रेल्वेचा तो अभूतपूर्व संप संपूर्ण भारताच्या राजकारणाला वेगळं वळण देऊन गेला…
१९७३-७४ च्या दरम्यान, देशातील औद्योगिक क्षेत्रातील वातावरण गढळ झालं होतं आणि कामगारवर्गात कमालीचा असंतोष पसरलेला होता. या पार्श्वभूमीवर, कामगारांमधील या असंतोषाचा स्फोट जॉर्ज फर्नाडीस यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगारांनी २ मे, १९७४ पासून पुकारलेल्या संपातून झाला. २० दिवस चाललेला हा संप अनेक अर्थानी ऐतिहासिक ठरला.
१९७०च्या दशकात सरकारच्या विरोधात कामगारांचा संघर्ष तीव्र होत चालला होता. सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, अशी भावना त्या काळी तयार झाली होती. त्यामुळे ठिकठिकाणी कामगारसंघटना आक्रमक बनत होत्या. १९७३ व १९७४ ही दोन वर्ष तर कमालीची अस्थैर्याची व अस्वस्थतेची होती.
एकट्या १९७४ या वर्षात देशातील औद्योगिक तंट्यांमध्ये सुमारे ४ कोटी मनुष्य दिवस वाया गेले होते. स्वातंत्र्योत्तर काळात असा प्रसंग पहिल्यांदाच आला होता. कामगारांमधील या असंतोषाचा स्फोट रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपातून व्यक्त झाला.
असंतोष आणि राष्ट्रव्यापी संपाची घोषणा
१९७४ मध्ये झालेला हा संप अचानक उद्भवलेला नव्हता. १९६०च्या दशकापासून रेल्वेच्या कामगारांमध्ये विविध मागण्यांसाठी असंतोष घुमसत होता. सरकारमान्य कामगारसंघटना मात्र हा असंतोष रेल्वे खात्याकडे व्यक्त करण्यात आणि मागण्या रेटून त्या मान्य करून घेण्यात अयशस्वी होत होत्या. त्यामुळे देशातील विविध भागांत १९६० च्या दशकात सुरुवातीपासून छोटे-मोठे संप सुरू झाले होते. १९६७ आणि १९६८ मध्ये मदुराईमध्ये अशाच एका संपाला रेल्वेला सामोरं जावं लागलं होतं.
रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना पगार अत्यंत कमी होते आणि कामाचे आठ तास असावेत हा जगन्मान्य नियमही रेल्वेत पाळला जात नव्हता. त्याशिवायही अनेक मागण्या दुर्लक्षित होत्या. त्यातून असंतोष वाढत गेला आणि १९७३ या वर्षात विविध मार्गातून तो व्यक्त होऊ लागला. अखेर फेब्रुवारी १९७४ मध्ये देशातील सर्व कामगारसंघटनांना एकत्र करून ‘नॅशनल को-ऑर्डिनेटिंग कमिटी फॉर रेल्वेमेन्स स्ट्रगल’ स्थापन करण्यात आली.
या संघटनेने कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ८ मे, १९७४ या दिवशी राष्ट्रव्यापी संप करण्याचं जाहीर केलं. या संधटनेवर जॉर्ज फर्नाडीस या त्या काळी लोकप्रिय असलेल्या कामगारपुढाऱ्याचं प्रभुत्व होतं.
१९६७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या स. का. पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करणाऱ्या फर्नाडिसांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वालाही आव्हान दिलं होतं. त्यामुळे फर्नाडीस यांच्या नेतृत्वाखाली ८ मे, १९७४च्या नियोजित राष्ट्रव्यापी संपाची योजना उधळून लावण्यासाठी २ मे, १९७४ रोजी जॉर्ज फर्नांडीस यांच्यासह हजारो रेल्वेकर्मचाऱ्यांना अटक केली गेली.
एकाच दिवसात देशभरात सुमारे २८ हजार कर्मचारी कारागृहात पाठवले गेले. कामगार-संघटनांच्या मते, तर ही संख्या सुमारे ७० हजार एवढी होती.
