तो खरा टप्पामास्टर होता आणि ऑफ स्टम्प त्याची व्हॅलेंटाईन होती

२००३ वर्ल्ड कपच्या अंतिम (सॉरी आजकाल सगळ्याला महाअंतिम म्हणायची पद्धत आहे), तर महाअंतिम सामन्यात आपल्याला ३६० चं महाप्रचंड टार्गेट मिळालं होतं. सचिनने ड्रेसिंग रूममध्ये सहकाऱ्यांना दिलासा देत सांगितलं की प्रत्येक ओव्हरला एक फोर मारली तरी दोनशे इथेच झाले, बाकी २५० मध्ये १६० आपण करू शकतोच. अर्थात तेव्हा त्याच्या आजूबाजूला नव्वदीच्या दशकातली भारतीय बॅटिंग नव्हती, म्हणून एवढं तरी म्हणायची सचिनची छाती झाली.

आपली इनिंग सुरु झाली आणि पहिले तीन बॉल डॉट्स खेळल्यावर सचिनने चौथ्या बॉलवर कडकडीत फोर मारलीही. पण पुढच्याच बॉलवर तो आउट झाला. बॉलरनेच त्याला तसाच शॉट मारायला लावून कॉट अँड बोल्ड केले. रणनीती आखणाराच जेव्हा पहिल्याच ओव्हरला आउट होतो, तेव्हा बाकी टीमचे मोराल जरा डाऊन होतेच.

आणि याला कारणीभूत कोण – तर तो बॉलर. त्यासाठी मीच काय कोणताच भारतीय त्या बॉलरला कधीच माफ करणार नाही, पण तरीही तो बॉलर माझा फेव्हरेट आहे. आज त्या बॉलरचा ५१ वा वाढदिवस.

‘ग्लेन डोनाल्ड मॅग्रा’ नेहमीच त्याचा टप्पा आणि अचूक लाईन अँड लेन्थसाठी ओळखला जायचा. त्याने एक टप्पा पकडला की तो दिवसभर त्याच टप्प्यावर बॉलिंग करू शकायचा. हे प्रचंड अवघड आहे. याची अप्रतिम बॉलिंग एक्शन सतत पाहून आम्हीही मैदानात खेळताना तशी सातत्यपूर्ण बॉलिंग करायला इच्छुक असायचो. अर्थात आमच्यात साम्यही होतंच की.. मॅग्रा एक टप्पा पकडून बरोब्बर ऑफ स्टम्पवर सतत बॉलिंग करत राहायचा, आमचाही टप्पा सतत जिथे कुठे पडायचा तिथे ऑफ स्टम्प लावली की झालं. जोक्स अपार्ट, पण एकदम शिस्तबद्ध, लयबद्ध, आणि नियंत्रित एक्शनसाठी मला ग्लेन मॅग्रा आणि शॉन पोलॉक अगदी खास वाटतात.

फिटनेस, दुखापती, फॉर्म या त्रैराशिकातून जाणाऱ्या फास्ट बॉलरसाठी टेस्टमध्ये ५०० विकेट्स अवघडच. वॉल्शने हे करून दाखवलं, पण मॅग्रा त्याच्याही पुढे गेला.

मग कसोटीत मॅग्राचे ५६३ विकेट्सचे हे रेकॉर्ड बराच काळ अबाधित होते, पण इंग्लंडचा जेम्स अँडरसन आता त्याच्याही पुढे गेला आहे. वॉर्न, मुरली, कुंबळे असोत की अक्रम, डोनाल्ड, अँब्रोस, मॅग्रा.. या खोऱ्याने विकेट्स घेणाऱ्यांच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे त्यांच्या बॅट्समननी भक्कम स्कोर करून ठेवला की यांचं काम सोपं व्हायचं आणि आधीच दडपणाखाली असलेल्या समोरच्या टीमचा ते लवकर फडशा पाडायचे.

२००४ पर्थ टेस्टमध्ये चौथ्या डावात पाकला ५६४ चे अशक्यप्राय टार्गेट दिल्यावर त्यांना कांगारूंनी ७२ मध्ये गुंडाळले होते याचे कारण मॅग्रा २४ मध्ये ८ घेऊन बसला होता. सातत्याने ऑफ स्टम्पबाहेरचा टप्पा निवडल्याने (आणि मुख्य म्हणजे तो निष्ठेने पाळल्याने) त्याच्या बॉलिंगवर स्लिपमध्ये उभे राहणारे मार्क वॉ, पॉन्टिंग, हेडन, क्लार्क वगैरे त्याचे आजन्म आभारी राहतील. नाहीतर त्यांचे इतके कॅचेस झालेच नसते. शिवाय किपर गिलख्रिस्ट तर होताच हक्काचा सेफ हॅन्ड्स म्हणून. अर्थात स्लिपमध्ये उभे राहणाऱ्यांवर तितकी जबाबदारीही असायचीच, कारण मॅग्राचा कोणताही बॉल त्यांना संभाव्य कॅच असायचा.

