म्हणून ‘घाशीराम कोतवाल’ नंतर देना बँकेने सिनेमांसाठी कर्ज देणं बंद केलं

भिडूंनो, ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाविषयी माहीत नाही असा एकही मराठी माणुस आढळणार नाही. डाॅ. मोहन आगाशे यांनी या नाटकात रंगवलेला नाना फडणवीस चांगलाच गाजला. जवळपास २० वर्ष हे नाटक रंगभूमीवर हाऊसफुल्ल गर्दी खेचत होतं.

विजय तेंडुलकर लिखित या नाटकाने रंगभूमीचं संपूर्ण स्वरुपच बदललं. आता जसं छोट्या-मोठ्या गोष्टी नाहक उकरुन वाद निर्माण केले जातात, तशाच वादांना ‘घाशीराम कोतवाल’ला सुद्धा सामोरं जावं लागलं. घाशीराम कोतवाल संबंधी जो वादंग संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना देशात निर्माण झाला होता, त्याविषयी खुप ठिकाणी आजवर बोललं गेलंय.

आजच्या लेखाचा विषय वेगळा आहे. २० वर्ष रंगभूमीवर प्रेक्षकपसंती मिळवत असलेल्या या नाटकावर आधारीत जेव्हा सिनेमा बनवण्यात आला तेव्हा नेमकं काय झालं,

आणि ‘देना बँक’ आणि ‘घाशीराम कोतवाल’ चा नेमका संबंध काय, याचा किस्सा तुम्हाला सांगणार आहे. 

नटसम्राट’ नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर ही भुमिका करायला मिळावी, हे प्रत्येक नटाचं स्वप्न असतं. तसंच काहीसं विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’च्या बाबतीत झालं होतं. ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा साचा इतका जबरदस्त होता की या नाटकासारखं काहीतरी करायला मिळावं, ही त्याकाळी प्रत्येकाची इच्छा होती. ‘घाशीराम कोतवाल’ने जणु काही सर्वांच्या मनावर भुरळ घातली होती.

१९७६ साल उजाडलं.

भारतामध्ये व्यावसायिक सिनेमांसोबत दैनंदिन जगण्यातले विषय मांडणा-या समांतर सिनेमांचा एक प्रवाह सुरु होता. लोकांच्या रोजच्या जगण्यातले विषय, त्यांना भेडसावणा-या समस्या असं समाजातलं जळजळीत वास्तव मांडणारे हे सिनेमे व्यावसायिक सिनेमांच्या गर्दीत स्वतःचं ठळक अस्तित्व दाखवत होते.

सत्यजित रे सारखे दिग्दर्शक समांतर सिनेमांच्या प्रवाहात दखलपात्र काम करत होते. अशा समांतर भारतीय सिनेमांना पहिल्यांदा जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं श्रेय जातं मणी कौल यांना. फ्रान्स, जर्मनी, युरोपमध्ये मणी कौल यांचं खुप नाव होतं. 

मणी कौल हे पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ (FTII) मध्ये शिकवत होते. १९७५-७६ साली त्यांनी त्यावर्षात FTII मधून शिक्षण पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांपुढे एक कल्पना मांडली. ‘देना बँकेची एक योजना आहे, त्या योजनेअंतर्गत ते सुशिक्षित बेरोजगार माणसांना १५००० रुपयांचं कर्ज देतात.’

मणी कौल यांनी विद्यार्थ्यांना हे सांगताच, पासआऊट होणा-या विद्यार्थ्यांनी या योजनेत रस दाखवला. मणी कौल यांनी FTII च्या १६ विद्यार्थ्यांची एक टीम बनवली. या टीमला मणी कौल यांनी ‘युक्त’ हे नाव दिलं. 

देना बँकेच्या योजनेअंतर्गत मणी कौल यांनी या १६ विद्यार्थ्यांना घेऊन सिनेमा बनवण्याचं ठरवलं.

४ दिग्दर्शक, ४ कॅमेरामन, ४ एडिटर्स आणि ४ ध्वनी संयोजक अशी ही १६ जणांची टीम होती. या १६ जणांनी देना बँकेकडे अर्ज करुन प्रत्येकी १६,००० रुपयांचं कर्ज मिळवलं. मिळालेल्या पैशातुन त्यांनी ‘घाशीराम कोतवाल’ या नावाचा सिनेमा बनवण्याचं ठरवलं.

