घुगुळ म्हणजे काय रं भावा…

लगीन घर म्हणलं कि, सगळं कसं तरतरीत उजळलेलं आणि उस्फुर्त वातावरण. आणि तशीच कार्यक्रमांची लगबग. सुरवात हुत्या आंब्याचा डहाळा दारात रोवून मुहुर्तमेढ न. एकूणच काय तर घरच्या शुभकार्याला देव-देवतांना आवताण धाडण्याचा हि परंपरा. आमच्या कोल्हापूर भागात लगीन कार्य, वराती परीस ज्यादा महत्वाचं असतंय ते हळद आणि घुगुळ.

घुगुळ म्हंजी काय?

तर, दोन मातीच्या हंड्याच्या आकाराच्या मडक्यात, चंदनाच्या लाकडाचं तुकड, कापूर आणि तुपाच्या संगतीनं पेटवायचं आणि ते हातात धरून नाचत नाचत जवळपासच्या टीकाटिपतुर जायचं. तिकटीवर एक बारका देवाचा विधी असतोय, नैवेद्य करून नवरामुलगा आणि वरमाई ला वाजवत घराला आणायचं.

ह्या पूर्ण प्रोसेस मधी हातात ते घुगुळाचं कापड घेतल्यावर, घरला परतुस्तोवर नवरामुलगा आणि वरमाई दोघांनी एक शद्ब बोलायचं नस्तय. नवऱ्या मुलाला हळद लागली कि, हाय त्या वल्ल्या अंगानं हातात घुगुळाचं कापड धरून, सोयाबीतील वरमाई बी केसं मोकळं सोडून हातात घुगुळाचं कापड धरून उभी. मग देवाचं नाव घेऊन घुगुळ पेटवायचा. आणि मंग सुरु होतोय हलगीचा कडकडाट.

हलगी चा एक ठेका पडला कि पब्लिक पाक खूळच. एकदा का हे सगळं सुरु झालं कि थांबायचं नाव नाही. ठराविक टप्प्यावर गेलं कि तो घुगुळ नवरा मुलगा आणि वरमाई च्या डोक्यावर टेकवायचा आणि,

 जोतिबाच्या नावानं चांगभलं !!

म्हणायचं आणि मग दुसऱ्या दोन पोरांनी तो नाचवायला हातात घायचा.

Screen Shot 2018 03 18 at 11.18.17 PM

परवा अपघातात मेलेलं तानाजी साठे, राजारामपुरीतला राजू आवळे, झालाच तर नव्या पिढीचा लक्षतीर्थ वसाहतीत राहणार आमचा अर्जा हि तर हलगीवाली मंडळी म्हणजे तर घुगुळ स्पेशालिस्ट. हेंच्या नुसत्या ठेक्यावरच, हातात आरतीचं ताट धरलेल्या करवलीचा पाय बी न कळंताच थिरकतोयच. एका हातात ते पेटता घुगुळ एक होतं खणखणीत शिट्टी वाजवत, ठेका धरत नाचायचं ते आपल्या कोल्हापूरच्या भावांनीच.

त्यातनं एखाद गाबड शौकीन असलं कि १००-५० ची नोट हलगी वाल्यासमोर जमिनीवर ठेवली कि हालगी वाजवायची न थांबवता, गुडघ्यावर खाली वाकून हात न लावता नुसत्या कापाळांन ती नोट उचलायची, हे म्हणजे बघणाऱ्यांसाठी डोळ्याचं पारणं फिटलं असं असतंय. हालगी-कैचाळचा ठेका आणि रंगात आलेली तरुणाई म्हणजे एक येगळंच मिश्रण.

Screen Shot 2018 03 18 at 11.32.54 PM

एकदा का हे सगळं घरला आलं कि मग नवरदेव इच्छेनं ठराविक “मुद्दल” त्या घोळक्यातल्या एकाकडं हळूच सारतय आणि मग सगळी “सोयीच्या” दिशेनं प्रस्थान करत्यात, दुसऱ्यादिवशीच्या लग्नाला ताजतवानं हुण्यासाठी.

आजच्या या लग्नानंतरच्या डॉल्बीयुक्त वरातीच्या जमान्यात कोल्हापूरनं अजुनपण हे घुगुळ आणि हालगी समीकरण हिरारीनं जोपासलंय हेच काय ते नवल.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.