कसोटी जिंकून द्यायला वीस विकेट्स घेणारे बॉलर्स हवेत, आणि कसोटीत मॅग्रा तब्बल ११ वेळा सामनावीर आणि ५ वेळा मालिकावीर ठरलाय.

वनडेत ३८१ विकेट्स घेताना हेच आकडे १५ आणि २. कसोटीत २९ वेळा तर वनडेत ७ वेळा पाच विकेट्स. बरं हे सगळं कधी, तर जगातला बेस्ट स्पिनर त्याच्याच टीममध्ये असताना आणि तो पाहिजे तिथे पाहिजे तितक्या विकेट्स काढत असताना. मॅग्रा आणि वॉर्नमध्ये नेहमीच असं हेल्दी विकेट्स शेअरिंग व्हायचं.

२००४ साली अँकल सर्जरी झाल्यावर तो पुनरागमन करू शकेल नाही याची शंका होती. पण तो आला.

पुन्हा दोन वर्षांनी कॅन्सरग्रस्त पत्नीच्या आजारपणात त्याने मोठी सुट्टी घेतली, तेव्हाही वाटलं की आता गेला मॅग्रा. पण तो आला. आणि आला तो असा आला की इंग्लंडला २००६-०७ च्या ऍशेसमध्ये ५-० असा व्हाईटवॉश दिला तेव्हा आपल्या सिडनीच्या होमग्राउंडवर त्याने टेस्टमधून निवृत्ती घेतली. आणि मग ऑस्ट्रेलियाने २००७ वर्ल्डकप जिंकला त्या स्पर्धेत तब्बल २६ विकेट्स घेत तो मालिकावीर ठरला. ती फायनल त्याची शेवटची वनडे.

त्याच वर्ल्डकपमध्ये नामिबियाविरुद्ध १५/७ ही त्याची बेस्ट वनडे कामगिरी त्याने नोंदवली. शिवाय करियरमधील टेस्ट, वनडे आणि टी-ट्वेन्टी तिन्ही प्रकारात आपल्या शेवटच्या बॉलवर विकेट घेणारा असा हा एकमेव आहे. तीन वर्ल्ड कप जिंकल्यावर आता मिळवायचं काहीच बाकी नाही अशा वेळी खऱ्या अर्थाने टॉपवर असताना त्याने क्रिकेटला अलविदा केला, तेही शेवटच्या वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर होऊन. पहा, मेहनतीला नशिबाचीही उत्तम साथ.

शंभर टेस्ट्स खेळणारा हा ऑस्ट्रेलियाचा पहिला फास्ट बॉलर.

लिली, थॉमसन, मॅकडरमॉट, ह्यूज यांच्यानंतर ऑसी बॉलिंग आणखीच नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं क्रेडिट मॅग्राला नक्कीच जातं. भरपूर उंची लाभली असूनही त्याने त्याचा टप्पा आयुष्यभरासाठी निवडलेला असल्याने तो भेदक बाउन्सरसाठी कधी फार ओळखला गेला नाही (त्यासाठी कांगारूंनी गिलेस्पी ठेवला होताच). पण पीच आणि हवामान साजेसे असताना बाउन्सर आणि स्विंगनेही त्याने हैराण केलं आहेच.

मॅग्रा तसा स्लेजिंगही मजबूत करायचा. माईक आथरटन बिलकुल फॉर्मात नसताना हा एकदा त्याला म्हणाला,

‘तुझी बॅटिंग का खराब होतेय मला कळलंय, तुझ्या बॅटच्या टोकाला काहीतरी शेणासारखं घाण चिकटून राहिलंय.’

आथरटनने बॅटची खालची बाजू चेक केली तर मॅग्रा म्हणाला, ‘ते टोक नाही’.

बॅट्समनचा असा कित्येकदा अपमान करणाऱ्याला पुण्याचं नागरिकत्व मिळायला काहीच हरकत नसावी. मुळातच स्लेजिंग ही ऑसी संस्कृती आहे. ते त्याला पार्ट ऑफ गेम म्हणत असल्याने त्यांना त्यात काही वावगेही वाटत नाही. ते कधी वर्क व्हायचं तर कधी नाही. विंडीज चौथ्या डावात विक्रमी ४१८ चेस करताना मॅग्राने सरवानला प्रचंड स्लेजिंग करूनही शेवटी ऑसी हरलेच होते. लारा आणि सचिनवर तर मॅग्राचं याबाबतीत विशेष प्रेम. सचिनही त्याला बॅटने तोडीस तोड उत्तर द्यायचा.

