‘जेल का फाटक टूटेगा, जॉर्ज हमारा छूटेगा’ म्हणतं सुषमांनी जॉर्ज फर्नांडिसना विजय मिळवून दिला

१९७५ चं वर्ष. पारतंत्र्याच्या जखमा भरुन प्रजासत्ताक देश लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या दिशेनं वाटचाल करायला लागला होता. पण त्याच वर्षी २५ जून रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. त्यानंतर सगळं काही बदलून गेलं होतं. देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आणल्याचं बोललं जाऊ लागलं.

दुसऱ्या बाजूला माध्यमांची मुस्कटदाबी सुरू केली गेली. देशभरातल्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना कारागृहात डांबण्याचं सत्र सुरू झालं. हे अटकेचं सत्र चंद्रशेखर यांच्यापर्यंत येऊन ठेपलं. दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात असलेल्या रिवोली थेटरमधून सिनेमा बघून घरी परतत असताना त्यांना अटक केली गेली. ते त्याकाळचे विरोधी पक्षाचे दिग्गज नेते मानले जायचे.

पण अटक करायला आलेला पोलिस काहीसा दयाळू मनाचा निघाला. त्यानं चंद्रशेखर यांना अटक करण्याअगोदर अर्धा तास वेळ दिला. या वेळात त्यांनी सगळी महत्वाची काम उरकून घेतली. त्यातील एक म्हणजे सगळ्या महत्वाच्या नेत्यांना त्यांनी फोन लावून आणीबाणीमुळे नेत्यांना अटक केलं जात असल्याची टीप दिली.

ज्यावेळी ते फोन लावत होते, त्यावेळी तिथं एक टेलिफोन ऑपरेटर महिला बसली होती. ती एका मजूर संघटनेशी संबंधित होती. तिनं हा संवाद ऐकला आणि पटकन ओडिसामध्ये फोन फिरवला. दिल्लीत बसून ओडिसा मधल्या गोपालपुरमध्ये या महिलेनं आणीबाणीमुळे होत असलेल्या अटकेची बातमी क्षणार्धात पोहोचवली. कारण तिथं आणखी एक मातब्बर नेता सुट्टी घालवत होता. ही बातमी कळताच तो नेता वेश बदलून पसार झाला.

अशा मातब्बर नेत्याचं नाव म्हणजे, जॉर्ज फर्नांडिस

त्यावेळी देशभरातले जवळपास सर्वच विरोधी पक्षाचे नेते कारावास भोगत होते. मात्र, जॉर्ज वेश बदलून आणि दाढी वाढवून बिहार, गुजरात, तामिळनाडू या पट्ट्यात फिरायचे. पोलिस यंत्रणेला गंडवून पसार झालेले जॉर्ज गप्प बसले नाहीत. तर त्यांनी बाहेर राहून काहीतरी मोठं करायचा बेत आखला होता.

नेमकी त्यावेळी इंदिरा गांधींची बडोद्यात सभा होणार होती. ही माहिती मिळताच जॉर्ज यांनी काही सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन एक प्लॅन बनवला. जिथं सभा होणार होती त्याच परिसरात त्यांनी स्फोट करायचं ठरवलं. सभा स्थळापासून जवळच एक सार्वजनिक शौचालाय होतं. त्याच शौचालायात डायनामाइटच्या माध्यमातून धमाका करण्याचं निश्चित झालं होतं.

हा धमाका घडवून आणण्यासाठी जॉर्ज यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीनं डायनामाइट मिळवलं होतं. पण इथंच माशी शिंकली, स्फोट घडवून आणण्यापूर्वीच त्यांचे साथीदार पकडले गेले. सहकारी पकडल्यानंतर जॉर्ज यांनी आपला ठिकाणा बदलला. त्यांनी थेट कोलकाता गाठलं होतं. तिथं शीख रूप धारण करून कोलकाता मधल्या सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये आश्रय घेतला.

तरीही जॉर्ज पोलिसांपासून स्वतःला वाचवू शकले नाहीत. अखेर १९७६ साली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. पकडताच जॉर्ज यांना गोळ्या घालण्याचे आदेश होते. पण लेखी आदेश न मिळाल्यानं त्यांचा जीव वाचला. पुढे मुख्य आरोपी असल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले,आणि दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात उभं केलं.

