आंध्रप्रदेशात काँग्रेसने जी चूक केली होती तीच चूक भाजप गोव्यात करतंय का ?

गोव्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांनाच दरम्यान गोव्यातून विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी ही घोषणा केली. उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासमोर बाबूश मोन्सेरात यांचं आव्हान असणार आहे….

उत्पल पर्रिकर इतका मोठा निर्णय घेण्यामागे काय कारण असेल तर तेच विस्ताराने जाणून घ्या…

दिवंगत मनोहर पर्रीकर…हे नाव देशाच्या राजकारणात आजही आदरानं घेतलं जातं…आपल्या राजकीय आयुष्यात त्यांनी जवळपास २५ वर्ष पणजी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. गोव्याची राजधानी असल्यानं पणजीला अर्थातच प्रचंड महत्त्व आहे. २०१९ मध्ये त्यांचं निधन झालं अन पणजीमध्ये पोटनिवडणुका झाल्या होत्या. अन भाजपला पराभव स्विकारावा लागला होता. काँग्रेसच्या अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांनी जिंकून आधी भाजपाला धक्का दिला अन मग काँग्रेस ला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला..

पिक्चर इथेच संपला नाही तर त्याचा सिक्वेल सुरु झाला म्हणायला लागेल कारण तुम्हाला तर माहितीच आहे कि गोव्यात सद्या उत्पल पर्रीकर यांच्या नावाची मोठी चर्चा आहे…का आहे तेही याची देखील तुम्हाला कल्पना असेलच तरी सांगते .. मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर उत्पल पर्रीकर यांनी राजकारणात एंट्री मारली आणि आपल्या वडिलांच्या पणजी या जागेवर दावा केला पण त्यांना तेंव्हाच्या पोटनिवडणुकीत भाजपने तिकीट दिलं नाही…मग काय आटा नाही तर नेक्स्ट टाइम म्हणून त्यांनी आशा सोडली नाही तर आगामी निवडणुकांसाठी म्हणजेच आटा येत्या विधानसभा निवडणुकीत तरी तिकीट मिळेल या अपेक्षेने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली होती तो परत त्यांना भाजप ने धक्का दिला कि त्यांना पणजी मधून तिकीट दिलं जाणार नाही हे स्पष्ट केलं.

मध्यंतरी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उत्पल यांनी तिकीटाचा आग्रह केला होता. मात्र फडणवीस काय उत्पल पर्रीकर यांच्या तिकिटाबाबत सिरीयस नव्हतेच अन आत्ताही नाहीत..

आपण मनोहर पर्रीकरांचा वारसा चालवण्यासाठी उत्सुक आहोत आणि अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात आहोत, असंही उत्पल पर्रीकर यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आमदारांमुळं पक्षाला स्थैर्य मिळालं होतं, त्यांना डावलून चालणार नाही, असं वक्तव्य करत अप्रत्यक्षरित्या मोन्सेरात यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलाय. सोबतच फक्त राजकीय वारसा आहे म्हणून तिकीट मिळणार नाही, असंही फडणवीस म्हणाले होते.

आता निवडणूक काही आठवड्यांवर आलेली असतानाही उत्पल यांच्या उमेदवारीबाबत काहीच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

त्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी असं सूचक वक्तव्य केलेलं कि,मला आता कठोर निर्णय घेण्यास भाग पाडलं जाऊ शकतं… थोडक्यात त्यांनी याआधीच आपली वेगळी चूल मांडण्याचा इशारा दिला होता.

उत्पल पर्रिकर भाजपकडून लढणार की अपक्ष लढणार हा आता राष्ट्रीय चर्चेचा विषय होऊन बसलेला आहे. पणजीतून लढण्यावर ठाम असलेल्या उत्पल याना भाजपने मग पणजी सोडून इतर दोन जागांचे पर्याय दिलेत. पण यांनी भाजपच्या दोन जागांच्या ऑफर धुडकावून लावल्या आहेत. भाजपनं ऑफर केलेले दोन्ही मतदारसंघ हे खरंतर काँग्रेसचे गड मानले जातात. या मतदारसंघातून उत्पल यांना निवडून येण्याची शक्यता फारशी नाही.  त्यातल्या दोन्ही जागा म्हणजे, सांताक्रूझ हा गोव्याच्या उत्तर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. या मतदार संघामध्ये सहावेळा काँग्रेसची सत्ता होती. दक्षिण गोव्यातील मडगाव मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता आहे.

