टाटांची नॅनो तर बंद झाली, पण तिला बनवणारे मराठमोळे गिरीश वाघ सध्या काय करतात?

अवघ्या एक लाख रुपयांत चार चाकी गाडी, अशी ओळख घेवून १० वर्षापुर्वी रस्त्यावर आलेल्या टाटा नॅनोने आता आपल्यातुन निरोप घेतला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उत्पादनात झालेली घट हे कारण देवून कंपनीने अधिकृत रित्या उत्पादन बंद करत असल्याचे सांगितले आहे.

२००९ मध्ये जवळपास २ लाख नॅनो गाड्यांचे ॲडव्हान्स बुकींग झाले होते. पण २-३ वर्षामध्येच आग लागण्याच्या प्रकाराला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच या गाड्यांच्या विक्रीत कमालीची घट होण्यास सुरुवात झाली. यानंतर कंपनीकडून या गाड्या परत बोलवून घेण्यात आल्या. त्या रिडिझाईन करण्यात आल्या. मात्र तरीही या घटनानंतर भितीमुळे ग्राहकांचा प्रतिसाद थंडावलाच.

मागील ३ वर्षापासून तर कमालीची घट दिसत होती. २०१७ या संपुर्ण वर्षात २०० गाड्यांची देखील विक्री झाली नव्हती. जून २०१८ मध्ये कंपनीने केवळ एका गाडीचे उत्पादन केले होते. २०१९ मध्ये तर एकाही गाडीचे उत्पादन झाले नाही. आणि आता तर अधिकृतरित्या उत्पादन बंद केले आहे.

असा सुरु झाला होता नॅनोचा प्रवास…

रतन टाटांनी एकदा मुंबईच्या मुसळधार पावसात चार जणांच्या कुटुंबाला एकत्र जाताना बघितले आणि तिथेच नॅनोची बीज पेरली गेली. २००५ मध्ये सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडणारी, सुरक्षित चारचाकी गाडी बनविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. आणि २००९ मध्ये स्वप्नपूर्ती होऊन ती रस्त्यावर धावूही लागली.

अवघ्या एक लाख रुपयांत चार चाकी गाडी मिळणार ही कल्पनाच सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची होती. ती टाटांनी सत्यात उतरवून दाखवली.

परंतु, आपल्याकडे गाडी बनविण्याची सगळी यंत्रणा आहे, तर चला एक नवी गाडी बनवू, असे टाटांनी म्हटले आणि लगेच ‘नॅनो’ रस्त्यावर आली असे अजिबात झाले नव्हते. त्यासाठी अनेक संकटांशी व अडचणींशी सामना करावा लागला. त्यानंतर ‘नॅनो कार’चा जन्म झाला होता.

या गाडीची डिझाइन बनविणे आणि जाहीर केलेल्या एक लाख रुपयांत तिचा उत्पादन खर्च बसविणे हे फार मोठे आव्हान रतन टाटा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांपुढे होते.

अशातच गाडीला सुरुवातीलाच आणि सर्वात जास्त फटका बसला तो पश्चिम बंगामधील राजकारणाचा. सिंगुरमधील जमिनीच्या वादानंतर देशाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या गुजरातमधील साणंद इथे हा प्रकल्प स्थलांतर करण्यात आला.

इथून प्रकल्प पुन्हा जोमाने उभा राहिला. आणि २००९ मध्ये नॅनो सर्वसामान्यांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे घोषणा करून पाच वर्ष उलटली, दरम्यानच्या काळात प्रत्येक वस्तूच्या किमतीत वाढ झाली, असे असतानाही गाडीच्या किमतीत वाढ न करता, जाहीर केलेल्या एक लाख रुपयांना ती ग्राहकांना देण्याचे वचनही पाळण्यात आले.

जवळपास २ लाख गाड्यांचे ॲडव्हान्स बुकिंग झाले. ‘नॅनो’च्या या यशामुळे संपूर्ण वाहन उद्योग ढवळून निघाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची नोंद घेण्यात आली. एकदा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रतन टाटा यांची ‘जगातील सर्वांत स्वस्त कार बनविणारे’, अशा शब्दांत आपल्या पत्नीला ओळख करून दिली होती.

