गोव्यात दारू स्वस्त आहे. आमंत्रण देत नाही, का स्वस्त आहे ते सांगतोय वाचा.

महाराष्ट्राच्या काही भागात थंडी पडलीये, तर काही ठिकाणी उकाड्यानं अंर्तवस्त्रांना घाम फुटू लागलाय. या सगळ्यावरचा एकच उपाय दिसतोय तो म्हणजे दारू.. म्हणजे अवकाळी पडला असला तर रम, व्हिस्कीचा मुड होवू शकतोय आणि वातावरण अजून तंग असलं तर बियर मारु शकताय.

जगात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथं प्रत्येक मोसमासाठी दारूची कॅटेगरी सेट करुन ठेवलेली आहे..

असो तर मुळ मुद्द्यावर येवूया, 

आपल्याकडं बाटली आणायची म्हणली तर खिश्याला पडलेला डबरा बघुन च्यामारी गोव्यात पायजे होतो अस सारखं वाटत राहतं. कारण एकच गोव्यातल्या दारूच्या किंमती. ओल्ड मॉन्क ची क्वॉटर ५० रुपयाला, बियर ५० ते १०० रुपयात, चांगली व्हिस्की क्वॉटर १०० ते २०० रुपयात…

देशीच्या किंमतीत सिंगल मॉल्ट पिणारी जनता गोव्याताय. आपणच कुणाचं घोडं मारलय हे कळत नाय..

असो पण कधी विचार केलाय का गोव्यात दारू का स्वस्त आहे ते…?

त्याचं झालं असं की भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले पण गोवा मात्र तेव्हा भारताचा भाग नव्हता. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते. गोवा मुक्ती संग्रामाच्या तीव्र लढ्यानंतर अखेर १९६१ साली गोवा राज्याचे भारतात विलीनीकरण झाले.

गोव्यातून पोर्तुगीज गेले खरे पण मागे सोडून गेले ते एक सुंदर शहर ज्याला आज आपण ‘ओल्ड गोवा’ म्हणून ओळखतो.

गोव्यात अनेक इतिहासकालीन इमारती, किल्ले तर होतेच पोर्तुगीजांनी त्यात भरच टाकली. पोर्तुगीजांनी सन १५१० ते १९६१ साडे चारशे वर्षाहून ही जास्त काळ गोव्यावर राज्य केले. या इतक्या प्रदीर्घ कालखंडात मुळात व्यापारासाठी आलेल्या पोर्तुगीजांनी  गोव्याला अनेक गोष्टी दिल्या. पोर्तुगीजांनी त्यांच्या देशात तयार होणारी वाईन गोव्यात विकण्यास सुरवात केली.

अनेक वर्ष मुरवलेली वाईन गोव्याच्या लोकांमध्येच काय तर तिथल्या संस्कृतीत रुजली ती कायमचीच.

पुढे मात्र पोर्तुगीज गेल्यावर या वाईनची जागा विस्की, रम, बियर सारख्या पेयांनी घेतली. गोव्यात पोर्तुगीजांनी अनेक चर्चेस, बंगले, सरकारी कार्यालये बनवली. पोर्तुगीजांचे स्वतची एक वेगळीच आर्किटेक्चरल स्टाईल होती त्यामुळे या इमारती उठून दिसायच्या. ती स्टाईल आजच्या ‘ओल्ड गोवा’ मध्ये पाहायला मिळते .

इमारतींबरोबरच पोर्तुगीजांनी गोव्याच्या खाद्य संस्कृतीतही बदल केला. अनेक युरोपियन अन्नपदार्थ त्यांनी गोव्यात आणले. एवढच नाही दिवसभराच्या दगदगीनंतर संध्याकाळी वाईनबरोबर शांत निवांत लाईफ एन्जॉय करायची सवय देखील पोर्तुगीजांनी गोव्याला लावली.

गोव्याला ३० मे १९८७ ला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला.

नवीन राज्य तयार झाले खरे पण ते इतके लहान होते की त्यात फक्त दोनच जिल्हे आहेत. आत्ता राज्य चालवण्यासाठी लागणारा पुरेसा महसूल फक्त या दोनच जिल्ह्यातून मिळणार नव्हता. तत्कालीन राज्यकर्त्यांच्या एव्हाना एक लक्षात आले होते की गोवा हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते.

तसे झाल्यास महसुलात अमुलाग्र वाढ होईल आणि राज्य चालवण्यास काहीच अडथळा येणार नाही.

त्यानुसार रणनीती आखली गेली आणि गोव्याच्या उदारमतवादी संस्कृतीचे मार्केटिंग केले गेले. गोव्याकडे पर्यटकांचा ओढा आपसूकच होता पुढे या धोरणाने तो अजूनच वाढला. याच दरम्यान दारूची मागणी अनपेक्षितरित्या वाढताना दिसली.

भारतीय पर्यटकांन बरोबरच परदेशी पर्यटकांच्या पसंतीस गोवा एव्हाना उतरले होते. दारू ची मागणी लक्षात घेत राज्य सरकारने त्यावरील अतिरिक्त कर कमी करून दारू स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून गोव्यात दारू स्वस्त झाली.

हे ऐकल्या ऐकल्या आपली वळकटी गुंडाळून गोव्याला निघालेल्या भिडूंनो थांबा थांबा. यात पण एक गंमत आहे.

गोव्यात सरकारने दारू स्वस्त केली पण बाकीच्या गोष्टींवरचा कर मात्र वाढवला.

गोव्यात फास्ट फूड वर जास्तीचा GST आहे. गोव्यात इतर मनोरंजनाच्या गोष्टी देखील महाग आहेत, त्यावर ही अधिकचा करमणूक कर आहे. शिवाय गोव्यात जर तुम्हाला खाजगी वाहन घेऊन जायचे असेल तरीही तुम्हाला कर भरावा लागतो. अशा प्रकारे सरकारने स्वतःचा महसूल शक्कल लावून वाढवला.

मग तुम्ही म्हणाल दिव दमन सारख्या केंद्रशासित प्रदेशाच काय? तिथ ही दारू स्वस्त असते.

तिथे सुद्धा पोर्तुगीज, डच अशा युरोपियन सत्तांच राज्य होत हेही कारण आहेच. पण या शिवाय केंद्र शासित असल्याने तिथे राज्यांचा कोणताच कर लागत नाही फक्त केंद्राचा कर लागतो. त्यामुळे तिथही दारू स्वस्त मिळते..

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.