जॉर्ज फर्नांडिस यांनी काश्मिरातील तरुणांना संपूर्ण देशभरात व्यवसाय उभारून दिले होते…

साधारण १९८९ सालाच्या दरम्यान काश्मीर मधील परिस्थिती हळूहळू चिघळण्यास सुरवात झाली होती. तिथल्या फुटीरतावादी संघटनांनी डोके वर काढले होते. काश्मिरी पंडितांवर अत्याचार वाढले होते. त्यावर्षीच्या काश्मीरमधल्या लोकसभा निवडणुका अत्यंत संवेदनशील समजल्या गेल्या. अशा या निवडणुका पार पडल्यानंतर व्ही. पी. सिंग पंतप्रधानपदी आले होते.

याच सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री होते, सोबतच ११ मार्च १९९० रोजी जॉर्ज यांच्याकडे काश्मीर मंत्री म्हणून जबाबदारी आली.

ते पुढे ८ महिने या पदावर होते. मात्र या अवघ्या थोडक्या काळात जॉर्ज यांनी थेट तिथल्या लोकांमध्ये जात तिथले प्रश्न समजून घेतले होते. सोबतच तिथल्या तरुणांना देशभरात व्यवसाय उभे करून देत एकप्रकारे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते.

जॉर्ज फर्नांडिस त्यावेळी रेल्वे मंत्री देखील होते, त्यामुळे रेल्वे खात सांभाळून ते दर शनिवार-रविवार काश्मीरमध्ये जात असतं. त्यावेळी जॉर्ज काश्मीरमंत्री झाल्यानंतर अवघ्या ४ ते ५ दिवसात एक मोठी घटना घडली होती. यात श्रीनगरपासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या चानपुरा गावात सीआरपीएफ जवानांनी छापे घातले होते.

त्यावेळी जवानांकडून घरात घुसून घरांची नासधूस करण्यात आली, काही वृद्ध आणि तरूणांना पकडून नेलं आणि स्त्रियांवर बलात्कार केला असा आरोप स्थानिकांनी केला. तर बलात्कार आणि अत्याचार झाले नाहीत, उगाच प्रकरण रंगवण्यात येतं आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. अशा तणावाच्या स्थिती जॉर्ज यांनी स्वतः तिथं जाऊन संबंधित स्त्रियांना भेटून त्यांचं म्हणणं समजून घेतलं होतं.

काश्मीरमध्ये गेल्यानंतर जॉर्ज रेल्वे गेस्ट हाऊस मुक्कामाला थांबायचे. बाहेर पोलिसांचा पहारा असायचा. मात्र सकाळ झाली कि जॉर्ज त्यातून निसटत आणि खासगी टॅक्सी पकडून गावात जाऊन लोकांना भेटत असतं. त्यावेळी देखील काश्मिरी जनता आणि पोलिस यांच्यात वितुष्ट होतं. त्यामुळे अशा ठिकाणी पोलिस पुरता बंदोबस्त घेऊन जात असत. जॉर्ज मात्र अशा वस्त्यात निःशस्त्र जायचे.

त्यामुळे दहशतवादी तरुण देखील शस्त्रं जमिनीवर ठेवून जॉर्जना भेटतं असतं, त्यांना आपलं म्हणणं सांगायचे

अशाच एका दिवशी जॉर्ज दोडा या गावात जायला निघाले. प्रशासनानं तिथं जण धोक्याचं असल्याचं सांगितले. त्यात गावकऱ्यांनी प्रशासनाला गाव बंदी जाहीर केली होती. यात जॉर्ज यांच्यावरही  गावबंदी जाहीर केली होती. गावातल्या मशिदीवरून भोंगे सांगत होते की जॉर्जनी गावात येऊ नये.  मात्र तरीही जॉर्ज दोडामध्ये गेले.

तिथल्या तरुणांना निशस्त्र जाऊन भेटले. समोरचा जमाव प्रश्न विचारत होता, आणि जॉर्ज त्या प्रश्नाना शांतपणे उत्तर देत होते अशी ती परिस्थिती होती. अशातच एक तरुण म्हणाला काश्मीरमध्ये बेकारीचा प्रश्न मोठा आहे. त्यावर जॉर्ज म्हणाले, बेकारी हा साऱ्या भारताचा प्रश्न आहे. काश्मीरचा वेगळा प्रश्न नाही. कोणीतरी म्हणाले भ्रष्टाचार आहे. तर कोणी सांगितले इथं निवडणूक शांत वातावरणार पार पडत नाहीत.

या सगळ्यावर जॉर्ज त्या तरुणांना देशासोबत जोडण्याचा प्रयत्न करत होते. जॉर्ज म्हणायचे तुम्हाला पडत असलेले प्रश्न साऱ्या देशालाच पडलेले आहेत. जॉर्जनी विविध आकडे देऊन सांगितलं कि हे प्रश्न आपल्या सर्वांना एकत्र येऊन सोडवावे लागतील.

यानंतर जॉर्ज यांनी काश्मिरी तरुणांना रेल्वेत नोकऱ्या दिल्या. तिथली सफरचंद कारखान्यापर्यंत नेणं, कारखान्यापासून ती देशभर पोचवणं यासाठी जॉर्जनी रेल्वेच्या वाघिण्या दिल्या. जॉर्ज मंत्री होण्यापूर्वी रेल्वे वाघिण्या हे अधिकारी आणि प्रशासनाकडे असायच्या असं चित्र होतं. कोणालाही मालाची वाहतूक करण्यासाठी वाघीण हवी असेल तर पैसे द्यावे लागत.

मात्र जॉर्ज यांनी काश्मिरी तरुणांना हि सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

त्यानंतर देशभरतील तब्बल एक हजार रेल्वे स्टेशन्सवर जॉर्जनी सफरचंदाचा ज्यूस विकण्याची व्यवस्था उभी केली आणि ती दुकानं काश्मिरी लोकांना देऊ केली. तसंच काश्मिरी हस्तकलेला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना जॉर्ज यांच्या आग्रहावरुन सरकारनं सुरू केल्या होत्या.

त्यामुळे वेळो वेळी काश्मिरी पेपरांनी देखील जॉर्ज यांच्या या प्रयत्नांची दखल वारंवार घेतली होती. जॉर्ज यांच्या कदाचित याच प्रयत्नांमुळे काश्मीरमध्ये आज देखील जॉर्ज फर्नाडिस यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. त्यांनी अवघ्या ८ महिन्यात केलेल्या प्रयत्नांना आज देखील तिथं उल्लेख केला जात असलेला दिसून येते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.