डाळिंब द्राक्षे असो किंवा हापूस, महाराष्ट्राच्या फळशेतीचं क्रेडिट या पंजाबच्या माणसाला जातं.
महाराष्ट्राला दगडा धोंड्याचा प्रदेश म्हटलंय. निम्म्याहून अधिक राज्यात कायम दुष्काळ पाचवीला पुजलेला. पारंपरिक शेतीमधून येणारे उत्पादन बेभरवशाचे होते म्हणूनच कृषिप्रधान राज्य असूनही म्हणावे तेवढे शेतीतून उत्पादन घेता येत नव्हते.
पण आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी यावरही उपाय शोधून काढला.
“फलोत्पादन”
या फलोत्पादन शेतीमुळे दुष्काळी भागात समृद्धी आणली. सोलापूर सारख्या उजाड प्रदेशात रोजगार हमीवर जगणाऱ्या गावकऱ्यानी द्राक्षे, डाळिंबची विक्रमी उत्पादने घेतली. आज गावच्या गावं श्रीमंत बनली आहेत. कोकणातील हापूस आंबे, खानदेशचे केळी परदेशात निर्यात केले जातात. पेरू,सीताफळ यांनी देशाचे मार्केट जिंकले आहे.
हा चमत्कार शक्य झाला पंजाबहून महाराष्ट्रात आलेल्या सरदारजींमुळे. डॉ.गेंदासिंग चिमा.
सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब प्रांतातील सियालकोट येथे साहिवाल या गावी सधन शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तारीख होती २ ऑगस्ट १८९४. शालेय शिक्षण सियालकोट मध्येच झाले. पुढे पंजाब विद्यापीठातून कृषिशास्त्रात बी.एस्सी. व एम.एस्सी. या पदव्या संपादन केल्या. इंग्लंडला जाऊन कृषिक्षेत्रातील आधुनिक शिक्षण घेतलं.
परदेशात नोकरीच्या चांगल्या संधी होत्या मात्र मातृभूमीच्या ओढीने गेंदासिंग चिमा भारतात परत आले.
तो काळ पारतंत्र्याचा होता. आय.सी.एस.च्या सरळ भरती सेवेमार्फत ते मुंबई प्रांताच्या कृषी सेवेत १९२१ साली त्यांची निवड झाली. त्यांची हुशारी बघून तत्कालीन ब्रिटिश सरकारने लंडनहून सेक्रेटरी ऑफ स्टेटस्मार्फत खास फतवा काढला आणि हॉर्टिकल्चरिस्ट टू बॉम्बे स्टेट या पदी त्यांची नियुक्ती केली.
हॉर्टीकल्चरिस्ट म्हणजे फलोत्पादन तज्ज्ञ. त्याकाळी भारतात तरी या विषयात डॉ.गेंदासिंग चिमा यांच्या एवढा अभ्यास असणारा एकही व्यक्ती नव्हता.
पंजाबमधून आलेले चिमा साहेब महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आयुष्याशी समरस झाले. इथले हवामान, जमीनीचा पोत, पाऊस पाणी याचा विचार करून इथे कोणती फळे पिकू शकतात या दृष्टीने संशोधन सुरु केले.
कोकणातला हापूस त्याकाळी देखील प्रचंड फेमस होता मात्र तो निर्यात करता येत नव्हता. जहाजातून महिनोन्महिने प्रवास चालायचा. या प्रवासात हापूस आंबे टिकण्याची शक्यता नव्हती. भारतावर राज्य करणाऱ्या इंग्लंडच्या राजा राणीला देखील हापूस आंबा खाता येत नव्हता, चिमा साहेब यांनी हे आव्हान स्वीकारलं.
त्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच शीतगृहे निर्माण केली. तिथे फळांची साठवण आणि प्रक्रिया निर्मिती सुरु केली. त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला.
१९२८ साली पहिल्यांदा कोकणातली पहिली हापूस आंब्याची पेटी इंग्लंडचा राजा पंचम जॉर्जला पाठवून देण्यात आली. राजा आंबा खाऊन खुश झाला त्याने चिमा साहेब यांना खास पत्र पाठवून कौतुक केलं. पण या पत्रापेक्षाही महाराष्ट्राचा आंबा सातासमुद्रापार पोहचवता आला याच चिमा यांना जास्त अभिमान वाटला.
