जॉर्ज फर्नांडिस आणि मराठवाड्यातले पाटील.

शककर्ते शालीवन राजांची नगरी, पैठणीच्या लावण्यांच प्रतिक आणि संत एकनाथांचे पैठण अशी पैठण या गावाची ओळख महाराष्ट्राला आहे. अशीच एक वेगळी ओळख म्हणजे जॉर्ज फर्नांडिस आणि पैठण या दोन नावांच्या नात्याची आहे. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. देशातील विविध राजकीय पक्ष समाजवादी नेते या आणीबाणीला कडवा विरोध करत होते. त्यातीलच एक नाव म्हणजे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस. या सगळ्या विरोधकांना अटक करण्याचे सत्र एका बाजूला सुरु असतांना एक माणूस मात्र हाती लागत नव्हता तो म्हणजे जॉर्ज फर्नांडिस.

कधी भूमिगत होऊन तर कधी वेश बदलून, खुशवंत सिंग असे नाव धरण करून ते विरोध करत होते आणि विरोधाच्या चळवळीतील असंख्य कार्यकर्त्यांना बळ देखील देत होते.

आणिबाणीच्या काळात भूमिगत असताना जार्ज फर्नांडिस फेब्रुवारी १९७६ मध्ये ते सिल्लोडमार्गे औरंगाबाद येथे येऊन पोहचले, पण तिथे पोहचताच त्यांच्या लक्षात आले कि येथील पोलीस अधिक सतर्क आहेत त्यामुळे तिथे राहणे धोक्याचे होते. त्यांच्या सोबत रणदिवे नावाचे एक स्थानिक कार्यकर्ते होते. पोलीस सतर्क असल्याने जॉर्ज यांनी औरंगाबाद पासून साधारण ५० किमी अंतरावर असलेल्या पैठणला जाण्याचा निर्णय घेतला, ते रात्रीचा प्रवास करून पैठणमध्ये पोहचले.

पैठणमधील रात्रीच्या पोलीस गस्तीचा अंदाज घेऊन दोघांनी ती रात्र पैठण बसस्थानकावरच घालवली. भल्या पाहटे रणदिवे यांचा परिचय असणाऱ्या कै. बाळासाहेब पाटील यांच्या घरी ते गेले दोघांनी तिथेच पाहुणचार घेतला आणि जॉर्ज यांनी बाळासाहेब पाटील यांच्या घरीच मुक्काम केला. दुसऱ्याच दिवशी बाळासाहेब पाटील यांनी जॉर्ज यांचे वेषांतर करून त्यांना आपळे धोतर आणि फेटा घातला. त्यानंतर स्वतःच्या राजदूत दुचाकीने ने औरंगाबाद बीड मार्गावरील पाचोड येथे त्यांना सोडले आणि तिथून त्यांनी थेट कर्नाटक गाठले. .

हि घटना रोमांचकारक वाटत नसली तरी तीचं महत्व अधिक आहे. जर त्या दरम्यान कुठे हि जॉर्ज यांना अटक झाली असती तर आणीबाणीच्या विरोधातील चळवळीलाच खीळ बसली असती. त्यात आजूबाजूला चालू असणारी पोलिसांची गस्त आणि त्यातून जॉर्ज यांना बाहेर काढण्याचे जोखमीचे धैर्य बाळासाहेब पाटील यांच्याकडे होते म्हणूनच हे शक्य झाले.   

हे अचाट धाडस त्यावेळी पाटील यांनी जसे दाखवले तितकेच प्रेम जॉर्ज फर्नांडिस यांनी देखील दाखवले.

जसा हा चळवळीतला माणूस शांत कधीच बसला नाही तसाच त्यांचा स्वभाव लाघवी देखील होता. नंतरच्या काळात बंद, कामगारांसाठीचे उठाव, आंदोलने करणारे जॉर्ज संरक्षण मंत्री झाले. त्यांतर ते औरंगाबाद येथील एका सभेसाठी आले होते. सभेसाठी प्रचंड गर्दी जमलेली होती, लाखो लोक उपस्थित होते. या लाखोंच्या गर्दीत बाळासाहेब पाटील देखील सभा ऐकण्यासाठी आले होते.

आपण ज्या माणसाला सुखरूप ठेवलं तो माणूस देशाचा संरक्षण मंत्री झाल्याचे पाहण्यासाठी बाळासाहेब पाटील तिथे होते.

जसे हे विलक्षण प्रेम बाळासाहेबांचे जॉर्ज यांच्यावर होते तितकीच माणस हेरण्याची प्रचंड ताकद जॉर्ज फर्नांडीस यांच्यात हि होती. एवढ्या मोठ्या गर्दीतून त्यांनी बाळासाहेब पाटीलांना पहिले आणि त्यांच्या जवळ गेले. त्यानंतरचा प्रसंग हा महाराष्ट्राला गौरव वाटण्यासारखा आणि पैठणकरांचा उर भरून यावा असाच होता.

संरक्षण मंत्री जॉर्ज धोतर- फेटा घातलेल्या बाळासाहेबांच्या जवळ गेले, आणि ज्या मराठी पेहरावामुळे ते सुखरूप कर्नाटकात पोहचले त्याच पेहरावातील बाळासाहेबांना त्यांनी प्रेमाची मिठी मारली. हि मिठी एका मंत्र्याने सामान्य माणसाला मारेली मिठी नव्हती तर ती त्या न फिटणाऱ्या उपकराच्या आठवणीची मिठी होती.

असा मनुष्य आजच्या व्ही.आय.पी कल्चर राजकारणात सापडणे अशक्यच. जायंट किलर जॉर्ज फर्नांडिस यांची ही आठवण इतिहास संशोधक कै. बाळासाहेब पाटील यांचे पुत्र जयवंत पाटील यांनी सांगितली. महाराष्ट्र नेहमीच दिल्ली रक्षणासाठी धावून गेल्याचे आपला इतिहास सांगतो. हा प्रसंग देखील तसाच राष्ट्रीय राजकारणातील एका तळपत्या समशेरीच हे महाराष्ट्राशी असणारं अनोख नातं. 

हे ही वाचा. 

1 Comment
  1. N.K.Waghmare says

    ग्रेटच…

Leave A Reply

Your email address will not be published.