संघाला २ वर्ल्ड कप जिंकून दिले, पण त्याचं योग्य श्रेय गंभीरला मिळालंच नाही !

२ एप्रिल २०११.

मुंबईचं वानखेडे स्टेडीयम.

महेंद्र सिंग धोनीने श्रीलंकेच्या नुवान कुलशेखराला ग्राउंडच्या बाहेर फेकलं आणि भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. २८ वर्षांच्या विश्वविजयाचा दुष्काळ संपवत भारतीय संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. संघाचा कॅप्टन आणि नॉट आऊट ९१ रन्सची इनिंग साकारून संघाची नैय्या विजयापर्यंत पोचवणारा महेंद्र सिंग धोनी या विजयाचा हिरो ठरला. तोच ‘मॅन ऑफ द मॅच’ देखील निवडला गेला.

फायनलमध्ये श्रीलंकेचे २७४ रन्स चेस करताना भारताने आपल्या इनिंगच्या दुसऱ्याच बॉलवर सेहवागला गमावलं होतं आणि सचिनही १८ रन्स करून परतला होता. अवघ्या ३१ रन्सवर भारताने आपल्या २ बहुमुल्य विकेट्स गमावल्या होत्या. अशा वेळी क्रीझवर होता सेहवाग आउट झाल्यानंतर क्रीझवर येण्यासाठी तयार होण्याची वेळ देखील न मिळालेला गौतम गंभीर आणि विराट कोहली.

gauti kohli
गंभीर – विराट जोडीने २०११ सालच्या विश्वविजयाचा पाया रचला !

विराट कोहली त्यावेळी त्याअर्थाने नवखाच होता. अशा वेळी गंभीरने पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि या २ दिल्लीकर खेळाडूंनी भारतासाठी ८५ रन्सची पार्टनरशिप उभारली. खरं तर मॅचचा रंग पालटला होता तो इथेच.

गंभीर-कोहली पार्टनरशिप हा या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. याच पार्टनरशिपने भारताच्या विजयाचा पाया रचला.

वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये २७४ रन्स चेस करताना आणि संघाचे २ प्रमुख फलंदाज स्वस्तात परतलेले असताना गौतम गंभीरवर काय प्रेशर असेल याची आपल्याला कल्पना देखील करताना येणार नाही. पण हे प्रेशर गंभीरने अगदी लीलया पेललं.

या सामन्यात गौतम गंभीर फक्त स्वतःच लढला नाही तर त्यावेळी नवख्या असलेल्या कोहलीला देखील लढण्यासाठी प्रेरित केलं. गंभीरने कोहलीला सांगितलं होतं,

“बाबा रे, जपून खेळ. मोठे शॉट्स खेळताना तू बाउंड्रीवर पकडला जातोस. आपण टिकलो तर मॅच आपलाच असं समज”

(ते खरं ही होतं म्हणा. करिअरच्या सुरुवातीच्या काळात कोहली आज जितक्या सहजतेने बॉल ग्राउंडच्या बाहेर फेकतो, तसा फेकायला जमायचं नाही. आपल्याला आठवत असेल तर सुरुवातीच्या काळात तो अनेकदा बॉल ग्राउंडच्या बाहेर फेकण्याच्या नादात बाउंड्रीवर आउट झालाय )

dhoni
गंभीर-धोनी जोडीने संघाचा विश्वविजय निश्चित केला !

मॅचच्या २२ व्या ओव्हरमध्ये दिलशानने ३५ रन्सवर असताना स्वतःच्याच बॉलिंगवर कोहलीचा कॅच पकडला त्यावेळी भारताच्या ११४ रन्स झाल्या होत्या. अजून अर्धा किल्ला लढायचा होता. पण आता एक विश्वास निर्माण झाला होता. त्यानंतर नियमितपणे बँटिंगला येणाऱ्या युवराज सिंगच्या जागी धोनी क्रिझवर आला आणि पुढे गंभीर-धोनी जोडीने अगदी सहजपणे भारताला विजायाच्या समीप नेऊन ठेवलं.

सामन्याच्या ४२ व्या ओव्हरमध्ये ९७ रन्सवर असताना परेराने गंभीरला बोल्ड केलं आणि काळजाचा ठोका चुकला.

त्या सामन्यात गंभीरने कदाचित आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग खेळली होती. त्या सामन्यातलं गंभीरचं हुकलेलं शतक एवढाच एक भारताच्या विश्वविजयाला लागलेला काळा ठिपका होता, असं अजूनही वाटतं.

गंभीर गेला त्यावेळी भारताला जिंकण्यासाठी फक्त ५२ बॉल्समध्ये ५२ रन्स हव्या होत्या. धोनी-युवराजसाठी हे काही फार मोठं काम नव्हतंच. अपेक्षेप्रमाणे त्यांनी ते पार पाडलं.

या सामन्यातली धोनीची इनिंग निर्विवादपणे महत्वाची होती, पण त्यापेक्षा कैक पटीने गंभीरची इनिंग महत्त्वपूर्ण होती. धोनी क्रीझवर आला त्यावेळी संघाने शंभरी पार केली होती आणि संघ जिंकू शकतो हा विश्वास निर्माण झाला होता. पण सचिन-सेहवागच्या जाण्यानंतर संघाला हा विश्वास देण्याचं काम गंभीरने केलं होतं.

अंडर प्रेशर साकारलेल्या गंभीरच्या या इनिंगला तोडच नव्हती.

पण या विश्वविजयाचं जेवढं श्रेय कॅप्टन आणि खेळाडू म्हणून देखील महेंद्र सिंग धोनीला मिळालं तेवढं तर सोडाच पण ज्या श्रेयावर त्याचा न्याय्य हक्क होता ते देखील त्याला मिळालं नाही, याची खंत क्रिकेटप्रेमी म्हणून बऱ्याचवेळा सलत राहते.

हे असं काही २०११ विश्वचषकाच्या वेळी प्रथमच झालं नव्हतं तर २००७ साली दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे खेळवल्या गेलेल्या  टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानला हरवून पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी देखील गंभीरच्या बाबतीत असंच काहीसं झालं होतं.

gauti
गौतम गंभीरच्या ७५ रन्सच्या इनिंगने भारताच्या विश्वविजयाचा पाया रचला !

पहिली बॅटिंग करताना भारताने उभारलेल्या १५७ रन्समधले जवळपास अर्धे रन्स तर गंभीरनेच काढले होते. ५४ बॉल्समध्ये ७५ रन्स. पण यावेळी देखील ४ ओव्हर्समध्ये १६ रन्स देऊन ३ विकेट्स घेणारा इरफान पठाण ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता. अर्थात इरफानने कम्माल बॉलिंग केली होती यात शंकाच नाही.

श्रेयाच्या बाबतीत गौतम गंभीर तितकाच दुर्लक्षित राहिला जितका राहुल द्रविड राहिला. सचिनच्या सावलीत राहुल द्रविडचं जे झालं, तेच महेंद्र सिंग धोनीच्या सावलीत गौतम गंभीरचं झालं.

आता तर त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीचा अध्यायच संपवलाय. वर्तमानात जरी गंभीरला योग्य श्रेय देण्यात आपण कमी पडलो असलो, तरी भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू म्हणूनच गौतम गंभीर कायम भारतीय क्रिकेटच्या इतिहासात लक्षात ठेवला जाईल, एवढं नक्की.

  • अजित बायस

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.