सरकारच्या या कृतीमुळे देशभर कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी ८ तारखेची वाट न पाहता लगेचच राष्ट्रव्यापी संप पुकारला. या संपापासून कामगार-कर्मचाऱ्यांनी दूर राहावं आणि त्यांच्यात दहशत बसावी यासाठी ‘मेंटेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट’ (मिसा) हा कठोर कायदा लावण्यात आला.
शिवाय देशातील विविध ठिकाणी कर्मचारी वस्त्यांमध्ये जाऊन तेथील कामगारांना अमानुष वागणूक दिली गेली. स्त्रिया व मुलांचाही अपवाद केला गेला नाही. बीएसएफ व सीआरपीएफ या पोलिसी व निमलष्करी दलांनाही पाचारण करण्यात आलं आणि कामगारांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला गेला.
परंतु या संपात सहभागी झालेले सुमारे १५ लाख रेल्वेकर्मचारी बधले नाहीत. देशात विविध ठिकाणचे कामगार-कर्मचारी नेटाने या संपात सहभागी झाले व त्यांनी सरकारविरोधात निदर्शने, धरणं, आंदोलनेही आयोजित केली. या संपाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील वीज आणि वाहतूक क्षेत्रातील कामगार, तसंच टॅक्सी ड्रायव्हरही सहभागी झाले.
हा संप तब्बल २० दिवस चालला. मात्र सरकारने आपला हट्ट सोडला नाही आणि अखेरीस कोणत्याही मागण्या मान्य न करता हा संप मोडून काढला गेला.
मात्र भारतीय कामगार चळवळीच्या वाटचालीत हा संप ऐतिहासिक ठरला. या संपाने देशभर कामगारांची एकजूट तर दाखवलीच, शिवाय भारताच्या राजकारणालाही मोठंच वळण दिलं. जॉर्ज फर्नाडिस नावाचा नेताही या संपातून राष्ट्रीय पटलावर उदयास आला.
हा संप म्हणजे राज्यव्यवस्थेविरुद्ध केलेला उठाव आहे, असा आरोप करत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपली वाटचाल आणीबाणीच्या दिशेने सुरू केली. पुढे २५ जून, १९७५ रोजी आणीबाणी लादली गेली आणि देशातील विरोधी पक्षांच्या हजारो नेते-कार्यकर्त्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेण्यात आलं. जॉर्ज फर्नाडिस भूमिगत झाले आणि तब्बल १० जून, १९७६पर्यंत पोलिसांना सापड़ू शकले नाहीत.
या काळात त्यांना बडोदा डायनामाईट प्रकरणात गुंतवलं गेलं आणि त्यांचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी त्यांची भावंडं, बायको आणि आई या सर्वांचा अनन्वित छळ केला गेल्याचे आरोप झाले. १० जून रोजी ते जेव्हा कोलकात्यात पकडले गेले, तेव्हा साखळ्यांनी बांधलेले हात उंचावून जनतेला अभिवादन करणारा त्यांचा फोटो त्या काळी भलताच गाजला.
आणीबाणीनंतर जी लोकसभा निवडणूक झाली तेव्हा जॉर्ज कारागृहातच होते. ही निवडणूक त्यांनी कारागृहातूनच लढवली आणि प्रचंड बहुमतान जिकली. जनता पक्ष सत्तेवर आला व जॉर्ज केंद्रीय रेल्वेमंत्री बनले. मात्र १९७४ मध्ये ज्या मागण्यांसाठी जॉर्ज यांनी संप केला होता, त्यांतील फारच कमी मागण्यांची पूर्तता ते स्वतः करू शकले.
हे ही वाचं भिडू :
- कुठल्या नेत्याने नाही तर एका IAS ऑफिसरने जॉर्ज फर्नांडिस यांचे मुंबईतील वर्चस्व मोडीत काढलं
- जॉर्ज फर्नांडिस यांनी काश्मिरातील तरुणांना संपूर्ण देशात व्यवसाय उभारून दिले होते
- आजारी नर्सला जागा मिळावी म्हणून खासदार जॉर्ज फर्नांडिस एसटीत उभे राहून प्रवास करत होते