राज्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी कोल्हापूर कोरोनाविरुद्ध कस लढतय हे पहायला हवं

सध्या चर्चा सुरु आहे की, कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला. म्हणजे काय तर बऱ्याच परदेशातून आलेले नागरिकांनी, त्यांच्या संपर्कात आलेले नागरिकांनी होम कोरोन्टाईन म्हणजे घरातच बसून राहण्याचे आदेश पाळले आले नाहीत व ते लोकांमध्ये फिरले.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना स्प्रेड होण्याची शक्यता बळावली.

इस्लामपूरच उदाहरण द्यायचं झालं तर इथेही चौघांना होम कोरान्टाईनचे आदेश दिले होते. त्यांच्याकडून ते पाळण्यात आले नाहीत. परिमाणी आज सांगलीच्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २५ इतकी झाली.

कट टू आपण कोल्हापूरात येवू.

दिनांक २० मार्चच्या दरम्यानची गोष्ट. रात्रीच्या आठ-साडेआठ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अमन मित्तल, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख व कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह प्रशासनाची बैठक सुरु झाली.

या बैठकीत काही कागद आले. या कागदांवर नाव आणि समोर फोन नंबर लिहण्यात आले होते. पालकमंत्र्यांनी आपल्याकडे दोन कागद घेतले आणि समोर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याकडे दोन दोन कागद देण्यात आले.

प्रत्येकाने कागदावर नाव असणाऱ्या व्यक्तिला व्यक्तिश: फोन लावण्यास सुरवात केली.

कुठे आहात? काय करताय? हे प्रश्न विचारून तुम्हाला होम कोरोन्टाईनचा आदेश देण्यात आला आहे. कशाप्रकारे घरी रहायचं आहे. कुटूंबापासून कशाप्रकारे अंतर ठेवायचं आहे या सगळ्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी पालकमंत्री व प्रशासकीय अधिकारी व्यक्तिश: प्रत्येकाला समजावून सांगू लागले.

एक-एक करत प्रत्येकाला फोन करुन कोरोनाबाबतचं गांभिर्य समजावून सांगण्यात आलं. घरी राहण्याचे आदेश पाळावेत म्हणून समजून सांगण्यात आलं,

व हे सगळं काम खुद्द पालकमंत्री करत होते. 

आज कोल्हापूरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या तीन आहे. यामध्ये एक रुग्ण इस्लामपूरच्या कुटुंबाशी संपर्क आलेली आहे. तर उर्वरीत दोन हे भाऊ बहिण आहेत. पुण्यात राहणारा भाऊ कोल्हापूरात आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या बहिणीला कोरोना झाला. त्यांची योग्य ती दक्षता घेतली जात आहे.

जिल्हात सुरक्षिततेच वातावरण निर्माण करण्यात प्रशासनाला यश येत आहे व याच क्रेडिट पालकमंत्री म्हणून बंटी पाटलांना दिलं जात आहे, त्याच कारण देखील तितकच महत्वाच आहे.

हे सगळं कस वर्कआऊट होऊ शकतं यासाठी कोरोनाचा कोल्हापूरी पॅटर्न अभ्यासायला हवा. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र आल्यानंतर काय होतं. 

आज लोकप्रतिनिधींना काय करायला हवं हे समजून देण्याचा हा प्रयत्न 

साधारण १९-२० मार्च दरम्यान कोरोनाचा विषय राज्यात गंभीरपणे चर्चेला आला होता. त्यापूर्वीपासूनच योग्य ती खबरदारी घेण्यात येत होतीच.

बंटी पाटलांनी १९-२० तारखेपासून कोरोनाचं गांभिर्य ओळखून आपला मुक्काम कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये हलवला. त्या तारखेपासून ते आजतागायत दिवसाचे १२ ते १४ तास ते कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी ऑफिसमध्येच ठाम मांडून आहेत.

दिनांक १९ मार्च रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली.

पालकमंत्री म्हणून येणाऱ्या काळात आपलं एकमेकांसोबत असणारं नियोजन व येणाऱ्या परिस्थितीत आपल्याकडे असणाऱ्या नियोजनांची चर्चा या बैठकीत करण्यात आली.

