गावस्करांच्या शेवटच्या मॅचला झालेला राडा भारतीय संघ कधीच विसरू शकत नाही….

सुनील गावस्कर म्हणजे भारतीय क्रिकेट संघाची सलामीची भिंत होती. समोर कितीही फास्टर बॉलर असो त्याची हयगय न करणे आणि त्याचा निकराने सामना एवढंच गावस्करांच्या डोक्यात असायचं. हेल्मेट न घालता अनेक जबरी विक्रम गावस्करांनी आपल्या नावावर केले खरे पण कधी कधी असं घडतं की आपलं बेस्ट पण तिथं चालत नाही. 

तर असाच किस्सा घडलेला सुनील गावस्करांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात.

1987 साली पाकिस्तानविरुद्ध पाच मॅचची टेस्ट सिरीज खेळून गावस्कर रिटायर्ड होणार होते तोवर गावस्करांनी जवळपास बरेच विक्रम रचून त्यावर आपलं नाव कोरून ठेवलेलं होतं. पण ही सिरीज एखादं वाईट स्वप्न पडावं अशी होती. गावस्करांनी या सिरीजच्या 5 मॅच पैकी 4 मॅचेस खेळल्या होत्या. या मॅचच्या इनिंग मिळून गावस्करांनी फक्त 295 रन केलेले होते.

सिरीजमध्ये सगळ्यात जास्त रन बनवणाऱ्यांच्या यादीत गावस्कर थेट 7 नंबरला होते.

पाच मॅचच्या सिरीजपैकी पहिल्या चार मॅचेस ड्रॉ राहिल्या. शेवटची मॅच ही निर्णायक ठरणार होती. शेवटची मॅच बंगलोरमध्ये खेळली जाणार होती त्याच्या अगोदरच गावस्करांनी आपली निवृत्ती घोषित केली होती. ही मॅच यादगार बनवायची आणि गावस्करांना विजयी निरोप देण्याचा भारताचा मानस होता. 17 मार्च 1987 रोजी या मॅचमध्ये मोठा ड्रामा झालेला.

या मॅचच्या अगोदरच पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खान मोठ्या दबावात होता कारण पाकिस्तानी खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममधल्या चर्चा बाहेर पडत होत्या आणि त्यामुळे जगभर पाकिस्तानी खेळाडूंची बदनामी सुरू होती. 

भारतात खेळून झाल्यावर इम्रानने असा आरोप केला होता की ही पिच भारतीय बोलर्सच्या हिशोबाने बनवण्यात आली होती. कारण या मॅचला मनिंदर सिंगने तब्बल 7 विकेट घेऊन पाकिस्तानचं कंबरडं मोडलं होतं. 116 धावांवर ऑल आउट झाल्याने पाकिस्तानच्या बत्त्या गुल झाल्या होत्या.

भारताची सुद्धा सुरवात वाईट झाली आणि 21- 21 धावांवर शास्त्री आणि श्रीकांत आउट झाले.

भारताचा पहिल्या दिवशीचा खेळ 68-2 असा होता. पण नंतर पाकिस्तानी स्पिनर्सने डोकं वर काढलं आणि भारताचा डाव 146 धावांवर उरकला. दुसऱ्या इनिंगला खेळ टाईट झाला. गावस्करांच्या विरुद्ध जोरदार अपील होऊ लागल्या होत्या आणि पाकिस्तानी खेळाडू अँपायरला दबावात आणू बघत होते. गावस्करांनी एक बाजू लावून धरलेली होती.

भारताच्या विकेट पडू लागल्या होत्या. कपिल देव बाद झाल्यावर तर भारत कोमातच गेला होता. 

50 हजार प्रेक्षकांचा क्राऊड कोण जिंकेल यावर चर्चा करत होता. पण अजूनही पाकिस्तानच्या विजयामध्ये सुनील गावस्कर उभे होते. 96 धावांची झुंजार बॅटिंग त्यांनी केली होती पण 185 च्या टोटलवर गावस्कर आउट झाले आणि भारत पराभवाच्या छायेत गेला. रॉजर बिन्नी आउट झाले आणि 16 धावांनी भारत पराभूत झाला. पहिल्यांदाच भारत पाकिस्तानविरुद्ध भारतात हरला.

सुनील गावस्कर यांनी विजय खेचून आणायचा भरपूर प्रयत्न केला पण यश आलं नाही. भारतीयांना याचं बऱ्याच दिवस अपराधीपण जाणवत राहिलं की गावस्करांना विजयी  निरोप देण्याचं तेव्हढं राहिलंच….

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.