अतिरेक्यांना माहीत नव्हतं भारतातला सर्वात श्रीमंत माणूस आपल्या तावडीत सापडलाय..

२६ नोव्हेंबर २००८, संध्याकाळची वेळ 

स्थळ ताज हॉटेल मुंबई 

भारतातल्या सर्वात आलिशान समजल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी  होती. अनेक प्रतिष्ठित लोक पार्टी करत होते. कोणी बिझनेस डिस्कशन करत होतं तर कोणी आपल्या गर्लफ्रेंडबोबर रोमँटिक डेट वर आलं होतं.

यातच होते भारतातील सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक गौतम अदानी. 

ताज हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मसाला वेदर क्राफ्ट रेस्टोरंटमध्ये दुबई पोर्टचे सीईओ मोहम्मद शराफ यांच्या बरोबर त्यांची बिझनेस मिटिंग सुरु होती. त्यांचं टेबल थोडंसं उंचावर असल्यामुळे वरून त्यांना सर्व काही दिसत होतं.

कॉफी आणि गप्पा चालू होत्या आणि अचानक त्यांना फायरिंगचा आवाज आला. खालच्या मजल्यावर काही तरी गडबड झाली होती. लोक इकडे तिकडे धावत होते. काही क्षणातच त्यांना हातात एके ४७ घेऊन गोळीबार करत असलेले दोन तरुण दिसले. स्विमिंगपूलच्या दिशेने ते निघून गेले.

अदानी यांना घाम फुटला. ते बसले होते त्याच्या अगदी काही फुटांवर मृत्यूचं तांडव सुरु होतं. 

त्यांना स्वतःचे प्राण तर वाचवायचे होतेच पण सोबत दुबईतुन भेटायला आलेल्या मोहम्मद शराफ यांचीही जबाबदारी त्यांच्यावरच होती. दोघेही जीव मुठीत धरून तिथून धावले ते थेट ताजच्या टॉयलेटमध्ये घुसले.

तोवर तिथे प्रचंड गर्दी जमली होती. नेमकं काय घडतय याची कोणालाच काही कल्पना नव्हती. अदानी आपल्या मोबाईलवरून घरच्यांच्या संपर्कात होते. त्यांना सर्वप्रथम कळालं की हा दहशतवादी हल्ला आहे. फक्त ताज हॉटेल नाही तर मुंबईत सीएसटी स्टेशन, लिओपोल्ड कॅफे, ओबेरॉय हॉटेल अशा अनेक ठिकाणी एकाच वेळी हा हल्ला सुरु झालेला आहे.

आणि हा हल्ला पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्यांनी केला आहे.

हे कळाल्यावर गौतम अदानी यांचा धीरच खचला. बाहेर किंचाळण्याचे गोळीबाराचे आवाज सुरूच होते. टॉयलेटमध्ये लपलेल्या पैकी काहीजण रडू लागले. आपण यातून वाचत नाही याबद्दल सगळ्यांना खात्री पटली होती. तरीही दिवे विझवून आवाज न करता सगळे तिथे उभे होते.

असाच काही वेळ गेला. त्या छोट्याशा टॉयलेटमध्ये आता गर्दीमुळे श्वासोश्वास घेण्यासदेखील त्रास होत होता. कधी काळ बनून अतिरेकी येतील सांगता येत नव्हतं. प्रत्येकाने शेवटचे क्षण मोजण्यास सुरवात केली होती.

जवळपास मध्यरात्र होत आली आणि जोरात कोणीतरी दार ठोठावलं. अदानी यांच्या काळजात धस्स झालं. पण बाहेरून अस्खलित इंग्लिश मधून आवाज आला की

“We are hotel staff. We are here to escort you. Please open the door.”

 तो आवाज ऐकून गौतम अदानी यांच्या जीवात जीव आला. पण संकट अजून टळलं नव्हतं. ताज हॉटेल अजूनही अतिरेक्यांच्या ताब्यात होते. पोलीस आपल्या परीने शर्थीचे प्रयत्न करत होते मात्र अतिरेक्यांनी परदेशी नागरिकांना ओलीस ठेवल्यामुळे त्यांना काही करता येत नव्हते.

त्या हॉटेल स्टाफने आपले प्राण धोक्यात घालून अदानी व इतर शंभर जणांना तळमजल्यावर आणले. तळमजल्याच्या सिक्रेट चेंबरचे दार पक्के बंद करण्यात आले. स्त्रिया लहान मुले यांच्या सकट शेकडोजण तिथे बंधक बनून अडकले होते.

अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज असलेले, सोबत हॅन्ड ग्रेनेड घेऊन आलेले ते क्रूर कर्मा अतिरेकी कधी खाली येतील सांगता येत नव्हतं. टांगती तलवार कायम होती. हॉटेलचे बाहेर जाण्याचे सगळे मार्ग बंद होते. कोणी रडत होतं तर कोणी प्रार्थना करत होतं. कोणी तिथेच सोफ्याखाली लपलेलं होतं. प्रत्येकाला आपल्या घरी जाण्याची ओढ लागली होती.

गौतम अदानी यांचा ड्रायव्हर आणि त्यांचा बॉडीगार्ड कमांडो ताज हॉटेलच्या खाली त्यांची वाट बघत होते. अदानी यांचा अहमदाबादमध्ये आपल्या घरच्यांशी संपर्क सुरूच होताच. टीव्हीवर न्यूज चॅनलवर पाहून नेमकं काय चाललं आहे हे घरचे त्यांना अपडेट देत होते.  

अतिशय घाबरलेल्या स्थितीतही गौतम अदानी आपल्या सोबत अडकलेल्यांना धीर देत होते. पहाटे साधारण साडे तीनच्या दरम्यान एन एस जी कमांडोंनी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पाठीमागचे दार फोडून इमर्जन्सी रस्ता बनवण्यात आला होता. मात्र जेव्हा तिथून काही जणांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा अतिरेक्यांनी गोळ्यांचा वर्षाव सुरु केला. या हल्ल्यात काही हॉटेल स्टाफ मेम्बर मारले गेले.

या हल्ल्यामुळे मदतीचा प्रयत्न थांबवण्यात आला. बाहेर येणारे नागरिक पुन्हा तळमजल्यातल्या चेंबरमध्ये परतले. 

एनएसजीची अतिरेक्यांशी मूठभेड रात्रभर चालूच राहिली. सकाळी साडे आठ वाजता ताज मध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तो यशस्वी ठरला. गौतम अदानी यांच्या सकट हॉटेलमधून शंभरजण बाहेर काढण्यात आले. कमांडोनी त्यांना थेट पोलीस व्हॅन मध्ये बसवलं. सर्वाना तिथून आझाद मैदान येथील पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं. त्यांचं नाव पत्ता व इतर डिटेल्स घेऊन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

आपल्या प्रायव्हेट जेट विमानाने गौतम अदानी गुजरातला सुखरूप परतले. आजही तो अनुभव ते विसरू शकत नाहीत.  

आज गौतम अदानी हे भारतातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. भारत सरकारच्या अनेक उद्योगात त्यांचा सहभाग आहे. जर हा माणूस आपल्या टप्प्यात आहे हे अतिरेक्यांच्या लक्षात आलं असतं तर याची खूप मोठी किंमत चुकवावी लागली असती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.