मामा-भाच्याची ही घराणेशाही मुंबईकरांसाठी आजही कौतुकाचा विषय आहे.. 

घराणेशाहीवर बसता उठता टिका होत असतात. या टिका प्रामुख्याने राजकारणाशी संबधित असतात. बाप-मुलगा, काका-पुतण्या यांच्यासोबत मामा भाच्यांची देखील घराणेशाही असते. राज्याच्या राजकारणात अशा मामा भाच्यांच्या देखील प्रसिद्ध जोड्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या याबद्दल आपण निवांत बोलू तूर्तास विषय क्रिकेटचा आहे. 

मुंबईच्या क्रिकेट विश्वात मामा-भाच्चांचा विषय आजही कौतुकाचा ठरतो. या जोडीतल्या मामांच नाव होतं माधव मंत्री आणि त्यांच्या भाच्याचं नाव होतं सुनिल गावसकर. 

आत्ता तुमच्या डोक्यात सहज आलं असेल, म्हणजे सुनिल गावसकर मामांच्या जीवावर पुढे आला असणार, मामा भाच्याचं हे नातं कस होतं हे सांगण्यासाठी एक किस्सा सांगावा लागतो, माधव मंत्री हे उत्तम फलंदाज आणि विकेटकिपर होते. त्यांच्यामुळे मुंबईने तीन वेळा रणजी जिंकली होती.

माधव मंत्री यांच्याकडे वेगवेगळ्या सामन्यांमध्ये मिळालेला भरपूर कॅप होत्या. कसोटीपट्टू म्हणून मिळालेली अशीच एक कॅप माधव मंत्री यांच्याकडे होती. सुनिल गावसकरांनी आपल्या मामांची ती कॅप अगदी सहज म्हणून घेतली आणि घालून पाहिली. सुनिलने ती कॅप घातल्याचे पाहताच माधव मंत्री पुढे आले आणि सुनिलच्या डोक्यावरची कॅप काढून घेत म्हणाले, 

कॅप मिळवावी लागते. 

सुनिल गावसकरला वास्तव गोष्टीचं भान आणून देण्यात माधव मंत्रींचा मोठ्ठा वाटा होता.

माधव मंत्री हे क्रिकेटमधील निवृत्तीनंतर देखील मुंबई निवड समितीचे सदस्य, मंडळाचे कोषाध्यक्ष, संघ व्यवस्थापक, मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राहिले होते. अस म्हणतात की ते कडक शिस्तीचे होते. त्यांच्या शिस्तीचा फटका सुनिल गावसकर यांना देखील बसला होता. 

मंत्री यांना सामन्यापूर्वी नाणेफेकीसाठी आपले सगळे खेळाडू हजर लागत असतं. एक दिवस सुनिल गावसकर नाणेफेकीसाठी पोहचले नाहीत. तेव्हा मंत्री यांना सुनिल गावसकरला सामन्यातून वगळलं.

असाच किस्सा रामनाथ केणी यांच्यासोबत देखील झाला होता. नाणेफेकीसाठी हजर नसल्याने मंत्री यांनी त्यांना देखील सामन्यातून वगळलं होतं. 

सर्वात वयोवृद्ध कसोटी खेळलेले क्रिकेटर म्हणून त्यांची आजही ओळख कायम आहे.

त्यांच्या हूशारीचे किस्से सांगायचे झाले तर एकदा सुनिल गावसकर आणि माधव मंत्री एकत्रित गाडीतून प्रवास करत होते. त्या काळात सुनिल गावसकरने आतराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख केली होती. वेस्टइंडिज सारखे संघ देखील गावसकरला टरकून रहात होते. या काळात सुनिल गावसकरने आपल्या मामांना प्रश्न विचारला होता, 

तुम्ही मला लवकर बाद करण्यासाठी कशी व्युहरचना केली असती. तेव्हा माधव मंत्री म्हणाले, 

मी तुझे स्ट्रेट ड्राईव्हज बंद केले असते.  

क्रिकेटच्या प्रेमापोटी ते वयाच्या नव्वदीतही गल्ली क्रिकेटपासून रणजी सामन्यांच्या मैदानात तळ ठोकून असायचे. नवनवीत खेळाडूंना सतत मार्गदर्शन करत रहायचे. भारतासाठी खेळणारे, तीन वेळा मुंबई संघाचे नेतृत्त्व स्वीकारून रणजी चषक मिळवून देणारे असे माधव मंत्री होते, त्यांच्या भाच्याने देखील पुढे काकणभर सरस कामगिरी करुन दाखवलीचं पण त्याहून अधिक म्हणजे क्रिकेटचं आदर्शपण सुनिल गावसकरने जपला.

दिनांक २३ मे २०१४ रोजी माधव मंत्री यांच निधन झालं. 

संदर्भ : क्रिकेट अक्राइव्ह, भन्नाट २५ संजीव पाध्ये प्रकाशक : उद्वेली बुक्स.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.