ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणाऱ्या दामोदर मावझोंना साहित्याची गोडी एनसीसीमध्ये लागली

साहित्यिक म्हणलं की, तरल भावना, गोष्टी वेल्हाळपणा, वेगवेगळ्या पात्रांच्या वेगवेगळ्या गोष्टी, वह्या-पुस्तकांचा गठ्ठा आणि वाफाळती कॉफी असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. आता अर्थात सगळेच साहित्यिक असे नसतात, कुणी वह्यांच्या मागच्या पानावर लिहितं, तर कुणी अंधाऱ्या खोलीत.

दुसऱ्या बाजूला एनसीसी म्हणलं की, कडक शिस्त. पहाटे ठरलेल्या वेळेला उठायचं, आपलं प्रतिबिंब दिसेल इतके चकाचक पॉलिश केलेले शूज. खडतर ट्रेनिंग, कसरत, कटाक्षानं पाळावे लागणारे नियम हेच आठवतं. बरं या शिस्तीला आणि नियमांना अपवादही नसायचा. या कडक वातावरणात कुणाची नाळ साहित्याशी जुळेल, असं अपवादानीच होतं.

काही अपवाद मात्र फार सुंदर असतात, एनसीसीच्या शिस्तीत साहित्याची गोडी लागलेले लेखक म्हणजे दामोदर मावझो. गोव्याच्या दामोदर मावझोंना नुकताच प्रतिष्ठेचा ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.

कोण आहेत मावझो?

मावझो यांचा जन्म १ ऑगस्ट १९४४ रोजी गोव्यातल्या माजोर्डा येथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण पोर्तुगीज भाषेत झालं असलं, तरी त्यांनी मराठीचे धडेही गिरवले. त्यानंतर मावझो हे मुंबईमध्ये स्थायिक झाले. माटुंग्यामधल्या आर. ए. पोतदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून त्यांनी पदवी मिळवली.

आपल्या विद्यार्थी जीवनातच ते एनसीसीमध्ये सहभागी झाले. नेतृत्व गुणांमुळं त्यांनी आपल्या वरिष्ठांना प्रभावित केलं आणि मावझो यांची नियुक्ती बटालियनच्या कमांडरपदी झाली. या दरम्यान त्यांनी आपला साहित्य सहवास वाढवला. आपल्या लिखाणात आणि वाचनात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. इथूनच त्यांचा साहित्यिक म्हणून प्रवास सुरू झाला.

त्यांना वाचनाची गोडी लागण्यामागं आणखी एक रंजक किस्सा आहे. बालपणी आजारी असताना, त्यांना शाळा बुडवून घरी थांबावं लागलं. आता शाळेला सुट्टी असली, की कुठल्याही लहान मुलाला खेळण्याचे वेध लागतात. मात्र, आजारपणामुळं मावझो यांना घरीच थांबावं लागलं. अशावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना गोष्टीची पुस्तकं आणून दिली. ‘ती पुस्तकं वाचत असताना माझ्यात कथाकाराचं बीज रोवलं गेलं असावं,’ असं मावझो एका मुलाखतीत सांगतात.

गोव्यातली कोंकणी भाषा आणि महाराष्ट्रातली मराठी भाषा वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांच्यात फारसा फरक नाही. मुंबईत असताना मावझो यांनी एका नाटकात काम केलं, त्यांच्या भाषेचा लहेजा पाहून एकानं त्यांना सांगितलं की, ‘तुमची मराठी काहीशी वेगळी वाटते.’ तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, गोव्याची कोंकणी आणि महाराष्ट्राची मराठी वेगळी आहे.

 मावझो यांची साहित्यसंपदा

१९८१ साली प्रसिद्ध झालेल्या कार्मेलिन आणि २००९ साली प्रकाशित झालेल्या त्सुनामी सायमन या मावझो यांच्या कादंबऱ्या जबरदस्त लोकप्रिय ठरल्या. कार्मेलिनला १९८३ मध्ये प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या कादंबरीचं मराठी, पंजाबी, सिंधी, तमिळ, उडिया, मैथिली या भारतीय भाषांसोबतच इंग्लिशमध्येही भाषांतर झालं. त्सुनामी सायमनला कोंकणी साहित्य पुरस्कार मिळाला.

कोंकणी साहित्यात त्यांनी विपुल लेखन केलं. कार्मेलिन आणि त्सुनामी सायमन सोबतच, सूड आणि जीव दिवं काय च्या मारूं या त्यांच्या कादंबऱ्याही वाचकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. मावझो यांच्या कथांनाही अफाट लोकप्रियता मिळाली.

ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला द्यायचा हे ठरवणाऱ्या समितीत कुणाकुणाचा समावेश होता-

निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा राय होत्या. माधव कौशिक, सैय्यद मोहम्मद अशरफ, हरीश त्रिवेदी, सुरंजन दास, पुरुषोत्तम बिल्माले, चंद्रकांत पाटील, डॉ. एस. मणिवालन, प्रभा वर्मा, असगर वजाहत आणि मधुसुदन आनंद यांचाही समितीमध्ये समावेश होता.

गोव्याचे दुसरे मानकरी

५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे दामोदर मावझो हे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारे, दुसरे गोवेकरी आहेत. याआधी साहित्यिक रविंद्र केळकर यांना २००६ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.