घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार शिवरायांच्या आजोबांनी केला होता.

औरंगाबाद जिल्ह्याच्या कुशीत प्राचीन काळापासून स्थापन असलेले घृष्णेश्वर मंदिर सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. शंकराचे हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौलताबाद पासून हे मंदिर वेरूळ लेण्यांजवळच अगदी ११ किमी अंतरावर आहे. प्रतिवर्षी शिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरत असते.

ह्या मंदिराचे उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण आणि महाभारत सारख्या महान ग्रंथात देखील मिळतात.

वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ असलेल्या या मंदिराचा इतिहास बराच काही सांगून जातो. सद्या अगदी भक्कमपणे उभे असलेले या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केला असा इतिहास सांगतो.  सुमारे २०० वर्षांपूर्वी अहल्याबाईंनी आपल्या सासू गौतमीबाई उपाख्य बायजाबाई यांच्या स्मरणार्थ ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख शिलालेखात सापडतो.

या मंदिराचा प्रथमतः जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांनी केला आहे,  याचा उल्लेख या मंदिरात असलेल्या एका शिलालेखावरून कळतो.

राष्ट्रकूट वंशातील कृष्णराजाने बांधलेल्या मूळ मंदिराचा १५९९ मध्ये जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केल्याचा उल्लेख भांडारगृहावरील शिलालेखात आहे. शहाजीराजे भोसले यांचे वडील म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांनी हे मंदिर पुन्हा उभे केले त्यात सुधारणा केल्याचं इतिहासात नोंद आहे. परंतु पुढे औरंगजेबाने त्याचा विध्वंस केला असे उल्लेख विविध ग्रंथात सापडतात.

मात्र सद्द्यस्थितीत असलेले मंदिर हे मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त असलेल्या अहिल्याबाई यांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचा अर्धा भाग लाल पाषाणात तर वरील भाग विटा व चुन्यात बांधलेला आहे. मंदिराचा कळस देखील सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आहे. 

या मंदिराचे नक्षीकाम मात्र अमासामान्य असे आहे.

एकूण ५६ दगडी पायऱ्या असलेले हे मंदिर विविध कलापूर्ण मूल्यांनी सजवले आहे. मंदिराच्या शिखरावर, छतावर आणि मंडपाच्या खांबांवर सुंदर नक्षी, सुरेख मूर्ती व चित्रे आहेत. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणाभोवती उंच कोट असून जवळच शिवालयतीर्थ हे बांधीव प्रशस्त तळे देखील आहे.

ह्या तीर्थकुंडाच्या चौरस बाजूला एक एकराचा परिसर पसरला आहे, त्याला चारही बाजूने प्रवेशद्वार आहेत.

मंदिराच्या या तीर्थकुंडाचा देखील अहिल्याबाईंनीच जीर्णोद्धार केला आहे.

या कुंडामध्ये शंकराची आठ मंदिरे ही भारतातील अष्टतीर्थांची प्रतिकात्मक बांधकामे म्हणून आहेत. उत्तरेस काशी तीर्थ, ईशान्येस गया, पूर्वेस गंगा, आग्नेयेला विरज, दक्षिणेस विशाल, नैॠत्येस नाशिक, पश्चिमेस द्वारावती व वायव्येस रेवा तीर्थ आहे. या तीर्थांची लांबी-रुंदी १८५ बाय १८५ फूट आहे. प्रत्येक कोपऱ्यात दगडाच्या २-२ अशा एकूण आठ खोल्या आहेत.

मंदिराच्या पूर्वेला एक शिलालेख आहे, त्यावर लिहिलेय कि, ‘श्री शके १६९१ विरोधि वस्स रिमा धसुदि नाग बुध दिनि होळकर कुलाल वा लकल्प वल्ली श्री अहिल्याबाईने श्री तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला असे श्री सक शिवमाकल्प,’.

या मंदिराच्या दगडावर शिवपार्वती विवाह, गणेश कथा, ब्रम्हा, विष्णू अशा अनेक कथा पुराणकथा कोरलेल्या दिसतात. या मंदिराला घृष्णेश्वर हे नाव पडण्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात.

या घृष्णेश्वर मंदिराला २७ सप्टेंबर १९६० मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेले. तर मग भिडूंनो हे घृष्णेश्वर मंदिर म्हणून अस्तित्वात असलेली, तसेच शिल्पकलेचा उत्कृष्ट आणि अजरामर असलेली हि प्राचीन वास्तू पाहायला नक्की जा !
हे हि वाच भिडू :
Leave A Reply

Your email address will not be published.