राजकुमार संतोषींनी धर्मेंद्र यांना आपल्या चित्रपटात कधीच घेतले नाही, त्याचं कारण म्हणजे…
मोठ्या कलाकृती जमून यायला योग लागत असतात. असे योग प्रत्येक वेळेला येतातच अशातला भाग नाही पण कधीकधी सर्व गोष्टी जुळून येतात आणि उत्तम कलाकृती बनते. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासाठी १९९० साली आलेला ‘घायल’ हा चित्रपट असाच होता.
‘घायल’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट होता.
राजकुमार संतोषी ऐंशीच्या दशकामध्ये दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे सहाय्यक म्हणून काम करीत होते. निहलानी सोबतचा त्यांचा पहिला चित्रपट होता ‘अर्धसत्य!’.पार्टी आघात, तमस च्या वेळी ते निहलानी सोबत होते.
त्यानंतर राजकुमार संतोषी यांनी स्वतः दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. एक उत्तम कथा घेऊन ते ‘जीते हे शान से’ या चित्रपटाचे दिग्दर्शक केवल शर्मा यांच्याकडे गेले. त्यांना ही कथा खूप आवडली आणि हा चित्रपट प्रोड्यूस करण्यासाठी ते तयार झाले. त्यांची अट एकच होती;
या चित्रपटात चा नायक मिथुन चक्रवर्ती असेल..!
राजकुमार संतोषी यांना मात्र या चित्रपटाचा नायक म्हणून पहिली पसंती कमल हसन आणि दुसरी पसंती सनी देवल हे होते. केवल शर्मा त्यांना म्हणाले “कमल हसन यांचे हिंदी सिनेमाच्या मार्केटमध्ये अजिबात नाव नाही. ते भलेही दाक्षिणात्य सिनेमाचे सुपरस्टार असले तरी हिंदीमध्ये ते एक ‘फ्लॉप स्टार’ आहेत.
तसेच सनी देवल यांचे नुकतेच प्रदर्शित झालेले ‘सबेरे वाली गाडी’ आणि ‘जबरदस्त’ हे सिनेमे देखील फ्लॉप झाल्याने या दोघांचे मार्केट आता नाही. त्यामुळे या सिनेमासाठी मिथुन चक्रवर्ती योग्य आहे.”
पण राजकुमार संतोषी मात्र त्यांच्या स्वत: च्या पसंतीच्या नावावर अडून राहिले होते. शेवटचा उपाय म्हणून केवळ शर्मा राजकुमार संतोषी यांना म्हणाले
हे कथानक तुम्ही सनी देओल यांना ऐकवा जर त्यांना पसंत असेल आणि ते चित्रपटात काम करण्यासाठी तयार असतील तर तो चित्रपट मी प्रोड्यूस करेल. राजकुमार संतोषी यांनी सनी देओल यांना चित्रपटाची कथा ऐकवली.
हि कथा ऐकून ते खूपच प्रभावित झाले आणि ते म्हणाले जर तुमचे निर्माते हा चित्रपट प्रोड्युस करणार नसतील तर आम्ही हा सिनेमा प्रोड्यूस करू.” इकडे ‘जीते है शान से’ चित्रपटाचे निर्माते मिथुन च्या नावावर आग्रही असल्याने राजकुमार संतोषी यांनी त्यांचा नाद सोडून दिला. आणि सनी देओल सोबत त्यांनी चित्रपट बनवायचे ठरवले.
सनी देओल संतोषी यांना घेऊन जयपूरला गेला. जिथे सनी देओल यांची पिताश्री धर्मेंद्र यांच्या ‘बटवारा’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. धर्मेंद्र यांना देखील या चित्रपटाची कथा खूप आवडली. हा चित्रपट आपल्या होम प्रोडक्शन मध्ये तयार करण्याचे ठरवले.
अशा पद्धतीने ‘घायल’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले.
एकदा हे चित्रीकरण पाहायला धर्मेंद्र स्वतः आले. त्यावेळी त्यांनी राजकुमार संतोषी यांना विचारले “तुमच्या नावा मध्ये संतोषी आहे. हा काय प्रकार आहे?” त्यावर राजकुमार संतोषी यांनी सांगितले “जुन्या काळातील निर्माते-दिग्दर्शक प्यारेलाल तथा पी एल संतोषी हे माझे वडील होते!” यावर धर्मेंद्रने त्यांना मिठी मारली.
धर्मेंद्र च्या डोळ्यात पाणी आले. राजकुमार संतोषी यांना ते म्हणाले “यार, आपने मुझे पहिले क्यू नही बताया. संतोषी साब का मै बडा प्रशंसक रहा हूं. उनकी मै बहुत इज्जत करता हूं. आप मेरे बेटे जैसे हो. आप इतने दिन स्ट्रगल करते रहे और आपने मुझे कुछ क्यू नही कहा की आप संतोषी साब के साहबजादे हो?”
राजकुमार संतोषी देखील खूप भावुक झाले. वडिलांचे नाव घेऊन त्यांना सिनेमात करियर करायचे नव्हते.स्वत: च्या मेरीट वर त्यांना पुढे यायचे होते. धर्मेंद्र यांनी त्या दिवशी सांगितले “आजवर मी बरेच सिनेमे बनवले आहेत पण कुठेही निर्माता म्हणून मी माझे नाव दिले नाही. आज प्रथमच मी ‘घायल’ या चित्रपटासाठी निर्माता म्हणून माझे नाव देत आहे आहे.
कारण हा सिनेमा माझ्या या गुरूच्या मुलाने दिग्दर्शित केला आहे!”
अशा रीतीने ऑफिशीयली धर्मेंद्र यांचे नाव निर्माता म्हणून समोर आले.
‘घायल’ सुपरहीट ठरला. त्यानंतर ‘दामिनी’,’अंदाज अपना अपना’, ‘खाकी’, ‘घातक’ असे सिनेमे राजकुमार संतोषी यांनी दिले. धर्मेंद्र यांना मात्र त्यांनी आपल्या चित्रपटात कधीच घेतले नाही. याचे कारण देताना ते खूप भावुक झाल ते म्हणाले,
“धर्मेंद्र यांनी माझ्यावर जन्मभराचे उपकार केले आहेत. त्या उपकारातून मी माझी कधीच सुटका करून घेऊ शकत नाही. ते मला वडलाच्या जागी आहेत आणि माझ्यामध्ये हिम्मत नाही की मी त्यांना डायरेक्ट करू शकेल. कॅमेराच्या मागे मी असेल व समोर धर्मेंद्र असतील आणि त्यांना मी ‘कट’, ‘ॲक्शन’ असे म्हणून माझ्या तालावर नाचवेल. हि हिंमत माझ्यात नाही.”
हे ही वाच भिडू
- राजीव गांधीनी ऐनवेळी कपडे दिल्याने वाचली अमिताभ ची इज्जत !
- शिमल्यात जावून कृत्रीम बर्फ पाडण्याचा उद्योग फक्त संजय लीला भंसाली करू शकतात..