फक्त हापूस आंबाच नाही तर महाराष्ट्रात पिकणाऱ्या डाळिंब द्राक्षे केळी या फळांमध्ये आंतरराष्ट्रीय मार्केट जिंकण्याचं सामर्थ्य आहे हे चिमा साहेबाना माहित होतं. त्यांनी या फळांच्या चांगल्या प्रतीची व अधिक उत्पादन देणाऱ्या जातींच्या निर्मितीस प्राधान्य दिले.
त्या वेळचे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य १९३२मध्ये एक वर्षासाठी युरोपला जाणार होते, म्हणून कृषि-संचालकांनी चीमा यांची प्राचार्यपदी नियुक्ती करण्याचे ठरवले होते, परंतु ‘या बढतीमुळे माझ्या डाळिंबावरील संशोधन कार्यावर प्रतिकूल परिणाम होईल’ म्हणून त्यांनी हे पद त्या वेळी नाकारले.
डॉ.चीमा यांनी सर्वप्रथम पेरूच्या जातीचे संशोधन हाती घेतले. देशभरातील पेरू पिकवणाऱ्या वेगवेगळ्या भागात फिरून ६०० पेरू रोपे गोळा केली. त्यांच्यावर सलग १४ वर्षे त्यांचा सखोल अभ्यास केला. या वाणांच्या सखोल अभ्यासानंतर लखनौ-४९ही अधिक उत्पादन देणारी मोठी गोलाकार व भरपूर गोड गर आणि मऊ बिया असलेली जात १९३७मध्ये त्यांनी प्रसारित केली.
आजही महाराष्ट्रातील पेरू लागवडीचे जवळजवळ १०० टक्के क्षेत्र या जातीखाली आहे. इतर प्रांतांतही ही जात मोठ्या प्रमाणावर लावली जाते.
पेरूसोबतच त्यांनी सीताफळ व डाळिंब या पिकांवर देखील सखोल संशोधन केले. सीताफळातील बियांचे प्रमाण कमी करून फळाचा आकार व गराचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांनी अबोनो, चेरिमोया व सीताफळाचा संकर केला आणि मोठ्या आकाराची फळे देणारी, भरपूर गर व कमी बिया असलेली अनोना हायब्रीड-२ ही संकरित जात निर्माण केली.
त्यांचं सर्वात गाजलं ते डाळिंब संशोधन.
१९३७ साली डॉ.चिमा यांनी पुण्याजवळच्या आळंदी येथील डाळिंबाच्या बागेतून निवड पद्धतीने जी.बी.जी.-१ ही लालसर, मोठे व मऊ दाणे असलेली गोड चवीची जात निर्माण केली. हे डाळिंब फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात गाजले. आजही भारतभरात याच डाळिंबाची जात दिसते.
डाळिंबाच्या पाठोपाठ चिमासाहेब यांनी लक्ष वळवलं ते द्राक्ष पिकाकडे.
सुरुवातीला आपल्या इथे भोकरी या जातीचं पीक घेतलं जात होतं. त्यानंतर आलेले पांढरी साहेबी जातीचे द्राक्षे उत्तम चव आणि चांगल्या प्रतीचे होते. पण त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येत नव्हतं. या वेलींची उत्पादकताच कमी होती. डॉ.गेंदासिंग चीमा व डॉ.जी.बी.देशमुख यांनी या कमी उत्पादकता का आहे याच कारण शोधले व याच जातीच्या बियांपासून सिलेक्शन -७व सिलेक्शन ९४ हे वाण शोधले.
यापैकी सिलेक्शन ७ हा वाण त्याच्या चांगल्या प्रतीच्या फळांसाठी व अधिक उत्पादनासाठी प्रसारित करण्यात आला.या वाणाने अधिक उत्पादनासाठी जागतिक पातळीवर विक्रम केला. ‘थॉमसन सिडलेस’ ही बिनबियांची जात लागवडीखाली येण्यापूर्वी चिमासाहेबी हीच जात महाराष्ट्रात व्यापारी तत्त्वावर लावली जात होती.
