गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आमदारांना बियर पाजून हरवलेलं.

आजकाल निवडणुका, राजकारण,समाजकारण यातून थोडासा विरंगुळा पाहिजे हे प्रत्येक राजकारण्याच मत आहे. तीसचाळीस वर्षापूर्वी राजकारणात एवढी धाकाधक होती का माहित नाही पण तेव्हाच्या पुढाऱ्यांच पण विरंगुळा पाहिजे असच मत होतं.

पण तेव्हाच राजकारण एवढ एकमेकांच्या उरावर बसण्याएवढ खालच्या थराला गेल नव्हतं. वेगवेगळ्या पक्षाचे नेते विचारसरणी वेगळी होती पण वैयक्तिक आयुष्यात दोस्त होते. फावल्या वेळेत आपल्या सारखं एखादा क्रिकेटच डाव टाकत होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना क्रिकेटची खूप आवड होती. त्यांनी मुख्यमंत्री क्रिकेट टीम बनवली होती. वर्षातून तीन-चार सामने व्हायचे. मंत्री-आमदार यांची मॅच हि अल्पबचत विभागाच्या वतीने व्हायची. या सामन्यांना गर्दीही खूप व्हायची. विधानसभेचं अधिवेशन झालं कि आमदार विरुद्ध पत्रकार सामनादेखील व्हायचा.

असाच एकदा गोवा मुख्यमंत्री संघ आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री संघ यांच्यात क्रिकेटमॅच आयोजित करण्यात आली, तीही गोव्यात.

गोव्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर  हे लहानपणापासून क्रिकेट खेळलेले होते. त्यांनी या प्रदर्शनीय सामन्यासाठी मुंबईमधून सिनेकलाकार आणि  क्रिकेटमधील फेमस खेळाडूना देखील बोलावलं होतं. दिलीप कुमार, मांजरेकर, जॉनी वॉकर यांच्या सारखे मोठेमोठे सेलिब्रेटी येत असल्यामुळे गोव्यात पब्लिकलाही सामन्याची खूप उत्सुकता होती.बराच गाजावाजा झाला होता.

मॅचच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राचे आमदार बसने गोव्याला पोहचले. बाकीचे काही खेळाडू मागाहून विमानाने येणार होते.

बांदोडकरांनी आमदारांची राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती. कोल्हापूरचे आमदार उदयसिंह गायकवाड यांची बांदोडकरांशी चांगली मैत्री होती. पूर्वी अनेकदा दोघे शिकारीसाठी एकत्र जायचे. एकमेकांच्या घरी जाणेयेणे देखील होते.
संध्याकाळी दोघे उद्याच्या मॅचबद्दल गप्पा मारत बसले होते. तेव्हा बांदोडकर म्हणाले,

“उदयसिंगराव, आमच्या गोव्यात क्रिकेट खेळाडू कमी आहेत. तेव्हा आपण तुमचे खेळाडू दोन्ही टीममध्ये वाटून घेऊ. म्हणजे मॅचला रंगत येईल.”

उदयसिंगरावांच्या लक्षात आले कि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला हरवायचं चांगलच सिरीयस घेतल आहे. ते म्हणाले,

“अहो, मी महाराष्ट्राकडून खेळणार आहे आणि तुम्ही म्हणता मॅच गोव्यानं जिंकली पाहिजे. ते कस शक्य आहे.”

रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री डिनर टेबलवर भेटले. बांदोडकरांची काही खेळाडू द्या ही मागणी वसंतराव नाईकांनी मान्य केली. आमदारांपैकी गायकवाड, शिवराम भोसले यांनी, क्रिकेटर्स पैकी पोली उम्रीगर, रमाकांत नाडकर्णी यांनी आणि फिल्मस्टार पैकी दिलीप कुमार यांनी गोव्याच्या टीम कडून खेळायचं अस ठरलं.

मग रात्री बांदोडकर परत उदयसिंग गायकवाडांना भेटायला आले,

“आता तुम्ही माझ्या टीममध्ये आहात. आता आपण कस जिंकायचं ते सांगा.”

रमाकांत देसाई भारताचा सर्वात फास्ट बॉलर होता. त्याचा सामना करण्यासाठी आधी गोव्याने खेळायचं आणि भर उन्हात महाराष्ट्राला खेळवायचं अस ठरल.

पण त्यासाठी टॉस जिंकणे हे सुद्धा महत्वाच होतं. बाकीची सेटिंग बांदोडकरांनी लावली.

दुसऱ्या दिवशी सकाळी खेळाडूना चहा सोबतच गोव्याच्या खास बियरची सोय केली होती. महाराष्ट्राच्या आमदार खेळाडूंना आग्रह करून करून ते पाजलं. इकडे गोव्याच्या खेळाडूना मात्र तिकडे फिरकायचं नाही हे निक्षून सांगितलं होतं.

“आपल्यापैकी कोणीही बियर घ्यायची नाही. खेळ संपला की मग तुम्ही क्रेटच्या क्रेट फस्त करा हवं तर.”

गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्याजवळ ग्राउंड उभ केल होत. प्रचंड गर्दी झाली होती. दिलीप कुमारची एन्ट्री झाल्यावर जोरदार दंगा झाला. 

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी टॉस जिंकला. पहिली बटिंग स्वीकारली. गायकवाड आणि बांदोडकर ओपनिंगला आले. गोव्याच्या मुख्यमंत्रीनी हाफ सेंच्युरी ठोकली. उम्रीगर यांनी देखील सिक्सरची फटकेबाजी करून पन्नास धावा केल्या. लंचनंतर महाराष्ट्राची इनिंग होती. उन्हातान्हात बियरचा इफेक्ट दिसू लागला. हळूहळू आपले खेळाडू ढेपाळत गेले. जॉनी वॉकरनी मैदानातच नक्कल करून प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं.

पण अखेर महाराष्ट्राने ती मॅच गमावली. बक्षीस समारंभात गोवा सरकारतर्फे सगळ्या खेळाडूंना पितळी मोठ्या समया भेट दिल्या. महाराष्ट्राचे खेळाडू, कलाकार, आमदार एकूणच सगळ्या आदरातिथ्यामुळे भारावून गेले होते. वसंतराव नाईकांनी बेस्ट खेळाडूचा पुरस्कार बांदोडकराना दिला. 

मॅचच्या तिकीटामधून गोळा झालेला एकूण निधी संरक्षण खात्याला देण्यात आला. मात्र हसत खेळत गमतीमध्ये झालेला हा सामना गोव्याने मुख्यमंत्र्यांच्या फिक्सिंगमुळे जिंकला. आमदार गायकवाड म्हणतात.

“तो सामना कसा जिंकला हे फक्त आम्हा दोघांना ठाऊक आहे. पण गोव्याकडून खेळलो असल्यामुळे विजय आमचाच झाला होता.”

हे हि वाच भिडू.