‘घाशीराम कोतवाल’ नाटकाला त्यावेळेस ४ वर्ष पूर्ण झाली होती. परंतु सिनेमाचं शीर्षक सोडलं तर संपूर्णपणे हा सिनेमा ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचं रुपांतर नव्हतं. मणी कौल यांनी नाटकातल्या काही प्रसंगावर आधारीत ‘घाशीराम कोतवाल’ सिनेमाची बांधणी केली होती. 

मोहन आगाशे सिनेमात सुद्धा नाना फडणवीसाची भुमिका साकारणार होते तर घाशीरामच्या भुमिकेत ओम पुरी होते. ‘हा सिनेमा नाटकाचं रुपांतर नाही, तर नाटकाची संकल्पना घेऊन, ब्रिटीशांनी लोकांच्या जमिनी हडप केल्यानंतर त्याचे भारताच्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेवर कसे दूरगामी परिणाम झाले हे या सिनेमातुन आपण मांडणार आहोत.’ असं सर्व कलाकारांना सिनेमाविषयी सांगण्यात आले.

नाटकाप्रमाणेच सिनेमाची पटकथा लिहिण्याची जबाबदारी विजय तेंडुलकर यांनी स्वीकारली.

कोणताही सिनेमा डोळ्यासमोर ठेवला तर त्या सिनेमाला साधारण एक किंवा जास्तीत जास्त दोन दिग्दर्शक असतात. ‘घाशीराम कोतवाल’ सिनेमाला ४ दिग्दर्शक होते. एवढंच नाही, तर सिनेमाच्या पटकथेची ४ भागांमध्ये विभागणी करण्यात आली. हे ४ भाग सिनेमाच्या प्रत्येक डिपार्टमेंटला वाटण्यात आले. उदाहरणार्थ, ४ एडिटर असल्याने एका एडिटरने सिनेमाचा एक भाग त्याच्या परीने एडीट करायचा. यामुळे झालं असं की, सिनेमाच्या शुटींगच्या वेळेस कॅमेरामागे काम करणा-या प्रत्येकाने त्यांच्या दृष्टीने पटकथेतले प्रसंग गाळले.

याचा परिणाम असा झाला, जेव्हा १६ जणांनी त्यांच्या वाटणीचे प्रसंग एडिट वगैरे करुन तयार केले तेव्हा एका प्रसंगाचा दुस-या प्रसंगाशी काही ताळमेळ जमेना.

मग ही माणसं तेंडुलकरांकडे गेली. तेंडुलकरांनी प्रसंगांची संगती जुळण्यासाठी काही वाक्य लिहून दिली. चार्ली चॅप्लीनच्या मूकपटांना जशी दोन प्रसंगादरम्यान मध्येमध्ये वाक्य येतात, अगदी तशीच वाक्य तेंडुलकरांनी लिहून दिली. जेव्हा तुम्ही हा सिनेमा बघाल तेव्हा अशा वाक्यांच्या पाट्या सिनेमात पाहायला मिळतील. 

‘घाशीराम कोतवाल’ सिनेमा १९७६ साली प्रदर्शित झाला तेव्हा प्रसंगांची झालेली इतकी विचित्र सरमिसळ पाहून, खुप लोकांना सिनेमा कळलाच नाही. डाॅ. श्रीराम लागू यांनी या सिनेमाविषयी केलेलं विधान गंमतीशीर आहे. डाॅ. लागू म्हणतात,

“मराठी सिनेमा मला कळणार नाही असं कधीच होणार नाही, असं मी म्हटलं होतं. पण माझं वाक्य मी मागे घेतो. हा सिनेमा मराठी आहे पण मला अजिबात कळाला नाही.”

‘घाशीराम कोतवाल’ सारख्या नाटकाची बुकींग काऊंटर उघडताक्षणी तिकीटं संपून जायची. २० वर्ष या नाटकाचा ‘हाऊसफुल्ल’ चा बोर्ड अबाधित राहिला, त्या नावाचा सिनेमा ३ दिवस सुद्धा सिनेमागृहात चालला नाही.

देना बँकेने कर्जाची परतफेड करण्यासाठी १६ विद्यार्थ्यांमागे तगादा लावला होता. ‘घाशीराम कोतवाल’ सिनेमाला कोणताही आर्थिक फायदा झाला नव्हता. या सर्व प्रकरणात प्रचंड नुकसान सहन करावं लागल्याने सिनेमांसाठी कर्ज देणं देना बँकेने कायमचं बंद केलं. काही गोष्टी त्यांच्या मूळ माध्यमातच श्रेष्ठ असतात. ‘घाशीराम कोतवाल’ सिनेमा जरी चालला नसला, तरी नाटक म्हणुन ते कायमच दर्जेदार आणि अव्वल राहील.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.