संपुर्ण यशात मराठमोळ्या चेहऱ्याचे कष्ट..

पण मध्यमवर्गीयांना परवडेल अशी एक लाख रुपयाची गाडी बनवण्याचं रतन टाटांचे स्वप्न साकार केले ते एका मराठी माणसानं… लाखमोलाच्या ‘नॅनो’ कारच्या या शिल्पकाराचे नाव होते गिरीश वाघ. सुमंत मुळगावकरांच्या पाठोपाठ टाटांचा हा दुसरा मराठमोळा तरुण.

गिरीश वाघ यांच कौतुक करताना कार लाँचिंगच्यावेळी रतन टाटा म्हणाले होते,

ही कार हे माझं स्वप्न होतेच, पण ते साकार करण्यासाठी गेली चार वर्षे तरुण इंजिनिअर्सची टीम खपत होती. या कारचे श्रेय जाते ते गिरीशला आणि त्याच्या टीमला… आणि इथूनच त्यांची नॅनोमॅन म्हणून ओळख प्रसिद्ध झाली.

पण कोण होते गिरीश वाघ?

गिरीश वाघ यापुर्वी परिचीत होते ते टाटा एस या (छोट्या हत्ती) या मिनी टेम्पोचे जनक म्हणून.

१९९२ला मॅकेनिकल इंजिनीअरींगचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर गिरीश यांची एसपी जैन कॉलेजच्या कॅम्पसमधून टाटा मोटर्समध्ये निवड झाली. सुरुवातीला ट्रक डिव्हीजनमध्ये प्रोडक्ट डिझाईन मध्ये काम केले. नंतर व्हेंडर डेव्हलपर म्हणून काही वर्ष जबाबदारी संभाळली.

त्यांच्या करिअरला खरी गती मिळाली ती २००० मध्ये, जेव्हा रवि कांता टाटा मोटर्सचे व्यवस्थपकीय संचालक झाले. रवि कांतांनी वाघ यांना मिनी ट्रक्सच्या डिझाईनसाठी पुर्ण वेळ काम करण्याची जबाबदारी दिली.

वाघ यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवत या काळात त्यांनी टाटा ‘एस’ या मिनी टेम्पो(छोटा हत्ती)च्या डिझाईनवर काम केले आणि टाटा मोटर्सच्या इतिहासातील लॅन्डमार्क ठरलेल्या या मिनी टेम्पोची निर्मिती केली. मालवाहून नेण्यासाठी कमी किमतीमध्ये टेम्पो अशी या गाडीची कल्पना होती. आज देखील ही अनेकांच्या दाराची शान आहे.

अशातच २००५ मध्ये नॅनोची घोषणा झाली.  टाटा मोटर्स ही जरी टाटांची कंपनी असली तरी तिला मोठं केलं होतं एका मराठी माणसाने म्हणजेच सुमंत मुळगावकर यांनी. रतन टाटा हे त्यांचेच शिष्य

पुढे टाटाचे अध्यक्ष झाल्यावर रतन टाटा यांनी कंपनीच्या गाड्यांच्या डिझाइनवर जवळपास वर्षभर मेहनत घेतली. सुमंत मुळगावकर यांचं स्वप्न असलेली कंपनी जागतिक शिखरावर न्यायचं होत.

मात्र एक लाखाची गाडी तयार करायची आणि त्यात भारतीयांसाठी जास्तीत जास्त आरामदायी सेवा द्यायच्या हे एक फार मोठे आव्हान होते.

त्यामुळे पारंपरिकता सोडून, आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसलेला विचार प्रत्यक्षात आणायचा तर चाकोरी बाहेरचा विचार करु शकणारा, उत्साही आणि तरुण डिझायनर कंपनीला हवा होता.

