पक्षांतर करणार नाही अशा शपथा घालून तरी गोव्यातली काँग्रेस टिकणार काय ?

सत्ताकारणाच्या निवडणुकीत तर्काला फारसं स्थान असत नाही आणि गोव्यासारख्या छोट्याशा राज्यात, तर विचारायची सोयच नाही. गोव्याने राजकीय अवकाशात माकडांना लाजवणार्‍या कोलांटउड्या तीस वर्षांहून जास्त काळ अनुभवल्या आहेत. त्यामुळे आयाराम-गयाराम राजकीय संस्कृतीसाठी गोवा भलताच प्रसिद्ध आहे.

२०१७ च्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या ४० पैकी तब्बल २७ आमदारांनी पक्षांतर केले. ही आकडेवारी १३ जानेवारी २०२२ पर्यंतची आहे. हा एक विक्रमच. त्यामध्ये आणखी भर पडू नये, निकालानंतरही उड्यांची गती वाढू नये, म्हणून काँग्रेसने आपल्या उमेदवारांना शपथा दिल्या आहेत. 

कारण काय तर, या भाजपशासित राज्यात गेल्या पाच वर्षांत पक्षांतराचा सर्वाधिक फटका बसलाय काँग्रेसला. त्यामुळे काँग्रेसने आपल्या उमेदवारांना निवडून आल्यास पक्षांतर करणार नाही अशी शपथ  ईश्वरापुढे घ्यायला लावली आहे.

काँग्रेसने शनिवारी आपल्या सर्व ३४ उमेदवारांना शनिवारी एका विशेष बसने पणजीतील मंदिर, बांबोलिम येथील एक चर्च आणि पणजीनजीकच्या बेतिम खेडय़ातील एका दर्ग्यात नेल आणि त्यांना ‘पक्षांतरविरोधी शपथ’ घ्यायला लावली.

ही शपथ घ्यायला लावणारे आसामी काँग्रेसचे गोव्यासाठीचे प्रभारी असलेले ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम आहेत. ते या धार्मिक स्थळी उमेदवारांसोबत होते.

पण तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो यापूर्वी पण अशाच शपथा काही उमेदवारांनी घेतल्या, पण घेतल्या शपथीला हे नेते काही जागले नाहीत.

तर गेल्या वर्षी ३१ जानेवारीला गोवा फॉर्वर्ड पार्टीने (जीएफपी) त्यांचे तिन्ही आमदार व पदाधिकारी यांना मापुसा येथील देव बोडगेश्वर मंदिरात नेऊन, आपण २०२२ सालच्या निवडणुकांत भाजपला पाठिंबा देणार नाही अशी शपथ घ्यायला लावली होती. मात्र अशी शपथ घेऊनही जयेश साळगावकर या आमदाराने नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते सालिगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत.

आता आमदार फुटीची गोष्ट सांगायची झाली तर,

मागच्या निवडणुकीपासून काँग्रेसचे बहुतांश आमदार पक्ष सोडून गेले आहेत. २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत ४० सदस्यांच्या सभागृहात १७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसकडे आता फक्त दोन आमदार आहेत. 

२०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये एकाच वेळी घाऊकरीत्या १० आमदारांनी रातोरात भाजपमध्ये उड्या मारल्या. यामुळे भाजपचे सभागृहातील संख्याबळ २७ होते.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७, भाजपचे १३, मगोपचे ३, गोवा फॉरवर्डचे ३, अपक्ष ३ व राष्ट्रवादी काँग्रेस १ असे आमदार निवडून आले. गोवा फॉरवर्ड व मगोपच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार आले आणि मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले. सुरुवातीला विश्वजित राणे, त्यानंतर दयानंद सोपटे, सुभाष शिरोडकर या तीन आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या उमेदवारीवर पोटनिवडणुका लढवून विजय मिळवला. त्यानंतर १० आमदारांनी पक्षांतर केले.

पुढे गोवन भाजप सरकारला अडीच वर्षे झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गंभीर आजाराने निधन झाले आणि डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मगोपच्या तीनपैकी बाबू आजगावकर आणि दीपक प्रभू पाऊसकर या दोन आमदारांनी नियमाचा आधार घेत भाजपात प्रवेश केला. लगेच काँग्रेसच्या उर्वरित १५ पैकी १० आमदारांनी काँग्रेसमध्ये एक तृतियांश फूट पाडून भाजपात प्रवेश केला.

आता पक्षांतराचा पराक्रम करणार्‍यांमध्ये बाबू आजगावकर, दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव, बाबूश मोन्सेरात यांचा नंबर जास्त वेळा लागलेला आहे. ही मंडळी कधीही, कोणत्याही पक्षाच्या लेबलखाली राजकीय नृत्य करू शकतात असं गोव्यातले राजकिय विश्लेषक नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात.

त्यामुळे असा इतिहास लाभलेल्या गोव्यात या शपथीचा काही उपयोग होईल असं काही वाटत नाही. तरी बघुयात निकालानंतर अजून काय घडतं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.