२७ वर्षाचा पोरानं धोटेंना पराभूत केलं यावर इंदिरा गांधींना पण विश्वास बसला नव्हता.

१९७७ च्या निवडणूका देशात आजही लक्षात ठेवल्या गेलेत. देशात आणीबाणी उठवल्यानंतर झालेल्या या निवडणुका खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरल्या होत्या. वातावरण कॉंग्रेसी विरोधी होते. याचा फायदा घेत जनता पक्षाचे पहिले बिगर कॉंग्रेसी सरकार अस्तित्वात आले.

पण या कॉंग्रेस विरोधी वातावरणामुळे कॉंग्रेसचे बडे बडे बुरुज ढासळले होते. यात अगदी इंदिरा गांधी आणि संजय गांधी हे देखील आपले मतदारसंघ वाचवू शकले नव्हते.

मात्र अशा स्थितीमध्ये सुद्धा नागपूरमधून कॉंग्रेसच्या एका २७ वर्षाच्या पोरानं विजय मिळवला होता. ते देखील जांबुवंतराव धोटे, बॅ. खोब्रागडे यांच्या सारख्या दिग्गजांना पराभूत करुन. हा विजय त्याकाळी चमत्कारापेक्षा कमी नव्हता.

गेव्ह आवरी, असं या तरुण खासदाराचं नाव होतं. 

१९७१ च्या निवडणूकीत नागपूरची जागा विदर्भसिंह जांबुवंतराव धोटे यांनी कॉंग्रेसकडून घेतली होती. त्यामुळे १९७७ साली विद्यमान खासदार म्हणून त्यांना ही निवडणूक सोपी जाणार असं वाटतं होतं. तर दुसरीकडे राज्यसभा सदस्य असलेले बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यासारखे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते हे नागपुरातून निवडणूक लढवत होते, त्यांना जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा होता.

खरं तर काँग्रेस आणि रिपाइं एकमेकांच्या बरोबर होते. पण, खोब्रागडे यांनी ‘नागपूरची जागा काँग्रेसनं रिपाइंसाठी सोडावी,’ असा आग्रह धरला आणि ही आघाडी तुटली. यानंतर रिपाइंचे खोब्रागडे तेव्हा जनसंघाच्या साथीने निवडणूक लढवायला उतरले.

त्यामुळे या दोघांच्या समोर काही प्रमाणात का होईना, पण लढत देऊ शकेल, असा उमेदवार काँग्रेसला नागपुरातून हवा होता. अशावेळी इंदिरा गांधी, तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नरेंद्र तिडके यांच्या पातळीवर उमेदवार म्हणून त्यावेळी नगरसेवक असलेल्या गेव्ह आवरी यांच्या नावाची चर्चा चालू झाली.

त्यांची आणि इंदिरा गांधी यांची १९७३ मध्ये भेट झाली होती. तेव्हा विद्यार्थी आंदोलनांच्या धामधुमीचा तो काळ होता. काँग्रेसमधील काही विद्यार्थी नेत्यांना पंतप्रधान गांधी यांनी दिल्लीला बोलावलं होते. त्यावेळी त्यांच्यासमोर भाषण करण्याचीही संधी आवरी यांना मिळाली होती. त्यांचे वडील जनरल मंचरशा आवारी यांचाही संदर्भ त्या भेटीत निघाला होता.

अखेरीस हो-नाहीची चर्चा पुर्ण होवून आवरी यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आणि अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. विरोधात सगळे दिग्गज आणि त्या तुलनेत आवारी नवखे, अशी परिस्थिती होती. 

जांबुवंतराव धोटे यांचा प्रचार मोठा धामधुमीचा असायचा. त्यांचे कार्यकर्ते विरोधकांच्या सभा उधळून लावायला मागं – पुढे बघत नसतं. त्यावेळी तिन्ही उमेदवारांना एका मंचावर बोलवून त्यांची भाषणं आयोजित केली जात होती.

शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात अशाच एका सभेदरम्यान जांबुवंतरावांनी इंदिरा गांधी यांच्या बद्दल काही तरी बोलले, त्यावेळी आवरींनी रागानं उभं राहतं त्यांचा विरोध केला. पण त्या गडबडीत जांबुवंतरावांचा तोल गेला आणि ते पडणार, इतक्यात त्यांना सावरलं. मात्र, जांबुवंतरावांच्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला आणि सभेत गोंधळ सुरू झाला.

त्याचा दोष जांबुवंतरावांच्या कार्यकर्त्यांनी आवारींवर ठेवला. एवढच नाही तर आवारी यांच्या उत्तर आणि पश्चिम भागातल्या प्रचारसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांना दगडफेक सहन करावी लागली होती.

अखेरचा उपाय म्हणून वातावरण बदलण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींची सभा घेण्याचं ठरवण्यात आलं. त्यानुसार कस्तूरचंद पार्कमध्ये २ वाजता दुपारच्या उन्हात त्यांची सभा पार पडली. देशात त्यांच्या विरोधात लाट असताना देखील नागपुरात मात्र हि सभा ‘हाऊसफुल्ल’ झाली होती.

त्यावेळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, डॉ.रफीक झकेरिया यांनी देखील नागपूरवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. बॅ. शेषराव वानखडे आणि वि. स. पागे हे तर सभागृहाचे अध्यक्ष आणि सभापती असतानाही प्रचारासाठी नागपूरला आले होते.

या सगळ्यांना देखील माहित होत कि जांबुवंतरावांच्या विरोधात निवडणूक लढवणं म्हणजे सोप्प काम नव्हतं. उत्साहात प्रचार पार पडल्यानंतर मतदान झाले. आणि जेव्हा निकाल लागला तो सगळ्यांनाच धक्कादायक होता.

गेव्ह आवारी हे ४४.५५ टक्के मतं मिळवत विजयी झाले.

बॅ. खोब्रागडे यांना ३३.७९ टक्के मतं मिळाली आणि ते दुसऱ्या स्थानी राहिले. तर जांबुवंतराव धोटे यांना २०.५० टक्के मतच मिळाली. बाकीच्या सातही अपक्षांच तर डिपॉझिट पण जप्त झालं होतं. ज्या भागात दगडफेक देखील आवारींना चांगली मत मिळाली होती.

देशात इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र कॉंग्रेसचे उमेदवार गेव्ह आवारी यांनी सर्वांचे अंदाज मोडून काढत विजय मिळवला होता. 

मातब्बरांना हरवून निवडून आल्यावर आवारी इंदिरा गांधी यांना भेटायला दिल्लीला गेले होते.

तेव्हा भेटल्यावर त्यांचा पहिला प्रश्न होता ‘तुम्ही निवडून कसे काय आलात?’

खुद्ध इंदिरा गांधी यांना आवारी निवडून आले यावा विश्वास बसत नव्हता. म्हणून त्यांनी तातडीने नागपूरचा बूथनिहाय अहवाल देण्यास सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ असं दिवसभर आर.के. धवन यांच्यासोबत बसून त्यांनी तो अभ्यासला होता.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.