अशा वेळी त्यांची नजर गिरीश वाघ यांच्यावर पडली. ‘टाटा एस’च्या डिझाईनमुळे आणि मिळालेल्या यशामुळे ते टाटांच्या आगदीच जवळचे बनले होते. त्याचमुळे २००५ मध्ये त्यांना छोट्या प्रवासी कार डिझानच्या प्रमुखपदी आणले गेले.

मुळगावकर यांच्या प्रमाणेच गिरीश वाघ देखील मराठी!  रतन टाटा यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला.

यानंतर टाटा मोटर्सने आपले सगळ्यात मोठे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी वाघ यांच्या हाती सोपवली. सोबतीला होते इंडस्ट्रियल डिझायनर निखिल जाधव, गाडी उत्पादन प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळणारे प्रियदर्शन क्षीरसागर, कंपनीच्या नवी उत्पादन टीमचे सदस्य विवेक सहस्त्रबुद्धे, नॅनो विकास प्रकल्पातील नियोजन टीमचे इंजिनीयर अतुल के. वैद्य व जयदीप देसाई, व्हेइकल इंटिग्रेशन टीमचे प्रमुख अभय देशपांडे तसंच एम. बी. कुलकर्णी, एम. बी. परळकर आदी इंजिनीअर्स.

या सगळ्यांनी मिळून टाटांच्या स्वप्नाची ही जबाबदारी समर्थपणे पूर्ण केली. पण नंतरच्या काळातील घटनांनी नॅनोच्या विक्रीत घट झाली. ग्राहकांच्या मनात आगीविषयी बसलेली भिती घालवण्यास कंपनीला अपयश आले. आणि खप कमी होण्याचे हेच सर्वात मोठे कारण होते.

गिरीश वाघ सध्या काय करतात?

कमर्शिअल व्हेईकलचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र फिसरोदे यांनी मे २०१७ मध्ये वैयक्तिक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर जून २०१७ मध्ये गिरीष वाघ यांना कमर्शिअल व्हेईकलच्या प्रमुखपदी होते.

आल्याबरोबरच त्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी होती ती आपल्या सोबतच्या कंपन्यांसोबत स्पर्धात्मक वातावरण तयार करत गाड्यांचा खप वाढवणे. कारण २०१६ – १७ मध्ये टाटा मोटर्सचे मिडीयम आणि हेवी व्हेईकलचे शेअर्स ५१.२ टक्क्यांवरती आले होते. जे की २०१३-१४ च्या तुलनेत ७ टक्क्यांनी कमी होते.

२०१७ – १८ मध्ये वाघ यांनी जबाबदारी स्विकारली त्यानंतर माल वाहतुक अर्थात हेवी व्हेईकलच्या जवळपास १ लाख ९२ हजार युनिट्सची विक्री झाली. पुढच्याच वर्षी २०१८- १९ पर्यंत ही विक्री साधारण ४१ हजार युनिट्सने वाढून २ लाख ३३ हजार युनिट्स पर्यंत घेवून जाण्यास गिरीश वाघ यांना यश आले आहे.

सध्या ही ते टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक या कार्यरत आहेत.

(आकडेवारी संदर्भ : Auto Punditz)आणि 

टाटा इंडिका ते ते टाटा नॅनो आणि एस मिनी टॅम्पो ते टाटाचे कमर्शिअल व्हेईकल अश्या सगळ्या जबाबदाऱ्या वाघ यांनी समर्थपणे पेलल्या. नॅनोमॅन ही त्यांच्या आयुष्यात त्यांना मिळालेली विशेष ओळख. जरी ती गाडी नंतरच्या काळात अपयशी ठरली असली तरी आजही ते टाटा यांच्या अगदीच जवळचे मानले जातात.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. हेमंत अरविंद लाटकर says

    मराठी माणूस कमी नाही.

    मराठी माणसा जागा हो….
    संधी ओळखून पाऊल टाक….
    व्यवसायातही मराठी माणूस पुढे जाऊ शकतो…..

Leave A Reply

Your email address will not be published.