दोघांची जुगलबंदी बघण्यासारखी असायची, आणि सचिन वॉर्नला भारी पडला हे मान्य केलं तरी मॅग्रा-सचिन युद्धात मला मॅग्रा किंचित वरचढ वाटत आलाय.

बाकी अचूक टप्प्याचा मॅग्राला तसा अहंकार वगैरे नसावा, पण असलाच तरी पुढे राहुल द्रविडने तो कमी नक्कीच केला असेल. ‘कृष्णा’ या अभिजात सिनेमात सुनील शेट्टीचा एक डायलॉग आहे,

‘तुम मुझे मारते मारते थक जाओगे, लेकिन मैं मार खाते खाते नही थकूंगा’

(हा तुम्ही सुनीलच्याच आवाजात वाचला नसेल तर तुमची जिंदगानी मोठ्या प्रमाणावर धन्य आहे).. तसा हा कितीही वेळ ऑफ स्टम्पबाहेर बॉल टाकूदे, द्रविड तो शांतपणे सोडून द्यायचा. कधीकधी काही वेळाने मॅग्रा आणि गिलख्रिस्ट एकमेकातच खेळत बसायचे. जणू द्रविड म्हणतोय, ‘तू टाकून टाकून थकशील, पण मी सोडून सोडून नाही थकणार’.

पण पुढे याच द्रविडसोबत त्यालाही २०१२ च्या अँन्युअल ब्रॅडमन अवॉर्ड्स फंक्शनमध्ये सन्मानित करण्यात आलं. जानेवारी २०१३ मध्ये तर मॅग्राच्या ऑल टाइम ग्रेटनेसवर शिक्कामोर्तबच झालं – आयसीसीने त्याला ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये मानाचं स्थान दिलं.

मॅग्राचं टोपणनाव पिजन (कबुतर) आणि हातात बॅट धरायची वेळ आली की हा खरंच कबुतरासारखा लगेच उडून परत पॅव्हेलियनमध्ये जाऊन बसायचा, कारण बॅटिंगमध्ये हा माणूस अगदी डोनाल्डसारखाच विनोदी प्रकार होता. डोनाल्ड म्हणजे त्याचे वडील नव्हे, तर १९९९ ची वर्ल्डकप सेमी ऑस्ट्रेलियाला जिंकून देणारा साउथ आफ्रिकेचा अॅलन डोनाल्ड. फास्ट बॉलर असूनही ज्याने मोक्याच्या क्षणी पळायला कंटाळा केला आणि क्लुसनरच्या आजन्म शिव्या खाल्ल्या तोच. तरीही मॅग्राचं कसोटीत एक अर्धशतक (६१) आहे राव, हाही त्यावेळचा नंबर ११ चा हायेस्ट स्कोर होता. साला एकदा चांगली बॅटिंग केली तर तिथेही वर्ल्डरेकॉर्ड. काय माणूस आहे! त्याआधी वॉरसेस्टरशायरसाठी खेळताना त्याने एका टीममेटशी पैज लावून पन्नास केले होते.

तो सध्या काय करतो? तर सध्या तो चेन्नईतील एमआरएफ पेस फाउंडेशनचा डायरेक्टर आहे.

२००२ साली त्याने पत्नी जेनसह ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त महिलांना मदत आणि शिक्षणकार्य करणारे मॅग्रा फाउंडेशन सुरु केले. तेव्हा तो अजून खेळत होता, जेन स्वत: ब्रेस्ट कॅन्सरमधून रिकव्हर होत होती. पण जेनचा तिने ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देऊनही नंतर २००८ मध्ये मृत्यू झाल्यावर त्याने मॅग्रा फाउंडेशनकडे अधिक लक्ष दिले. एव्हाना तो निवृत्तही झाला होता. त्याची दुसरी पत्नी त्याच्या आयुष्यात ललित मोदींमुळे आली. २००९ आयपीएल दरम्यान त्याची इंटेरियर डिझायनर सारा लिओनार्डीशी भेट झाली आणि मग टप्पा अचूक आहे याची खात्री होताच मॅग्राने तिच्याशी लग्न केलं.

मॅग्रा तुझे भन्नाट स्पेल्स आजही आठवतात. तू बॉलिंग करत असताना अम्पायरला बरेचदा हात आडव्या रेषेत नव्हे, तर उभ्या रेषेत वर करावा लागायचा हेही आठवतंय. तुझं सातत्यच तसं सातत्यपूर्ण होतं. हे मॅग्रा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

  •  पराग पुजारी

हे ही वाचा भिडू.

1 Comment
  1. Arif says

    Very nice

Leave A Reply

Your email address will not be published.