आजारी नर्सला जागा मिळावी म्हणून खासदार जॉर्ज फर्नांडिस एसटीत उभे राहून प्रवास करत होते

साधारण साठच्या दशकातला काळ. त्या काळच्या राजकारणाने आजच्या प्रमाणे बीभत्स रूप पकडलं नव्हतं. आजूबाजूला असंख्य साधे-सीधे आमदार खासदार, मंत्री पाहायला मिळायचे. आमदार-खासदारांनी एसटी महामंडळाच्या बसने फिरण्याचा तो जमाना होता. कोणतंही वाहन वातानुकुलीत असण्याचा तो काळ नव्हता! अगदी पंतप्रधान देखील नॉन एसी अँबेसेडर कारने फिरायचे.

तेव्हा एसटीच्या बसमध्ये आमदार आणि खासदारांसाठी काही जागा राखीव असत. आपला मतदारसंघ असो किंवा कोणताही दौरा तत्कालीन नेते एसटीनेच प्रवास करायचे. त्यानिमित्ताने त्यांचा जनतेशी संपर्क देखील तुटलेला नसायचा. एसटीत प्रवासात बसून नागरिकांचे प्रश्न सोडवणारे आमदार खासदार महाराष्ट्राच्या जुन्या लोकांनी पाहिलेले आहेत.

अशीच एक हृद्य आठवण जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलेली आहे. 

१९६८/६९ चा काळ असावा. प्रवीण बर्दापूरकर नववीला असावेत. त्यांची आई ‘माई’ नर्स होती. त्यांची नियुक्ती ‘मराठवाडा’कार अनंत भालेराव यांच्या खंडाळा या गावी असतानाचा हा प्रसंग आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात हे खंडाळा गाव आहे. मासिक वेतनासाठी माईंना औरंगाबाद ओलांडून अडूळ या गावी जावं लागत असे.

बर्दापूरकर यांच्या आईंना अर्धशिशीचा अतित्रास होता. एकदा पगारासाठी जाण्याआधीच त्यांना तो त्रास सुरु झाला आणि तापही आला. पण, पगारासाठी जाणं आवश्यक होतं. कपाळाला बाम लाऊन आणि फडक्यानं कपाळ घट्ट आवळून, सोबतीला प्रवीण यांना घेऊन त्या निघाल्या.

वैजापूरकडून बस आली व आईलेक बसमध्ये चढले. गर्दी खूप असल्यानं रेट्यानं बसच्या समोरच्या भागात पोहोचले. बर्दापूरकर सांगतात,

समोर वातावरणात जरा आदब होती. कारण ग. प्र. प्रधान, जॉर्ज फर्नाडीस, मृणाल गोरे असे मान्यवर तिथे बसलेले होते. आम्ही त्यांना ओळखलं. ओळख नसली तरी त्यांचे फोटो आम्ही वृत्तपत्रात पाहिलेले होत.

कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस तेव्हा खासदार होते. मुंबई सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स.का.पाटलांचा त्यांनी केलेला पराभव संपूर्ण देशात गाजला होता. आपल्या एका इशाऱ्यावर मुंबई बंद पाडण्याची क्षमता असलेले जॉर्ज देशात जायंट किलर म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या सोबत असलेल्या मृणाल गोरे आणि ग.प्र.प्रधान हे समाजवादी चळवळीतले महत्वाचे नेते होते.

प्रवीण बर्दापूरकर सांगतात त्यांच्या आईने अदबीनं त्या तिघांना अभिवादन केला. तेव्हा तिने लावलेल्या बामचा वास तिथे पसरला. जॉर्ज यांनी चौकशी केली. आम्ही कोण आणि काय झालंय ते मी सांगितलं.

मृणालताई गोरे यांनी माईंच्या अंगाला हात लावून बघितलं; अंगात ताप जाणवल्यावर जॉर्ज यांना ते सांगितलं. लगेच जॉर्ज उठले त्यांनी माईंना बसायला जागा करून दिली. प्रवीण बर्दापूरकर यांच्या आईंनी खूप विरोध केला. तरी मृणालताईंनी त्यांना त्या जागेवर जबरदस्तीनं बसवून घेतलं. शिरूर फाटा यायच्या आतंच माईंचा डोळाही लागला.

प्रवीण बर्दापूरकर म्हणतात जॉर्ज यांनी औरंगाबादपर्यन्तचा प्रवास उभ राहून गप्पा मारत केला, हे आजही पक्क स्मरणात आहे. पुढे पत्रकारीतेत आल्यावर आणि मृणालताई तसंच जॉर्ज यांना मी हा प्रसंग सांगितला तर त्यांना तो आठवला नाही. कसं आठवणार कारण ते नेते कायम लोकांचे होते आणि लोकांसाठी वागणं हा त्यांचा डीएनए होता.

सन्दर्भ- प्रवीण बर्दापूरकर यांचा ब्लॉग 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.