मान्सूनच्या स्वागतासाठी गोवेकरांचा भन्नाट सण “सांजाव”.
गोवेकरांना नेहमीच सुशेगाद गोयंकार म्हणजेच निवांत गोवेकर म्हणून ओळखले जाते, पण सुशेगाद समजले जाणारे हे लोक मात्र कोणताही सण साजरा करताना जगात भारी होईल अशा पध्तीनेच साजरा करतात. गोव्याची ओळख केवळ सन, सॅंड, सी आणि स्वस्त मिळणारी दारू अशी असल्याचे समजणाऱ्यांना गोवा कधी समजलाच नाही, असेच म्हणावे लागेल. हेच सुशेगाद गोयंकार मान्सूनचे आणि पावसाळ्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या इतर सणाचे आगमन सांजाव हा वैशिष्ट्यपूर्ण सण तेवढ्याच भन्नाटपणे साजरा करून करतात. सांजावची माहिती देणारा बोलभिडूचा हा स्पेशल रिपोर्ट….
मान्सूनच्या स्वागतासाठी गोवेकरांचा भन्नाट सण…सांजाव.
व्हिवा सांजाव किंवा सांजाव आयलो रे अशा उत्साहपूर्ण आरोळ्या 24 जूनला गोव्याच्या कानाकोपऱ्यात घुमतात. या दिवशी गोवेकर डोक्यावर फुलांचा मुकुट, वेलींचे वेटोळे व अंगावर रंगीबेरंगी कपडे असा पेहराव करून विहिरीत उड्या मारतात आणि याला सोबत मिळते ती हाता पायांना आपोआप थिरकायला लावणाऱ्या पारंपरिक घुमट वाद्याची अथवा ब्रास बॅंडच्या तालाची….
सांजाव गोयकारांचा लाडका पावसाळी सण.
आकाशातून कोसळणाऱ्या धो धो पावसाच्या सोबतीला वाइन, बियर किंवा फेणीचा दमदार घोट…एकूणच माहौल क्या बात है! अशा स्वरूपाचा करतो.
ख्रिश्चन धर्मशास्त्रानुसार संत जॉन बाप्तीस्त गर्भात असताना त्याची आई एलिझाबेथ मदर मेरीला भेटायला गेली होती. यावेळी मेरीने एलीझबेथला जीजसच्या जन्माची बातमी ऐकवली हे ऐकून आनंदित झालेल्या जॉन बाप्तीस्त यांनी आईच्या पोटातच उडी मारली. या सणामध्ये विहिरीला एलिझाबेथच्या गर्भाशयाचे प्रतीक समजले जाते व त्यात उडी मारणे म्हणजे ख्रिस्तजन्माचा आनंद साजरा करण्यासारखे असल्याची भावना ख्रिस्ती बांधव बाळगतात.
कधीकाळी केवळ खेड्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाला आता आधुनिक स्वरूप आले आहे. पारंपरिक वाद्यांसह डीजे,आणि डिस्कोप्रणित संगीताच्या तालावर लहानांपासून वयोवृद्धही थिरकतात. याच दिवशी नदी नाल्यांवर असणाऱ्या होड्यांना सजविण्याची स्पर्धाही घेतली जाते. विहिरी आणि तळ्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या भेटवस्तू काढण्यासाठी चुरशीने पाण्यात डुबक्या मारल्या जातात. हा सण एन्जॉय करण्यासाठी गोवेकरांना कोणाच्याही ओळखीची गरज लागत नाही. समोर येणाऱ्या व्यक्तीच्या हातात हात घालून, वेगवेगळ्या प्रकारचे बैठे खेळ खेळत व्हीवा सांजाव म्हणत अस्सल कोंकणी गाण्यांच्या ठेक्यावर गोवेकर बेभानपणे थिरकताना दिसतो.
ज्या घरात नववधू असते किंवा बाळ जन्मलेले असते, त्या घरात या दिवशी हौसेने आंबा,अननस आणि फणसापासुन तयार करण्यात आलेली वाइन दिली जाते. याचदिवशी फणसाचो महोत्सव नावाचा सणही साजरा केला जातो. फणसापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खायला मिळावेत म्हणून पूर्वी हा सण केवळ सुकूर या गावात साजरा होई पण आता तो राज्यभरात साजरा होतो.
कधीकाळी फक्त ख्रिस्ती बांधवांचा समजला जाणारा हा सण गोयंकारांसह देशविदेशांतील पर्यटकांनाही आकर्षित करीत आहे. गावोगावी विवा सांजाव अशा गजरात घुमणाऱ्या या सणाला आता मोठेमोठे हॉटेल्स आणि इव्हेंट कंपन्याही आयोजित करतात. पण तुम्हाला जर खास, अस्सल आणि गोवेकरपणाचा बाज असणाऱ्या सांजावची मजा लुटायची असेल तर राजधानी पणजीसह शिवोली, कांदोळी, बाणवली या गावांमधील सांजाव आयोजनात सहभागी व्हा. गोवेकरांचे काळीज मोठे असल्याने खेड्यात साजऱ्या होणाऱ्या सांजावचा आनंद आजही फ्रीच आहे.