गुजरातमध्ये गॉडमदरची दहशत इतकी होती की नाल्यांमधून रक्त वाहायचं…

गुजरात म्हणल्यावर सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतात महात्मा गांधी. पोरबंदर सारख्या जागेच विशेष स्थान भारतात आहे. पण याच पोरबंदर मध्ये अजून एक धडकी भरवणारी ओळख म्हणजे पोरबंदर पासून 40 किमी अंतरावर वसलेला कुतीयना कसबा हा गॉडमदर संतोकबेन जडेजाची नगरी या नावाने प्रसिद्ध आहे.

संतोकबेन यांना गॉडमदर हे नाव का मिळालं तर त्यांच्यावर गॉडमदर नावाची बायोपिक आली होती ज्यात संतोकबेन जडेजा यांचं कॅरेक्टर शबाना आझमी यांनी साकारलं होतं. आता बायोपिक आली म्हणल्यावर काहीतरी जबऱ्या कांड नक्कीच केलं असणार तर जाणून घेऊ काय मॅटर झालेला.

संतोक बेन यांचे पती सरमन मुंजा जडेजा हे एक साधारण मिल कामगार होते. एकदा मिल कामगारांचा संप झाला तेव्हा हा संप तोडण्यासाठी मिलच्या मालकाने स्थानिक गँगस्टर देवू वाघेर याला बोलावून घेतलं.

सरमन जडेजाने थेट त्या गँगस्टरलाच मारून टाकलं आणि इथून त्याचा शहराचा नवा डॉन बनण्याचा प्रवास सुरु झाला. आसपासचा सगळा परिसर सरमन जडेजाच्या नावाने थरथर कापायचा तर दुसरीकडे संतोक बेन जडेजा या काहीच फरक न पडल्यासारखं वागायच्या आणि त्या एक साध्या गृहिणी होत्या.

1986 मध्ये स्वध्याय चळवळीच्या अंतर्गत गुन्हेगारीचा मार्ग सोडला आणि इमानदारीने काम करायला सुरुवात केली. पण आधीच सरमनने इतका बाजार उठवून ठेवलेला होता की त्याच्या दुष्मणानी त्याला एकट्यात गाठलं आणि गोळ्या घालून त्याची चाळण केली सोबतच संतोक बेन जडेजा आणि त्यांच्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मुलाबाळांच्या संरक्षणासाठी संतोक बेन यांनी जखमी वाघिणीप्रमाणे पलटवार केला आणि पतीला मारणाऱ्या खुन्यांचा बदला घेण्याचा निश्चय केला.

संतोक बेन जडेजाने हत्यार उचललं आणि आपल्या पतीची जुनी गँग एकत्र केली. काही काळातच त्यांच्या नावाची दहशत शहरभर पसरू लागली. बदल्याच्या भावनेने पिसाळलेल्या संतोक बेनने आपल्या गँगच्या मदतीने पतीला मारणाऱ्या चौदा जणांच्या हत्या केल्या.

सगळीकडे या घटनेमुळे संतोक बेन जडेजाचा उदो उदो झाला. याच लेडी गँगस्टरच्या इमेजने 1989 साली संतोक बेन यांनी निवडणूकित उडी घेतली आणि जिंकल्यासुद्धा. पोरबंदर जिल्ह्यातून जिंकून येणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या.

संतोक बेन जडेजाला पहिल्यांदा अटक करणाऱ्या पोलीस ऑफिसरच नाव होतं सतीश शर्मा. एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले होते. खंडणी असो किंवा मर्डर असो, तस्करी असो किंवा वसुली असो सगळ्या क्षेत्रात संतोक बेनचा दबदबा होता. एवढंच नाही तर पोरबंदर मध्ये होणाऱ्या रियल इस्टेट बिझनेस आणि ट्रान्सपोर्टेशन वर त्यांनी आपली पकड बसवली होती.

हेच कारण होतं की राजकारणात आल्यावर इतर राजकीय लोकांनी त्यांचं समर्थन केलं. पण गँग मधल्या लोकांवर 90 च्या दशकात संतोक बेनची पकड ढिली झाली आणि त्याच चुकीमुळे त्यांना अटक झाली.

संतोक बेनने हा खुनी खेळ फक्त पोरबंदर शहरातच ठेवला असं नाही तर अंडरवर्ल्ड सोबतसुद्धा तिचे कनेक्शन होते. करीम लालाच्या सगळ्यात जवळची महिला म्हणून तिची ओळख होती. संतोक बेनने मरण्याच्या आधी जानेवारी 2007 मध्ये 23 वर्षाच्या आपल्या पुतण्याची गोळी घालून हत्या केली होती. 2006 मध्ये आपल्याच सुनेचा जीव तिने घेतला होता. 2011 साली हृदय विकाराच्या झटक्याने संतोक बेनचं निधन झालं.

आजही संतोक बेनचा व्यवहार त्यांचा मुलगा कंधल सांभाळतो.

इतकी दहशत संतोक बेनची होती की लोकं म्हणायचे की संतोक बेनच्या घरांमधून, नाल्यांमधून रक्त पाण्यासारखं वाहायचं….

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.