इथे सर्वात मोठ्ठी गोष्ट होती ती राजकारण्यांनी प्रशासनाला विश्वासात घेणं आणि प्रशासनाने राजकारण्यांना विश्वासात घेणं.

एका बैठकीतून विश्वासाचं नात निर्माण करुन आपणाला मोठी लढाई लढायची आहे हा विश्वास देण्यात आला.

याचा अपेक्षित परिणाम काय झाला तर अधिकाऱ्यांना बळ मिळालं, त्यांच्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बळ मिळालं व कर्मचारी चांगलं काम करतात म्हणून कोल्हापूरच्या नागरिकांमध्ये विश्वासाच वातावरण तयार होवू शकलं.

या बैठकांनंतर कोल्हापूरच्या एकूण आरोग्य व्यवस्थेची पाहणी करुन कृतीकार्यक्रम आखण्यात आला. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांना लागणारी गरज इथपासून ते कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी १०० खाटांची स्वतंत्र सोय, N95 मास्क, सॅनिटायजर, डॉक्टरांसाठी आवश्यक उपकरणे इत्यादी गोष्टी उपलब्ध करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश होता.

पालकमंत्र्यांनी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयाचा आढावा घेतला. इचलकरंजीतल्या रुग्णालयास भेट देवून माहिती घेण्यात आली त्याच बरोबरीने हातकणंगले इथे आयसोलेशन वार्ड करण्यासाठी कार्यक्रम सुरु करण्यात आले. गव्हर्मेंट प्रॉपर्टी असणाऱ्या जागा ताब्यात घेवून शेंडा पार्क व सर्किटहाऊस जवळ आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आले.

याच दरम्यान जनता कर्फ्यू डिक्लेर करण्यात आला.

या काळात पालकमंत्र्यांनी नियोजनाचा कोल्हापूर पॅटर्न सेट होवू लागला होता. कोणत्याही एका अधिकाऱ्याकडे जबाबदारी न देता प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून देण्यात आली होती.

येणाऱ्या जनता कर्फ्यूमुळे भयभीत होवून पुण्या-मुंबईसह बाहेरील ठिकाणचे लोक आपल्या मुळगावी परतू लागले. त्यांच्यासोबतच गेल्या महिन्याभरात बाहेरील देशातून आलेले लोक यांचा माग काढणं हे प्रशासनासमोरच सर्वात मोठं आव्हान होतं.

कारण बाहेरून आलेल्या लोकांची संख्या तब्बल ७५ हजार इतकी होती. 

इतक्या मोठ्या प्रमाणात असणारे त्यातही संपुर्ण जिल्ह्यात विखरूलेल्या लोकांसाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. WHO सारख्या संघटनेत काम करणारे पण कोल्हापूरच्या मातीत जन्म झालेले व्यक्तींची मदत पालकमंत्र्यांनी घेतली.

यासाठी चॅटबॉट तयार करण्यात आले.

WHO व आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार एक फॉर्म तयार करण्यात आला व हा फार्म आपण भरावा असे आवाहन बाहेरून आलेल्या नागरिकांना करण्यात आले.

या http://www.kolhapurcollector.com/covid19/

वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपण आपली माहिती भरू शकता. चॅटबॉक्समध्ये तुम्हाला सहा प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्याचे वर्गीकरण हाय, मिडीयम व लो कॅटेगरित करण्यात येतं.  

संशयास्पद वाटल्यानंतर जिल्हा प्रशासन तातडीने स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना सुचना करेल व आरोग्य अधिकारी सदर व्यक्तिने फॉर्म भरल्यानंतर दोन तासांमध्ये संबधित व्यक्तिची तपासणी करुन योग्य त्या सुचना करेल. आवश्यक वाटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करेल अशी रचना करण्यात आली.

यामुळे आजतागायत ७५ हजारांपैकी २० हजार व्यक्तींचा अचूक मार्ग काढून त्यांच्या आरोग्याच्या लक्षणाची माहिती मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे.

