लग्न झालेलं नसूनसुद्धा माधुरीला नो प्रेग्नंसी क्लॉजवर सही करावी लागली होती.

१२ मार्च १९९३. मुंबईमध्ये भयानक बॉम्बस्फोट झाले. अख्खा देश हादरून गेला. मुंबई पोलिसांनी रात्रंदिवस एक करून युद्धपातळीवर तपास केला. काही दिवसातच पहिली अटक करण्यात आली. टायगर मेमनपासून दाउद इब्राहीमपर्यंत मुंबईच्या गँगस्टार्सचा हात या कारस्थानामागे होता.

आणि एक दिवस बातमी आली, फिल्मस्टार संजय दत्तचं नाव सुद्धा बॉम्बस्फोट खटल्यात समोर आला. संजय दत्तला देखील अटक झाली. पूर्ण बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॉम्ब पडला. संजय दत्तच्या घरच्यांना, त्याच्या फॅन्सना जेवढ वाईट वाटलं नाही त्याच्यापेक्षा जास्त मोठा धक्का तो काम करत असलेल्या फिल्मच्या निर्मात्या दिग्दर्शकांना बसला.

यात सगळ्यात आघाडीवर होते सुभाष घई.

संजय दत्तला अटक झाली पण त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर तो फक्त साधा गुन्हेगार नाही तर राष्ट्रद्रोही दहशतवादी ठरणार होता. अशा माणसाचा सिनेमा कोण बघायला जाणार?  सुभाष घईना हार्ट अटॅकच येईल की काय अशी वेळ होती, कारण त्यांचा संजय दत्त मुख्य भूमिकेत असलेला सिनेमा जवळपास तयार होता.

नाव होत, खलनायक

सुभाष घईंचा खलनायक हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. जवळपास ३-४ करोड रुपये बजेट होत. आधी या सिनेमासाठी नाना पाटेकर यांना साईन करण्यात आलं होत. तेव्हा खूप कमी बजेटमध्ये हा सिनेमा बनणार होता पण जेव्हा स्क्रिप्ट रेडी झाली तेव्हा घई यांच्या लक्षात आलं की मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी नानाच वय जास्त होतय. एका वाट चुकून गुन्हेगारीच्या मार्गाला लागलेल्या तरुणाच्या भूमिकेत कोणीतरी मोठा स्टार घ्यावा.

तेव्हा संजय दत्तला हा रोल देण्यात आला. 

सर्व अर्थाने संजय दत्त या भूमिकेसाठी शोभत होता. त्याच्यासोबत इन्स्पेक्टरची भूमिका आमीर खान ला देण्यात आली मात्र त्याला सुद्धा खलनायकाची भूमिका जास्त आवडली होती . घईना मात्र संजय दत्तच्या बाबतीत कोणतीच तडजोड करायची नव्हती. अखेर आमीर च्या जागी जॅकी श्रॉफ आला. आणि हिरोईन??

एक लेडी पोलीस ऑफिसर अंडरकव्हर बनून खलनायकाच्या आयुष्यात जाते जी त्याच्या कठोर हृदय रुपी दगडाला पाझर पाडते आणि आपल्या बॉयफ्रेंड असलेल्या हिरो इन्स्पेक्टरला त्याला पकडायला मदत करते ,असा हिरोईनचा रोल होता.

इन्स्पेक्टर आणि देसी डान्सर या दोन्ही भूमिका एकत्र निभावू शकणारी एकच अभिनेत्री इंडस्ट्री मध्ये होती, धकधक गर्ल माधुरी दीक्षित.

माधुरी तेव्हा एक नंबर वर होती. बेटा साजन असे सुपरहिट सिनेमे तिचे नुकतेच प्रदर्शित झाले होते. फक्त दिसायला आणि डान्स मध्येच नाही तर दमदार अभिनेत्री म्हणून ती फेमस होती. सुभाष घईना ती सोडून दुसरा कोणीही पर्याय समोर दिसत नव्हता पण तिला साईन करावं की नको अशी त्यांची द्विधा मनस्थिती होती. यामागे कारण ही होत ते म्हणजे संजय दत्त आणि माधुरी दीक्षित प्रेमप्रकरण.

तगडा देखणा संजय दत्त आणि माधुरी यांच प्रेमप्रकरण फुलत होत. थानेदार, साजन,साहिबा अशा सिनेमामध्ये त्यांनी एकत्र काम केलं होत. संजय तेव्हा विवाहित होता पण त्याची पत्नी रिचा शर्मा कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने ग्रस्त होऊन न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होती. गॉसिप मॅगझिन मध्ये चर्चा होती की संजय आणि माधुरी एकत्र रहात आहेत आणि लवकरच ते लग्न करणार आहेत.

