितले. त्या दिवशी गौतम अदानीनी गुजरात मध्ये १५ हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याच जाहीर केलं. मोदींच्या या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ला अदानी यांनी दिलेलं हे गिफ्ट आहे असच मानलं गेल.

एकेकाळी गुजरातमध्ये १५ कोटींची खंडनी देणाऱ्या अदानीनी तिथे १५ हजार कोटी गुंतवले होते.

पुढे मोदी राजकारणात आणि अदानी आपल्या व्यवसायात यशाचं एकापाठोपाठ एक शिखर ओलांडत गेले. आज सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी भारतातील सर्वात शक्तिशाली नेता आहेत. तर नुकताच  फोर्म्ब्सने गौतम अदानी यांना अंबानी यांच्या नंतरचा भारतामधला दोन नंबरचा श्रीमंत हा खिताब दिलाय.

आणि अदानी यांना किडनॅप करणाऱ्या फजलू रेहमानच काय झालं?  

त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद झालेले होते. पूर्वी बऱ्याचदा अटकही झालेली होती. पण अदानीच्या किडनॅपींगनंतर त्याची आणि त्याच्या साथीदारांच्यामध्ये १५ कोटींच्या वाटणीवरून भांडणे झाली. खून झाले. अखेर फजलू नेपाळ मार्गे सीमापार जाण्यात तो यशस्वी झाला. असं म्हणतात की दाऊद इब्राहीमचा त्याच्या डोक्यावर हात होता. लष्करे तैयब्बाच्या आश्रयाखाली सुद्धा तो काही काळ राहिला.

अनेक वर्षांनी त्याला बिहार जवळच्या नेपाळ सिमेवर अटक झाली. त्याच्यावर अनेक केस आजही सुरु आहेत. यात अदानीच्या किडनॅपींगची केस सुद्धा होती पण पुरेशा पुराव्यांच्या अभावी त्याची सुटका झाली. सध्या दिल्लीच्याच तिहार जेल मध्ये त्याचा मुक्काम असतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.