इथंच खऱ्या अर्थानं जॉर्ज यांच्या कहाणीला वेगळं वळण लागलं.

आणीबाणीच्या दहशतीमुळे न्यायालयात हजर केल्यानंतर जॉर्ज यांना वकील मिळत नव्हता. त्यावेळी जॉर्ज यांच्या मदतीला एक २४ वर्षांची तरुणी पुढे आली. चंदीगडमध्ये वकिलीचं शिक्षण पूर्ण करून दिल्ली न्यायालयात नुकतीच वकिली सुरू करणाऱ्या त्या तरुणीने जॉर्ज यांची केस घेतली आणि न्यायालयात बचावाला सुरुवात केली.

ती तरुणी म्हणजे भारताच्या दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज

बघता बघता दिवस निघून गेले. १९७७ साली आणीबाणी उठवली गेली. निवडणुका जाहीर झाल्या. सगळे नेते जेल बाहेर आले. पण जॉर्ज एकटे जेलमध्ये अडकून पडले होते. आणीबाणी नंतरही त्यांच्यावर खटला चालूच होता.

देशभरात निवडणुका होत होत्या आणि जॉर्ज लढणार नाहीत असं कसं होईल? शेवटी त्यांनी जेलमधूनच निवडणूक लढवण्याचं ठरवलं. पण यावेळी त्यांनी जॉर्ज यांना जयप्रकाश नारायण यांच्या सल्ल्यानुसार आपला पारंपरिक मुंबईमधला मतदारसंघ बदलला होता. ते बिहारच्या मुजफ्फरपूर मधून निवडणूक लढणार होते. 

पण ते जेलमध्ये असल्यानं त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता. याप्रसंगी धावून आल्या त्या जॉर्ज यांच्या पत्नी लैला कबीर आणि वकील सुषमा स्वराज. या दोघींनी बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये जाऊन जॉर्ज यांचा अर्ज दाखल केला.

सुषमा स्वराज एवढ्यावरचं थांबल्या नाहीत. त्यांनी जॉर्ज यांच्या प्रचाराची कमान देखील सांभाळली. स्वराज त्यावेळी दिल्ली न्यायालयात अधिवक्ता म्हणून कार्यरत होत्या. तरीही त्या दिल्लीवरून मुजफ्फरपुरमध्ये दाखल झाल्या. ठिकठिकाणी सभा घेऊन त्यांनी जॉर्ज यांचं कॅम्पेनिंग करू लागल्या.

‘जेल का फाटक टूटेगा, जॉर्ज हमारा छूटेगा’

असं म्हणत सुषमा स्वराज यांनी मुजफ्फरपुरमध्ये झंझावाती प्रचार सुरु केला. जॉर्ज यांचा हातात बेड्या असलेला पोस्टर घेऊन त्या गल्लोगल्ली जायच्या, भेटी द्यायच्या. गावच्या गाव फिरल्या. कार्यकर्त्यांच्या घरातील घास खाल्ला. प्रचारावेळी घेतलेल्या नुक्कड सभा प्रभावशाली ठरल्या.

देशभरातून विशेषतः दिल्लीवरून अनेक दिग्गज नेते मुजफ्फरपुरमध्ये दाखल व्हायचे. सुषमा स्वराज भाषण करताना ही सगळी दिग्गज मंडळी त्यांचं भाषण ध्यान देऊन ऐकायचे. ओजस्वी वक्तृत्वामुळे सर्वात कमी वयाच्या सुषमा त्यावेळी आकर्षण केंद्र बनल्या होत्या. अखेरीस त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांनी विजय मिळवलाच. 

ज्यावेळी निकाल जाहीर झाला त्यावेळी जनता पक्षाच्या जॉर्ज यांना ३ लाख ९६ हजार ६८७ मत मिळाली होती, तर काँग्रेसच्या नितेश्वर प्रसादसिंग यांना अवघी ६२ हजार ४७० मत मिळाली होती. जॉर्ज तब्बल ३ लाख ३४ हजारांच्या विक्रमी माताधिक्यानं निवडून आले होते.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.