सोबतच ७ हजार कर्मचारी प्रत्यक्ष ग्राऊंडवर जावून बाहेरून आलेल्या लोकांची माहिती घेत आहेत. त्यांच्या आरोग्याबाबत योग्य त्या सूचना करत आहेत.

शहरातल्या प्रभाग समित्या आणि ग्रामिण भागात ग्रामसमित्यांमार्फत जबाबदार नागरिकांचे गट तयार करण्यात आले. कोरोनासंबधित कोणत्याही अफवा पसरवू न देणं व योग्य शासकिय माहिती लोकांपर्यन्त घेवून जाण्याची जबाबदारी अशा समित्यांकडे देण्यात आली.

लॉकडाऊनमुळे लोक पॅनिक होण्याची शक्यता नाकारता येणारी नव्हती. जीवनावश्यक गोष्टींची चढ्या भावाने विक्री आणि जीवनावश्यक गोष्टी विकत घेण्यासाठी लोकांची होणारी गर्दी ओळखून कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या सहकार्याने कोल्हापूरता ३१ नव्या भाजी मंडई सुरू करण्यात आल्या.

दोन भाजी विक्रेत्यांमध्ये किमान वीस फुटांचे अंतर व खरेदी करणाऱ्यांमध्ये किमान ३ फुटांचे अंतर ठेवण्याचा नियम आखण्यात आला.

लोकांच्या समस्या अडचणी वाढू नयेत म्हणून पाच wtsapp नंबर जाहीर करण्यात आले. या नंबरवर जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती आपल्या सुचना, अडचणी पाठवू शकतो अशी जाहिरात करण्यात आली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे नंबर व्हायरल करण्यात आले.

आज या नंबरवर कोल्हापूर जिल्ह्यातून लोकांच्या अडचणी व सूचना येत असतात. अडचणीच्या काळात प्रशासन कुठे आहे हा प्रश्न लोकांना न पडता, प्रशासन चौवीस तास सोबत असल्याची गॅरेंटी या गोष्टीमुळे मिळाली.

चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे लोक, अफवा पसरवणाऱ्या व्यक्ती याचसोबत बेघर लोक ज्यांना जेवण मिळत नाही अशा व्यक्तींची माहिती या नंबरमुळे प्रशासनाला तात्काळ मिळू लागली.

त्यानंतरची महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे,

तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत संपर्क ठेवून एक कामांची सिस्टिम उभा करणं. यासाठी पालकमंत्र्यांनी संबधित तालुक्यातले प्रांताधिकारी, तहसिलदार व आरोग्य अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलण्यास सुरवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू करण्यात आल्याने तालुकापातळीवर नियोजन घडण्यास मदत मिळाली.

प्रभाग समित्या व कोल्हापूर शहरातल्या नगरसेवकांसोबत आयुक्तांची सांगड घालून देण्यात आली व त्यामुळे पक्षीय भेद न करता सर्वांना खुलेपणाने आपल्या अडचणी, मागण्या आयुक्तासमोर मांडता येतील याची तरतूद करण्यात आली. १० टॅक्टर व ६ फायर फायटर यांना घेवून संपुर्ण कोल्हापूरात औषध फवारणी करुन निर्जंतूकीकरण करण्याची मोहिम हाती घेण्यात आली.

खूप वर्षांपूर्वी छ. शाहू महाराजांनी कोल्हापूराच्या सीमेवर प्लेग रोखला होता. आजही कोल्हापूरात अभिमानाने प्लेगमध्ये शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा दाखला दिला जातो. कोल्हापूरचे पालकमंत्री ही जबाबदारी म्हणून बंटी पाटलांनी देखील हाच विचार कृतीतून सिद्ध केला. 

गेल्या कित्येक दिवसांपासून तहानभूक हरवून हा माणूस जिल्हाधिकाऱ्यालयात ठाम मांडून आहे. “साथीच्या रोगात लढण्याचा कोल्हापूरी पॅटर्न” इतिहासात अजरामर आहे. तोच पॅटर्न घेवून कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच एक सुरक्षिततेच वातावरण प्रत्येक घरात निर्माण होण्यास मदत मिळत आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.