सुभाष घई यांनी बरेच पैसे या सिनेमासाठी गुंतवले होते यामुळे ते कोणतीही रिस्क घेण्यास तयार नव्हते. त्यांनी माधुरीला एका “नो प्रेगनन्सी” क्लॉज वर सही करायला लावली. याचाच अर्थ चित्रपट बनेपर्यंत माधुरीला गरोदर राहण्यास परवानगी नव्हती.

माधुरीच लग्न झालं नव्हत पण तरी सुभाष घईनी ते क्लॉज टाकलं, कारण संजय दत्त आणि माधुरी आउटडोअर शूटिंगच्या वेळी एकत्र असणार आणि पुढे काही झालं तर आपल्या सिनेमाला धक्का पोहचू नये.

माधुरीपेक्षा संजय दत्तकडून नो बॉंब क्लॉज वर सही करून घ्यायला पाहिजे होती असं घईना नंतर वाटलं असेल.

पिक्चरचं शुटींग पूर्ण होत आलं आणि संजय दत्तला अटक झाली.  त्याला जामीन मिळाल्यावर सिनेमाचं डबिंग वगैरे सोपस्कार उरकण्यात आले पण हिरो जेल मध्ये असलेला सिनेमा रिलीज कसा करायचा याचं टेन्शन घईना होते.

त्यांनी इंडस्ट्रीमधल्या अकरा नामांकित दिग्दर्शकांच्या साठी दिल्लीमध्ये प्रीमियर शो ठेवला. यावेळी संजय दत्त जामिनावर बाहेर होता. तो माधुरीसोबत प्रीमियरला आला तेव्हा त्यांना बघायला थिएटरच्या बाहेर भयानक गर्दी उसळली. त्या दिवशीच घईना कळाल सिनेमा चालणार. त्यांनी संजय दत्तच्या निगेटिव्ह इमेजचा फायदा करून घ्यायचं ठरवलं

“जी हां मै हुं खलनायक”

असे मोठे मोठे पोस्टर लावण्यात आले. दाढी केस वाढवलेल्या कैदी संजूबाबाबद्दल लोकांच्यात उत्सुकता होतीच. देशभर सिनेमाविरुद्ध प्रदर्शन करण्यात आले पण पिक्चर तुफान चालला. पब्लिकने थिएटर डोक्यावर घेतले.

संजय दत्तची खलनायकी इमेज आणि माधुरीचं “चोली के पीछे क्या है ” हे गाणं या दोन्ही मुळे सिनेमाला फायदा झाला. माधुरीच्या गाण्याविरुद्ध सुद्धा अश्लीलतेचे केस टाकण्यात आले पण घई सगळ्यांना पुरून उरले.

सिनेमा सुपरहिट झाला पण संजय दत्त आणि माधुरीचं ब्रेक अप झालं. माधुरीन परत कधी संजय दत्तचं नाव सुद्धा उच्चारलं नाही.

आणि नो प्रेग्नंसी क्लॉजचं पुढ काय झालं? खलनायकच्या वेगवेगळ्या वादात या क्लॉजचा वाद मागेच पडला.

आजही हा वाद मिटला नाही. अनेक विचारवंत म्हणतात की असा क्लॉज टाकणे हे स्त्रियांच्या मातृत्वाच्या हक्काचा अपमान केल्याप्रमाणे आहे. ऐश्वर्या रायला हिरोईन सिनेमा मधून मधुर भांडारकरनी याच कारणाने काढलं अशी चर्चा होती. कितीही वाद झाले पण तरीही अनेक दिग्दर्शक हा क्लॉज आजही टाकतात हे मात्र खर

खलनायक रिलीज होऊन २५ वर्षे झाली. सुभाष घई सध्या फ्लॉप असल्यामुळे सिनेमे बनवत नाहीत. संजय दत्तनी त्याच्या कारावासाचा दुसरा हप्ता पूर्ण केला आहे. राजू हिरानीनी संजू सिनेमा बनवून त्याच्या इमेजचा मेकओव्हर करण्याचा प्रयत्न सुद्धा करून झालाय. माधुरीताईच लग्न झालं, दोन पोरं झाली. आता त्या अमेरिकेत असलेल्या डॉक्टर नवऱ्याला घेऊन परत मुंबईत सेटल झाल्या आहेत.

परत खलनायक २च्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या सगळ्यांना आता एका सुपरहिटची गरज आहेच. बघू माधुरी संजू बाबा बरोबर परत काम करते का?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.