कामगारांचा सर्वात मोठा संप घडवणारा जॉर्ज एकेकाळी पाद्री बनणार होता…

१९६१ सालची घटना.

मुंबईच्या दादर स्टेशनवर अचानक घोषणेचे आवाज यायला लागले, त्यातला एक बुलंद आवाज सर्वांनाच आकर्षित करत होता. डोक्यावर दाट व विखुरलेले केस, शरीरावर खादीचे कपडे, पायात चप्पल व डोळ्यांवर जाड्या फ्रेमचा चष्मा असलेल्या त्या व्यक्तीने काही कार्यकर्त्यांसमवेत रेल्वे प्रशासनाविरोधात नारे लावायला सुरुवात केली.

पोलिसांचा लाठीमार पडत असताना देखील त्या व्यक्तीने कसलीही तमा न बाळगता आंदोलन आपल्या हिंमतीवर व जिद्दीवर कायम चालू ठेवले.

तो नेता होता जॉर्ज फर्नांडिस!

राजकारणातला ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कामगारांच्या समस्या आपल्याच समस्या म्हणून त्यांच्यासाठी लढाणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस त्याकाळात कामगारांचा सर्वात झुंजार आणि प्रभावी नेता होता. व्यवस्थेविषयी असणारी चीड आंदोलनाच्या माध्यमातून ते वेळोवेळी समोरं  आणायचे.

जॉर्ज यांच्या राजकीय व सार्वजनिक जीवनात फारसा फरक नव्हता. ते दारूचे व्यसनी नव्हते आणि कॉकटेल पार्ट्यांना देखील जात नसायचे,औद्योगिक घराण्यांपासून त्यांनी स्वत:ला जाणीवपूर्वक दूरच ठेवले. मुळात त्यांना त्यांचा रागच असायचा.

कामगार स्वत:हून संप करत नाही, तर मालक संप करायला त्याला भाग पाडतो, असे त्यांचे ठाम मत होते. कामगारांना न्याय मिळेपर्यंत ते प्रत्येक संपाचा पाठपुरावा करत.

६० आणि ७० च्या दशकातील एक काळ असता होता की जॉर्ज फर्नांडिस या नावाची मोहिनी मुंबईसह नागपुरात देखील होती.  तरुणपणापासून समाजवादाचा झेंडा घेऊन चालणाऱ्या फर्नांडिस यांनी भारतीय राजकारणात एक वेगळे स्थान निर्माण केले. १९६७ च्या निवडणुकीनंतरच्या जॉर्ज फर्नांडिसची कहाणी राजकीय इतिहासाच्या पानांवर नोंदली गेली आहेच परंतु त्या अगोदर जॉर्जच्या आयुष्यात काय चालले होते याबाबतीत फारच कमी जणांना माहिती असेल.

जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म भलेही कर्नाटकात झाला असली तरी त्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र आणि बिहार राहिली. हिंदी, इंग्रजी, तमिळ, मराठी, कन्नड, उर्दू, मल्याळी, तेलुगू, कोकणी आणि लॅटिन भाषा येत असत.

3 जून 1930 रोजी कर्नाटक मधील मंगलोर येथे जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या धार्मिक वृत्तीच्या मध्यमवर्गीय मंगलोरी कॅथॉलिक ख्रिश्चन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील एका खाजगी विमा कंपनीत अधिकारी होते. 

त्याची आई इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज याची प्रशंसक होती. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचं नाव जॉर्ज असं ठेवलं होतं. तो त्याच्या 6 भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. घरात धार्मिक वातावरण असायचे.

अशातच त्याच्या आई-वडिलांनी विचार केला कि, जॉर्जनेही याच धार्मिक वातावरणात राहावे. म्हणून त्यांनी जॉर्जला त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी बंगळूरूला पाठविण्यात आले.

तेथील संस्थेच्या काही नियमांबाबत ते अस्वस्थ झाले. तिथील संस्थाचालक सेमिनार ला आलेल्या विद्यार्थ्यांच्या समोर उंच टेबलवर जेवायचे. त्यांना देण्यात येणारे जेवण अगदी चांगल्या दर्जाचे असायचे आणि सेमिनारला आलेल्या विध्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे होते. जॉर्ज येथे कसे -बसे दोन वर्षे (१९४६ ते १९४८) राहिले, तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यासह तो ही त्या धार्मिकसंस्थेतून पळून जाऊन आझाद झाले.

ईटीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत जॉर्ज या सेमिनारची आठवण काढत म्हणतात कि,

“माझे त्या सेमिनार मुळे मन विचलित झाले होते. तिथे मला अनुभव आला कि, पाद्रीच्या कथनी आणि करणीमध्ये खूप फरक असतो. ते लोकांना जे संदेश द्यायचे ते स्वतःच तसं वागायचे नाहीत यामुळे मला हे पटले नाही. हे फक्त याच धर्मात नव्हे तर जगातील सगळ्याच धर्मामध्ये असेच दिसून येते.”

१९४९ मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले आणि त्या वेळेसच्या थंडीत जॉर्ज ने मुंबईमध्ये काम शोधत-शोधत कित्येक रात्र आणि दिवस मुंबईच्या रस्त्यावर रात्र काढली.

कोणत्या एखाद्या बाकड्यावर झोपलेला असतांना कित्येकदा पोलिसांनी हकलून द्यायचे आणि जॉर्ज लांब जाऊन दुसरा कुठला तरी बाकडा शोधायचे हाच क्रम कित्येक दिवस चालत राहिला. आणि एक दिवस त्यांना ‘प्रूफ रीडर’ चे काम मिळाले.

हळूहळू ते समाजवादी लोकांशी आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले, त्यांचा जॉर्ज यांच्या विचारांवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडला. आणि वयाच्या १९ व्या वर्षी ते मुंबईतील टॅक्सी युनियन चे सर्वात मोठे नेता म्हणून समोर आले.

1961 मध्ये त्यांनी मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. तिथून पुढे आठ वर्षे सततपणे जॉर्ज बीएमसीच्या सभागृहमध्ये शोषित कामगारांच्या समस्यांना समजून, त्यासाठी लढा देत राहिले. अखेर 1967 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला.

१९५० आणि ६० च्या दशकात कामगार नेता म्हणून त्यांची लोकप्रियता इतकी वाढत गेली की, त्यांनी १९६७ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते स.का पाटील यांचा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पराभव केला. दक्षिण मुंबई पाटील यांचा बालेकिल्ला होता. या विजयानंतर ‘जायंट किलर’ नावाने फर्नांडिस प्रसिद्ध झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.