घसीटाराम फाळणीत सगळं गमावून मुंबईत आले, अन् घसीटाराम हलवाईचा ब्रँड तयार झाला…

मुंबईच्या ग्रॅन्ट रॉड परिसरातील लॅमिंग्टन रोडवर पंजाबी घसीटारामचं हॉटेल आहे. हॉटेल केवळ याच एका रोडवर नाही तर देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये या हॉटेलच्या शाखा आहेत. अगदी भारताबाहेर युरोप, अमेरिका आणि दुबईतसुद्धा पंजाबी घसीटारामच्या शाखा दिसतील. 

पण या सगळ्या शाखांमध्ये लॅमिंग्टन रोडवरचं पंजाबी घसीटाराम हॉटेल हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण याच एका हॉटेलमधून पंजाबी घसीटाराम हॉटेलची सुरुवात झाली होती. 

गेल्या ७१ वर्षांपासून मुंबईमध्ये सुरु असलेल्या घसीटारामचे खास पंजाबी आणि इंडियन गोडधोड निव्वळ हॉटेलमध्येच नाही तर पॅकबंद डब्ब्यात सुद्धा मिळतात. पण सर्व पदार्थांमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे तो बॉम्बे हलवा..  

पण घसीटारामच्या नावात पंजाबी आणि हलव्याच्या बॉम्बे असलं तरी या हॉटेलचं मूळ मात्र पाकिस्तानच्या कराचीत आहे. 

घसीटाराम हलवाईचे संस्थापक घसीटाराम बजाज हे मुलाचे पाकिस्तानातल्या कराचीचे. मारवाड्याच्या घरी जन्मलेल्या घसीटाराम यांच्या हाताला चांगली चव होती. समोसे, मिठाई हे सगळे हॉटेलातले पदार्थ बनवण्याचं त्यांना चांगलं अनुभव होतं. यातूनच त्यांनी १९१६ सालात कराचीमधील ताबूत लेनवर ‘घसीटाराम देवीदत्तराम’ नावाचं हॉटेल सुरु केलं. 

हाताला चव आणि पदार्थ बनवण्यात कसब असलेल्या घसीटाराम यांचं हॉटेल चांगलं सुरु होतं. दिवसेंदिवस कराचीच्या ताबूत लेनमध्ये हॉटेलचं नाव होत होतं. पण १९४७ मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली. तेव्हा कमावलेलं सर्व काही तिथेच टाकून घसीटाराम हे पत्नी आणि १८ वर्षाचा मुलगा गोवर्धन याला घेऊन भारतात आले. 

भारतात शून्यातून सुरुवात करावी लागणार होती त्यामुळे ते आधी अमृतसरला स्वतःच्या मामाकडे गेले. पण अमृतसरमध्ये कोणता व्यवसाय करायचा यावरून ते गोंधळात पडले. पण अवघ्या ४ वर्षातच घसीटाराम यांनी अमृतसर सोडलं आणि बायको पोरासोबत मुंबई गाठली. 

मुंबईत आलेल्या घसीटाराम यांनी १९५१ मध्ये लॅमिंग्टन रोडवर घसीटाराम हलवाई हॉटेलची सुरुवात केली.

पण हॉटेल जम धरत असताना घसीटाराम यांचं निधन झालं आणि हॉटेलची सर्व जबादारी त्यांचा मुलगा गोवर्धनदास बजाज यांच्यावर आली. गोवर्धनदास यांनी खऱ्या अर्थाने हॉटेलात पुढे नेलं. फेरीवाल्याप्रमाणे लाकडी बाकावर बसून त्यांनी या व्यवसायाला वाढवण्यास सुरुवात केली. पण जेव्हा हॉटेल मोठं झालं तेव्हा सुद्धा त्यांनी स्वतः काम करणं सोडलं नाही. गोवर्धनदास बजाज स्वतः कामगारांमध्ये बसून समोसे आणि लाडू बनवण्याचं काम करायचे. 