 आता निवडणुका म्हणल्या की, पक्षांतरं अन पक्ष बदलण्याच्या ऑफरही आल्यात. म्हणजेच उत्पल पर्रीकर यांना देखील शिवसेनेची खुली ऑफर आलेली, ही ऑफर दिलीये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकर यांना. 

त्यामुळे उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार की दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार याची गोव्यात चर्चा सुरू आहे.  भाजपसोबतच काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, आप आणि आता शिवसेना असे पर्याय उत्पल यांच्यासमोर आहेत. ते यातला एक पर्याय निवडणार की स्वतःचा झेंडा स्वतःच्याच खांद्यावर वाहत एकला चलोचा नारा देणार? हे आता काही दिवसांत स्पष्ट होईल.

पण भाजपला हे महागात पडणार हे मात्र नक्की…कारण अशीच एक चूक काँग्रेस ने देखील आंध्रप्रदेश मध्ये केली होती ज्याची शिक्षा काँग्रेस अजूनही भोगतंय…

कोणती चूक ???

२००९ मध्ये वाय एस आर रेड्डी म्हणजे कॉंग्रेसचे आंध्रप्रदेश मधील लोकनेते होते….पण दुर्दैवाने २००९ साली वायएस आर रेड्डी यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यावे हा प्रश्न सोनिया गांधी यांच्या दरबारात मांडला गेला. वायएसआर यांचे खासदार चिरंजीव जगनमोहन रेड्डी यांनी आपला दावा सांगितला. पण सोनियाजींच्या सल्लागारांनी त्यांना सल्ला दिला की जगनमोहन अजून अननुभवी आहेत त्यांना इतक्या लवकर मुख्यमंत्रीपद देणे म्हणजे पक्षावर होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपावर शिक्कामोर्तब करणे . त्यामुळे के.रोसय्या यांना खुर्चीवर बसवण्यात आले. जगनमोहन रेड्डी यांनी ही गोष्ट पर्सनली घेतली. लाखो कार्यकर्त्यांसह पक्ष सोडला. वायएसआर कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली.

ही आंध्रप्रदेश मध्ये कॉंग्रेसने केलेली आत्महत्या होती.

जगनमोहन रेड्डी यांच्यावर सुडाचे राजकारण करण्यात आले. त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आले. पण जगनमोहन रेड्डीनी पक्ष सोडल्यामुळे झालेल्या नुकसानातून कॉंग्रेस बाहेर पडू शकली नाही.  आंध्रच्या राजकारणामधून कॉंग्रेस हळूहळू बाहेर फेकली जात होती. याच दबावातून त्यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या चंद्रशेखर राव यांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आंध्रप्रदेशचे विभाजन केले. पण या खेळीतही कॉंग्रेस फसली. हातातून तेलंगणाही गेले आणि आंध्रप्रदेशही गेले. चंद्रशेखर राव यांनी वचन दिल्याप्रमाणे आपला पक्षा कॉंग्रेसमध्ये विलीन केला नाही.

२०१९ च्या लोकसभा आणि आंध्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले अन पूर्ण देशभर मोदींची लाट असतांना आंध्रप्रदेशमध्ये जगनमोहन यांचा विजय झाला. भाजपा, कॉंग्रेस, तेलगु देसम पार्टी या सगळ्यांशी एकत्र लढूनही हा नेता विजयी ठरला होता. जगनमोहन मुख्यमंत्री पदी बसले आणि याचं सर्वात मोठं दुःख कुणाला झालं असेल तर तो होता काँग्रेस पक्ष.  त्यांना केंद्रात नेहमी सत्तेत आणणाऱ्या आंध्रमध्ये औषधाला ही पक्ष उरलेला नाही. फक्त आंध्रचं नाही पूर्ण देशभर कॉंग्रेसकडे वायएसआर यांच्या सारख्या जनतेची नस पकडणाऱ्या नेत्याची कमी आहे. ती जागा जगनमोहन रेड्डी यांनी घेतली असती. पण काँग्रेसच्या त्या एका चुकीमुळे त्यांनी हा नेता गमावला

त्यामुळे जे आंध्रप्रदेशमध्ये घडलं तेच गोव्यात घडू नये इतकं जरी भाजपला कळलं तरी त्यांचंच भलं आहे…

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.