सेबीच्या एका पॉलिसीमुळे गौतम अदानी गोत्यात येऊन रामदेव बाबांची दिवाळी होणार आहे…

आज सकाळी एक बातमी आली, ती म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने देशातील उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा धक्का दिलाय. सेबीने अदानी ग्रुपची कंपनी अदानी विल्मरच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगला (IPO) तात्पुरती स्थगिती दिलीये. हे प्रकरण जवळपास ४५०० कोटींच्या किमतीचे होते.

दरम्यान, ही स्थगिती सेबीच्या एका पॉलिसी अंतर्गत देण्यात आल्याचे समजतंय.

सेबीची पॉलिसी नेमकी आहे तरी काय ?

खरं तर, कंपन्या आणि किरकोळ गुंतवणूकदार इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आयपीओ बाजारात इंटरेस्ट दाखवतायेत. आयपीओ आणण्यासाठी कंपन्या रांगेत उभ्या आहेत. याच रांगेत अदानी ग्रुपचा सुद्धा नंबर लागतो. मात्र, अदानी ग्रुपच्या विरुद्ध आधीच कायदेशीर तपास सुरू आहे. जो थेट विदेशी गुंतवणुकीशी संबंधित आहे.

सेबीच्या पॉलिसीनुसार जर कंपनीची सेबीच्या कोणत्याही विभागाकडून चौकशी सुरु असेल आणि त्याच्याशी संबंधित इतर कोणतीही संस्था आयपीओसाठी अर्ज करत असेल तर कंपनीला ९० दिवसांसाठी मान्यता मिळणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे यात आणखी ४५ दिवसांची वाढ होऊ शकते.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, कृषी कमोडिटी कंपनी अदानी विल्मरचा IPO स्थगित वर्गात ठेवण्यात आलाय. अदानी विल्मर ४५०० कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ आणण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनीने अलीकडेच सेबीकडे २ ऑगस्टला अर्ज केला होता.

अदानी विल्मर ही अदानी समूहाची सब्सिडियरी कंपनी आहे, जी पोर्ट ते एनर्जी पर्यंत कारभार करते.

त्याचवेळी, अदानी समूहाचे म्हणणे आहे की, त्यांना या संदर्भात सेबीकडून कोणतीही औपचारिक माहिती प्राप्त झालेली नाही. तसेच थेट विदेशी गुंतवणुकीशी आमचा काहीही संबंध नाही. हा मुद्दा वारंवार मांडला जात आहे. या मुद्द्याद्वारे पुन्हा एकदा गुंतवणूकदार समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. परदेशी थेट गुंतवणूकदार देखील अदानी समूहाच्या इतर गुंतवणूकदारांच्या बरोबरीचे आहेत.

 अदानी विल्मर ही अदानी समूह आणि विल्मक यांची संयुक्त कंपनी आहे.

१९९९ मध्ये अदानी विल्मरची स्थापना झाली. अदानी ग्रुप आणि सिंगापूर मधल्या विल्मर यांच्यातला हा संयुक्त उपक्रम आहे. लोकप्रिय ब्रँड फॉर्च्युन खाद्यतेलाव्यतिरिक्त, कंपनी बासमती तांदूळ, आटा, मैदा, रवा, रवा, डाळी आणि बेसन सारख्या विभागांमध्ये काम करते. अदानी विल्मारमध्ये अदानी एंटरप्रायझेसची ५० टक्के हिस्सेदारी आहे.  अदानी विल्मरमधील उर्वरित ५० टक्के भाग सिंगापूर मधल्या विल्मरकडे आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात अदानी विल्मर लिमिटेडचा निव्वळ नफा ६५४.५६ कोटी रुपये आहे.

जर कंपनीची आयपीओ योजना यशस्वी ठरली तर बाजारात सूचीबद्ध होणारी ही अदानी समूहाची सातवी कंपनी असेल. अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक क्षेत्र, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जी यांचा समावेश आहे.

दरम्यान,  अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सभागृहात अदानी समूहाबाबत मोठा खुलासा केला. चौधरी म्हणाले, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) अदानी समूहाच्या काही कंपन्यांची चौकशी करत आहे. ही चौकशी सेबीच्या नियमनशी संबंधित आहे. ईडीकडून कोणताही तपास केला जात नाही. ते म्हणाले की, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकीची दैनंदिन व्यापार आधारावर आहे.

मॉरिशिअसच्या कंपनीचीही चौकशी सुरु

अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेसशी संबंधित मॉरिशस गुंतवणूकदारांची देखील सेबी चौकशी करत आहे. मिलेल्या माहितीनुसार, सेबीला मॉरीशस नियामककडून अद्याप या तपासणीसंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.

असं म्हंटल जातंय कि, अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मरचा बाबा रामदेव यांची कंपनी रुची सोया यांच्याशी थेट टक्कर आहे. बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेदने गेल्या वर्षी दिवाळखोरी प्रक्रियेदरम्यान रुची सोया खरेदी केली होती. अदानी विल्मरला मात देत पतंजलीने रुची सोया खरेदी केली होती. त्यामुळे सध्या रामदेव बाबांची दिवाळी होणार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

यापूर्वी जूनमध्ये सेबीने कमी किमतीच्या विमान कंपनी गोफर्स्टच्या आयपीओवरही बंदी घातली होती. वाडिया आणि बॉम्बे डाईंग, कंपनीचे प्रवर्तक यांच्या विरोधात प्रलंबित तपासांमुळे ही बंदी लागू करण्यात आली होती.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.