गोवर्धन यांच्या ५ ही मुलांनी वेगवगेळ्या शाखांमध्ये उच्च शिक्षण घेतलं पण उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आलेल्या मुलांना ते हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कामाला लावायचे. कॅश काउंटर, पॅकिंग काउंटर, स्वयंपाकघर या सगळ्यांमध्ये वेगवगेळ्या मुलांच्या जबाबदाऱ्या ठरलेल्या असायच्या. पण १९७९ साली गोवर्धनदास बजाज यांच्या कुटुंबात कलह झाला आणि त्यांच्या मुलांनी आपापले वेगवेगळे व्यवसाय सुरु केले. 

व्यवसाय वेगळे झाले असले तरी नाव एकाच होत. पण २००० मध्ये पुन्हा कुटुंबात फुट पडली त्यामुळे विप्पण बजाज यांनी २००३ मध्ये पंजाबी घसीटाराम हलवाई प्रा. ली. ची सुरुवात केली. 

नाव बदललं मात्र पदार्थांची चव तीच राहिली. बॉम्बे हलवा, मिल्क केक, मोमबे मिक्स ड्राय फ्रुट चिवडा, शाही मिक्स फरसाण यासारखे ५०० हून अधिक पदार्थ पंजाबी घसीटाराम मध्ये मिळतात. डबाबंद पदार्थांसोबत गणेश चतुर्थीला मोदक, दिवाळीत लाडू, होळीत पुरणपोळी आणि मकर संक्रांतीला तिळाचे लाडू स्पेशल असतात. 

दिवाळीमध्ये बदाम काजू आणि ड्रायफ्रुट वापरून बनवलेल्या मिठायांच्या हम्परची विशेष मागणी असते. दिवाळीमध्ये सगळीकडे गोडाधोडाची विशेष मागणी असते. तेव्हा नातेवाईकांना भेट म्हणून मिठाई देण्यासाठी पंजाबी घसीटारामचे गिफ्ट हम्पर खरेदी केले जातात. 

पारंपारिक मिठाईसोबतच पंजाबी घसीटारामला हेल्दी पदार्थांसाठी सुद्धा ओळखलं जातं.  नाचणी आणि ओट्सचे लाडू, कमी साखरेच्या मिठाया, गुज बेरी आणि खजूर घातलेले फ्राईड चिप्स, ज्वारीचे पफ्स, ग्रानोला इत्यादी पदार्थ बनवले जात आहेत.

४ थ्या पिढीच वारसा चालवणाऱ्या विप्पन बजाज यांची मुल कुणाल आणि राहुल यांनी पंजाबी घसीटारामला आधुनिक बनवलंय.

त्यामुळेच आता घसीटारामचे पदार्थ डबाबंद पद्धतीने जगभरात विकले जातात. आयएसओ प्रमाणित असलेल्या उत्पादन युनिटमधून एके दिवसात १ लाख गुलाबजामून बनवले जातात. यासोबतच इतर पदार्थ सुद्धा वेगवेगळ्या युनिटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बनवले जातात.हॉटेलच्या युनिटमध्ये तज्ज्ञ महाराज, फूड टेक्नॉलॉजिस्ट आणि मायक्रो बायोलॉजिस्टस, कुशल अकुशल कारागीरांच्या माध्यमातून दर महिन्याला ५ हजार किलो मिठाईची विक्री करते.

आज देशासोबातच जगभरात प्रसिद्ध असलेल्या या पंजाबी घसीटाराम हलवाई मागे खरा हात आहे तो घसीटाराम बजाज यांचा. घसीटाराम बजाज यांनी फाळणीनंतर कराचीहून अमृतसर गाठल आणि त्यानंतर मुंबईत येऊन या प्रसिद्ध हॉटेलची निर्मिती केली. त्यामुळे मुंबईकरांना त्यांचा प्रसिद्ध बोम्बे हलवा चाखायला मिळाला. आता हाच बॉम्बे हलवा लवकरच रिलायंस मार्टमध्ये सुद्धा मिळणार आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.