महाराष्ट्रातील प्रि-कुलिंग व कोल्ड स्टोअरेज या प्रक्रियांचा पाया डॉ. चीमा यांनी घातला. त्यांनीच वेगवेगळी फळे आणि यासोबतच गुलाबाची फुलेही इंग्लंड युरोप फ्रान्स, जर्मनी या ठिकाणी निर्यात केली.
मराठी शेतकऱ्यांना जगाचं मार्केट खुलं झालं.
मुंबईच्या हॉर्टिकल्चरिस्ट या पदावर ते सलग २१ वर्षे कार्यरत होते. तिथून पुढे चार वर्ष पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्यपदही सांभाळले व निवृत्तीपूर्वी अल्पकाळ कृषि-संचालक पदही भूषवले. १९४८मध्ये त्यांनी ‘चेअरमन एक्सपर्ट कमिटी, केंद्र सरकार’ हे मानाचे पदही भूषवले होते.
निवृत्तीनंतर परत पंजाबमध्ये न जाता ते पुण्यातच संगमवाडीत स्थायिक झाले.
महाराष्ट्रातील वनशेती, कोरडवाहू फळबाग विकास, पर्यावरण संवर्धन यांच्यासाठी डॉ.चीमा यांनी राज्यसरकारला सक्रिय पाठिंबा दिला होता. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या अहमद नगर जिल्ह्यातील रस्ते बांधणी करत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याला त्यांनी रस्त्याच्या कडेला चिंच, आंबा ही झाडे लावण्यास सांगितले. इतकेच नाही तर या झाडांची रोपेही त्यांनीच पुरवली.
पुण्याच्या लॉ कॉलेजमागील टेकडीवर झाडी लावून ती हिरवीगार करण्यास त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
या महान संशोधकाचा महाराष्ट्र राज्याने देखील यथोचित सन्मान केला. १९६९साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते मोठा कार्यक्रम घेऊन सत्कार केला गेला. त्यांना मानपत्र देण्यात आले. याच वेळी त्यांच्या सन्मानार्थ त्यांनी संशोधित केलेल्या ‘सिलेक्शन-७’ या द्राक्ष जातीचे, ‘जी. बी. जी.-१’ या डाळिंबाच्या जातीचे व ‘लखनौ-४९’ या पेरूच्या जातीचे अनुक्रमे ‘चिमासाहेबी’, ‘गणेश’ व ‘सरदार’ असे नामकरण करण्यात आले.
१ जानेवारी १९७२ रोजी या थोर संशोधकाने आपला अखेरचा श्वास मराठी मातीतच घेतला.
आजही डॉ.गेंदासिंग चिमा यांनी तयार केलेल्या डाळिंब, द्राक्षे, पेरू, सीताफळ या फळांच्या जातीचे आपले शेतकरी उत्पादन घेताना दिसतात. महाराष्ट्र फलोत्पादनात आज संपूर्ण देशात अग्रेसर मानला जातोय याचे श्रेय हॉर्टिकल्चरचे भीष्मपितामह मानल्या जाणाऱ्या चिमासाहेबांना दिले जाते.
संदर्भ- महाराष्ट्र नायक प्रा. भालचंद्र गणेश केसकर
हे ही वाच भिडू.
- सोलापूरचा शेतकरी इरेला पेटला अन् द्राक्षातला हापूस सोनाका तयार केला.
- जळगावची केळी खरेदी करण्यासाठी रशियात पहाटे ५ वाजल्यापासून रांगा लागल्या होत्या.
- पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरी पिकते याच श्रेय इंग्रजांना नाही तर जमशेदजी टाटांना जातं.
- कृष्णेच्या ऊसपट्ट्यात वसलंय बासमती तांदळाचं गाव : रेठरे बुद्रुक
हि आपल्या लेखातून जाणून घेत आहे सगळं आलबेल आहे असेच सुंदर लेख पाठवा