गोव्यात एका वादामुळे नौदलाला तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम रद्द करावा लागलाय…

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सवी वर्षाचा उत्साह सध्या देशभरात ओसंडून वाहत आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ‘आजादी के अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत झेंडावंदनच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालीय. मात्र अशातच सध्या गोव्यातून झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचा एक वाद समोर येतोय. ज्या वादामुळे भारतीय नौदलाला तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रमचं रद्द करावा लागला आहे.

मात्र असा काय आहे वाद? 

गोव्यात एक बेट आहे, ज्याचं नाव आहे साओ जॅसिंटो. या बेटावर देखील गोव्याप्रमाणेच बहुतांशी नागरिक हे ख्रिश्चन धर्मीय आहेत. इथं पोलंडच्या सेंट हयासिंथ (साओ जॅसिंटो) आणि सेंट डोमिनिक (साओ डोमिंगो) असे समर्पित असणारे चर्च आहेत.

मात्र सध्या याच बेटावरील नागरिकांनी इथं बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे. सोबतच पर्यटकांना देखील आपली दार बंद केली आहेत.

याच ‘आजादी के अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत साओ जॅसिंटो बेटावर नौदलाकडून तिरंगा फडकवला जाणार होता. मात्र बेटावरील रहिवाशांनी नौदलाला तेथे ध्वजारोहण करण्यात आणि स्वातंत्र्योत्सव साजरा करण्यास आक्षेप घेतला आणि विरोध देखील केला. यानंतर, गोवा नौदल क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तेथे कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पण हा विरोध नेमका का आहे?

एका रिपोर्टनुसार, इथल्या लोकांच्या विरोधच मूळ कारण आहे ते म्हणजे सरकारचा एक निर्णय. या लोकांचं म्हणणं आहे कि, ते केंद्र आणि राज्य सरकारच आमच्या विरोधातील कोणतही धोरण इथं लागू होऊ देणार नाहीत. इथल्या रहिवाश्यांचा विरोध आहे तो गोव्यामधील किनारपट्टी व्यवस्थापन योजना आणि संसदेकडून संमत करण्यात आलेल्या बंदर प्राधिकरण विधेयक – २०२० याला. 

या बेटावर राहणाऱ्या डॅरेल डिसुझा यांनी दावा केला आहे की,

इथले रहिवासी आणि पारंपारिक मच्छीमार हे बेटाच्या हितसंबंधांच्या विरोधात जाणाऱ्या राजकीय हालचालींबद्दल खूप चिंतित आहेत. डिसूझा म्हणाले की, आधी बेटांना सरकारी अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेतले जाईल आणि पुढे बंदर हद्दीत आणल्यानंतर ते विकासासाठी खाजगी पक्षांच्या ताब्यात दिले जातील अशी भीती सध्या आमच्या मनात आहे. 

एका स्वयंसेवी संस्थेतून राजकीय पक्ष म्हणून आकार घेतलेल्या ‘गोएंचो आवाजचे’ कॅप्टन विराटो फर्नांडिस यांनीही बेटीवरील रहिवाश्यांच्या भूमिकेची पाठराखण केली आहे. ते म्हणाले कि,

या लोकांकडे बेटावरील नौदल सदस्यांच्या उपस्थितीला विरोध करण्याची मजबूत कारणे आहेत. लोकांचा असा दावा आहे की ‘कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन (सीझेडएमपी) आणि बंदर प्राधिकरण विधेयक – २०२० संमत झाल्यानंतर बेटाच्या रहिवाशांमध्ये एक प्रकारे अविश्वास पसरला आहे. सध्या या बेटाला मोरुगाओ पोर्ट ट्रस्टच्या अधिकारक्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.

फर्नांडीस म्हणाले, अलीकडेच या सगळ्या विरोधात बेटावर विरोध प्रदर्शन देखील झाल होतं. सरकारने बंदराच्या ज्या सीमा निश्चित केल्या आहेत त्या अंतर्गत बेटाचं अधिकारक्षेत्र देखील येत आहे. त्यामुळेच या बंदरांच्या सीमाचा विरोध केला होता. आम्ही सरकारला वारंवार सांगत आहोत कि, बेटावर १७३१ धार्मिक स्थळ आहेत. त्यामुळे सध्या इथले लोक सतर्क झाले आहेत

याच विरोधानंतर नौदलांकडून तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे

काल तिरंगा फडकवण्याच्या कार्यकमाचा भारतीय नौदलाचा सराव सुरू होता. तेव्हा काही लोकांनी राष्ट्रध्वज फडकवण्यावर आक्षेप घेतला, आणि विरोध सुरु केला आहे. या विरोधानंतर नौदलाकडून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याबाबत शुक्रवारी नौदलकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे.

यात ते म्हणाले,

स्वातंत्र्याला ७५ वर्षाच्या निमित्ताने ‘आजादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत झेंडावंदनाची तयारी करण्यात आली आहे. त्यावेळी गोवा नौसेना क्षेत्राच्या एक टीमने साओ जॅसिंटो बेटाचा दौरा केला, मात्र तिथल्या लोकांचा विरोध लक्षात घेऊन झेंडा फडकावण्याच्या योजनेला सध्या रद्द करण्यात येत आहे.

इथल्या लोकांच मत काय आहे?

इथल्या लोकांनी मात्र तिरंगा फडकवण्यास विरोध केला असल्याच्या बातम्यांना निराधार असल्याचं सांगितले आहे. इतकंच नाही तर ते स्वतः झेंडा फडकवणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

याबाबत बोलताना डॅरेल डिसुझा म्हणाले कि,

या बेटावर जवळपास २०० कुटुंब आहेत जे दरवर्षी इथं राष्ट्रीय ध्वज फडकवतात. त्यामुळे आम्ही झेंडा फडकावण्याच्या विरोधात अजिबात नाही. प्रत्यक्षात आम्ही नौसेनेच्या अधिकाऱ्यांना देखील हीच गोष्ट सांगितली जे इथं १५ ऑगस्टची तयारी करण्यासाठी आले होते.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी नौदलाला हिरवा कंदील दाखवला आहे.  

साओ जैसिंटो बेटावरील विरोधानंतर आज सकाळी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटरवर आपली नारीजी व्यक्त केली आहे.

 

यात ते म्हणाले,

“हे दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे की सेंट जॅकिंटो बेटावरील काही व्यक्तींनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय नौदलाकडून राष्ट्रध्वज फडकवण्यावर आक्षेप घेतला आहे. मी याचा निषेध करतो आणि रेकॉर्डवर सांगू इच्छितो की माझे सरकार असे कृत्य सहन करणार नाही.

आमच्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम स्थानावर असेल. त्यामुळे भारतीय नौदलाला त्यांच्या मूळ योजनेसह पुढे जाण्याची विनंती केली होती आणि गोवा पोलिसांकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले होते,” असे देखील मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

एकूणच सध्या या वादावर अजूनही काही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता यात रहिवाश्यांच्या विरोधानंतर देखील नौदल झेंडावंदन करणार का? कि स्थानिकांचा विरोध कायम राहणार हे बघावं लागणार आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.