जयपूरच्या गायत्री देवींनी काँग्रेसला असं काही हरवलं की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच झाला.

काही गोष्टी सुंदरतेच्या पुढे असतात. जयपूरच्या गायत्रीदेवींच्या सुंदरतेच वर्णन खुशवंतसिंह यांच्यापासून अमिताभ,शाहरुख सर्वांनीच केलं आहे. जगप्रसिद्ध व्होग मासिकाने जगभरातील १० सौंदर्यवतींच्या यादीत त्यांचा समावेश करुन सन्मान केला होता.

पण हि महाराणी दिसायलाच सुंदर होती असं नाही तर या राणीला मोठा जनाधार ही होता. 

राजाजींनी (चक्रवर्ती राजगोपालाचारी) स्वतंत्र पार्टी सुरू केली होती. देशाची स्थिती आणि दिशा सुधारणे हा त्यांचा हेतू होता. या पार्टीच्या कामांनी गायत्री देवी प्रभावित झाल्या होत्या. गायत्री देवींनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी गायत्री देवींच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यापूर्वी गायत्री देवींना राजकारणाचा अनुभव नव्हता.

त्यांनी स्वतंत्र पार्टीचं प्राथमिक सदस्य होण्यासाठी त्यांच्या पतींना गळ घातली. गायत्री देवींनी त्यांच्या पतीला विचारले की मी स्वतंत्र पक्षात सामील होऊ शकते का ? त्यावर त्यांचे पती म्हणाले, का नाही ? ते पुढं म्हणाले की तुला फक्त एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यासाठी ८ आणा खर्च येईल. इतक्या सहजतेने एका महाराणीने पार्टीचं प्राथमिक सदस्यत्व घेतलं. 

अशातच राजाजी एक दिवस जयपूरला आले आणि त्यांनी गायत्री देवींना जाहीर सभेला उपस्थित राहण्यास सांगितले. त्या पहिल्यांदाच जाहीर सभेत सामील होत होत्या. त्याआधी राजघराण्यातल्या खूप कमी स्त्रिया अशा सार्वजनिक मंचावर येत. लोकांना ही या गोष्टीच अप्रूप वाटलं होतं.

पुढं काही दिवसांनी निवडणूका जाहीर झाल्या. त्याच दरम्यान गायत्री देवींना स्वतंत्र पार्टीकडून एक पत्र मिळाल. आणि त्यात लिहिले होते की १९६२ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा उमेदवार गायत्री देवींनी व्हाव. गायत्री देवी तशा निवडणूक लढवायला नाखुषच होत्या. किंबहुना त्यांना असं वाटत हि नव्हतं कि या निवडणुकीत त्यांना कोणी निवडून देईल.

कारण त्याकाळात काँग्रेसची ताकद खूप मोठ्या प्रमाणावर होती. आणि त्या काळातच काँग्रेसच्या उमेदवारांसमोर टिकाव धरणं असेल वा त्यांच्या विरोधात उभं राहणं, परिस्थितीच वेगळी होती. त्यांनी जेव्हा त्यांच्या पतींकडे याविषयीचा सल्ला मागितला, तेव्हा त्यांचे पती म्हंटले की, तू निवडणुकीसाठी जरूर उभं रहावस. जिंकणं न जिंकणं यापुढच्या गोष्टी आहेत.

पुढे आपल्या पतीचा सल्ला मानून गायत्री देवींनी निवडणुकीत उभं राहायचं ठरवलं. त्या पहिल्यांदाच आपल्या भागाचा दौरा करु लागल्या. लोकांना भेटू लागल्या. गायत्री देवींच्या मृदू आणि प्रेमळ स्वभावाला लोक भाळु लागले.

यथावकाश निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल हा संपूर्ण देश काय, संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. कारण गायत्री देवींनी काँग्रेसच्या उमेदवाराला धोबीपछाड देत, आपल्या पहिल्याच निवडणुकीत एकूण २ लाख ५० हजार २७२ पैकी १ लाख ९२ हजार ९०९ मतांनी विजय मिळवला. हा त्यांचा रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये समाविष्ट करण्यात आला. कारण आतापर्यंत भारतात एकही उमेदवार इतक्या मतांनी जिंकला नव्हता.

त्यावेळी गायत्री देवींच्या ऐतिहासिक विजयानंतर, तो विजय साजरा करण्यासाठी अवघ जयपूर रस्त्यांवर आलं होतं. 

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.