मुख्यमंत्र्यांचा मुलाला गर्व असेल, असा समज जेनेलिया वहिनींनी रितेशबद्दल केला होता

मनोरंजन क्षेत्र म्हटलं की, कोणाचं कधी जुळेल आणि कोणाची कधी काडीमोड होईल हे सांगता यायचं नाही. प्रेमविवाह करुनही काही दिवसांमध्ये एकमेकांपासुन वेगळी होणारी प्रेमीयुगुलं या क्षेत्रात पाहायला मिळतात. अनेक वर्ष एकमेकांसोबत राहून तितकंच प्रेम करणारी जोडपी सुद्धा या क्षेत्रात आहेत.

जेनेलिया आणि रितेश देशमुख हे सुद्धा असंच प्रेमळ जोडपं.

कधी विनोदी व्हिडीओमधुन तर कधी रोमँटीक फोटोज् च्या माध्यमातुन हे दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात, हे सर्वांनाच पाहायला मिळतं. आज महाराष्ट्राच्या लाडक्या जेनेलिया वहिनींचा वाढदिवस. रितेशला जेव्हा जेनेलियाने पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तिने त्याच्याबद्दल एक गैरसमज केला होता.

तो किस्सा असा की, रितेश आणि जेनेलिया ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमात एकत्र झळकणार होते. या दोन्ही कलाकारांचा हा पहिलाच सिनेमा. जेनेलिया तेव्हा १६ वर्षांची तर रितेश २४ वर्षांचा.

या दोघांची पहिली भेट झाली हैद्राबाद एअरपोर्टवर.

रितेश एअरपोर्टला उतरला. जेनेलिया रितेशची वाट पाहत उभी होती. रितेश आल्यावर सिनेमाशी संबंधित एका प्राॅडक्शन मॅनेजरने रितेशची जेनेलियासोबत ओळख करुन दिली. रितेशने स्वतःचं नाव सांगीतलं. पण जेनेलियाने रितेशकडे बघितलं सुद्धा नाही. अगदी दुर्लक्ष केलं.

जेनेलियाच्या अशा वागण्याने रितेश चकीत होणं साहजिक होतं.

याला कारण असं की, तेव्हा विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या मुलाला स्वतःबद्दल एक गर्व असेल, त्याचा स्वभाव थोडा वेगळा असेल, असा एक समज जेनेलियाने करुन घेतला होता.

या पहिल्या भेटीनंतर पुढचे तीन दिवस जेनेलिया रितेशशी बोलली देखील नव्हती. तिस-या दिवशी तिने रितेशला प्रश्न विचारला,

“तुझी सिक्युरीटी कुठे आहे?”

मुख्यमंत्र्याच्या मुलाजवळ स्वतःचे सिक्युरीटी गार्ड असतील असं जेनेलियाला वाटलं.

शुटींग सुरु झाल्यावर रितेशबद्दल जो जेनेलियाने एक समज करुन घेतला होता त्याचं गैरसमजात रुपांतर झालं. रितेश सेटवर सगळ्यांशी मिळुन मिसळुन असायचा. त्याच्या स्वभावात कसलाही गर्व नव्हता. मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणुन नाही तर एक कलाकार म्हणुन तो तिथे वावरत होता. जेनेलियाचं रितेशबद्दलचं मत बदललं.

रितेशने आर्कीटेक्टचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे तो जेनेलियाशी त्या विषयावर बोलायचा. जेनेलिया सुद्धा मोकळेपणाने तिच्या काॅलेजविषयी रितेशला सांगायची. दोघांची मैत्री वाढत होती आणि या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं.

२००३ साली ‘तुझे मेरी कसम’ रिलीज झाला.

60512215

या सिनेमाचं शुटींग झाल्यावर रितेश पुन्हा मुंबईला आला. जेनेलिया सुद्धा तिच्या घरी गेली. दोघांना एकमेकांचा हा विरह सहन होईना. पुढच्याच वर्षी २००४ साली ‘मस्ती’ सिनेमात दोघं पुन्हा एकत्र झळकले.

या सिनेमानंतर दोघांचंही काही ना काही कारण काढून एकमेकांना भेटणं, परस्परांशी बोलणं होऊ लागलं. दोघांचीही सिनेमाक्षेत्रात यशस्वी वाटचाल होत होती. जेनेलिया मल्याळम, तेलगु, तामिळ, हिंदी अशा अनेक भाषांतील सिनेमांमध्ये काम करत होती. तर दुसरीकडे रितेश हिंदीमध्ये सुपरहिट सिनेमे देत होता. शुटींगच्या व्यस्त वेळापत्रकामधून सुद्धा दोघेही एकमेकांसाठी वेळ काढायचे.

आश्चर्य म्हणजे दहा वर्ष हे एकमेकांना भेटत होते. परंतु मिडीयाला याची कानोकान खबर लागु दिली नाही.

एरवी मिडीया बाॅलिवूड सेलिब्रिटींच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन असते. पण या दोघांनीही अत्यंत हुशारीने मिडीयाला स्वतः विषयीची कोणतीही बातमी कळू दिली नाही. दहा वर्षानंतर कुटूंबियांच्या संमतीने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दोघांनी एकमेकांशी विवाह केला.

विलासराव देशमुखांच्या या सुनेला आज संपुर्ण महाराष्ट्र जेनेलिया वहिनी म्हणुन ओळखतो.

rayan 260520 Glam1

लग्नानंतर या दोघांचा ‘तेरे नाल लव्ह हो गया’ हा हिंदी सिनेमा आला होता. तसेच २०१४ साली आलेल्या ‘लय भारी’ सिनेमातील एका गाण्यात हे दोघे एकत्र दिसले होते. लग्नानंतर जेनेलियाने करियरमधून ब्रेक घेऊन कुटूंबाला प्राधान्य दिलं आहे.

या दोघांना राहिल आणि रिआन हि दोन मुलं आहेत. महाराष्ट्राच्या लाडक्या जेनेलिया वहिनी आणि रितेश गेली १८ वर्ष एकमेकांसोबत आहेत.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.