अस काय आहे ‘गोकुळ’ मध्ये की, कोल्हापुरकरांना आमदारकी नको पण संचालक पद पाहीजे

सगळ्या जगाचं राजकारण एकीकडं आणि कोल्हापूरचं राजकारण एकीकडं. बाकीचे लोक मंत्रिपदासाठी, आमदारकी खासदारकीच्या तिकिटासाठी लढतात आणि कोल्हापूरकर गोकुळच्या सभेत खुर्ची मिळाली नाही म्हणून भांडत असतात. खुद्द अमित शहा मोदी आले तरी त्यांना या गोकुळच्या निवडणुकीचं गणित सुटणार नाही.

असं काय आहे या गोकुळमध्ये ज्याच्या संचालकपदाचं स्वप्न प्रत्येक कोल्हापूरकराला पडतं ?

कोल्हापूर म्हणजे पंचगंगा कृष्णा वारणा दूधगंगा या नद्यांच्या पाण्यामुळे सुपीक झालेला जिल्हा. छत्रपती शाहू महाराजांच्या आदर्श कारभारापासून  इथला शेतकरी समृद्ध झाला होता. त्यांचा वारसा पुढच्या राज्यकर्त्यांनी देखील चालवला. यशवंतराव चव्हाण वगैरे नेत्यांनी पाहिलेलं सहकाराचं स्वप्न खऱ्या अर्थाने इथे रुजलं. विशेषतः दूध क्षेत्रात.

पूर्वी महाराष्ट्र दुधासाठी गुजरातवर अवलंबून असायचा. अमूलची निर्मिती १९४६ मध्ये झाली. अख्ख्या मुंबईला दूध अमूलकडून यायचे. तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात एकच राज्य होते. मोरारजी देसाई सारखे गुजरातचे तत्कालीन नेते महाराष्ट्रात दुग्धउद्योग रुजू देत नव्हते.

साधारण १९५८ साली यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्रीपदी आले आणि महाराष्ट्राला दुधासाठी स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले. यशवंतरावाना ठाऊक होत की,

जोवर मुंबईला दूध आपल्या ग्रामीण भागातुन पोहचत नाही तोपर्यंत आपला शेतकरी गरिबीतून बाहेर येणार नाही.

१ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर तर या गोष्टीला वेग आला. यशवंतराव चव्हाणांच्या आग्रहामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अद्यावत शासकीय दुग्धालयाची निर्मिती १९६३ साली झाली. सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्ते एन. टी. सरनाईक यांनी १६ मार्च १९६३ ला या संघांची स्थापना केली. सरनाईक हे एकेकाळी राजाराम महाराज यांच्या मंत्रिमंडळात पुरवठा मंत्री होते. ते फार दूरदृष्टीचे नेते होते. पुढे याच करवीर तालुका संघाचे जिल्हा मिल्क फेडरेशन झाले. हाच गोकुळचा जन्म होता.

मात्र गोकुळ हा ब्रँड बनण्याचं खरं श्रेय जातं दिवंगत नेते आनंदराव पाटील चुयेकर यांना.

करवीर तालुक्यातील चुये या गावचे आनंदराव. सामान्य शेतकरी कुटूंब. गोठ्यातली जनावरे, तालमीत कुस्ती यातच इथली पोरं मोठी व्हायची. शाहू महाराजांमुळे ती शिकू लागली. आनंदराव देखील कोल्हापूरच्या नागोजी पाटणकर शाळेत शिकायला होते.

शाळेत असताना त्यांना रोज खेड्यातील बायका दूध, दही विकायला आलेल्या दिसायच्या. त्या उन्हा तान्हातन फिरुन विकायच्या. त्याचा मोबदलासुध्दा त्यांना मिळत नव्हता. हेच पाहिल्यानंतर आनंदराव पाटील चुयेकर यांच्या मनात दूध विक्रीसाठी काहीतरी करायला पाहीजे असा विचार आला. 

एन.टी.सरनाईक यांनी जेव्हा गोकुळची स्थापना केली तेव्हा आनंदराव त्यांच्यासोबतचे एक छोटे कार्यकर्ते होते. करवीर व आसपासच्या तालुक्यात सायकलवर फिरून घागरीतून दूध कलेक्शन केलं जायचं. तरुण संचालक असणारे आनंदराव पाटील देखील यात असायचे. सुरवातीला यात अनेक अडचणी यायच्या. यशवंतरावांनी मुंबईला दूध पुरवठ्यासाठी या संस्थेची निर्मिती केली मात्र गुजरातच्या पोल्सन आणि अमूल या संस्थांच्या तुलनेत अजून महाराष्ट्रातील दूध मुंबईपर्यंत पोहचला नव्हता.

अखेर १९७० ला आनंदराव पाटील अध्यक्ष झाले. त्यांनी एका तालुक्यापुरता मर्यादित असलेल्या या संघाचे कार्यक्षेत्र जिल्हाभर वाढविले. त्यांना दूध धंद्याचे गमक सापडले होते. त्यामुळे चुयेकर यांच्या नेतृत्वाखाली संघाची वाटचाल दमदारपणे सुरु झाली. प्रसंगी शासनाकडे आंदोलन करत त्यांनी दुधाचे दर वाढवले. 

आनंदराव पाटील चुयेकर म्हणजे रांगडे व्यक्तिमत्व. त्यांच शिक्षण खूप नव्हतं मात्र काळ्या मातीतून आले असल्यामुळे व्यवहार कळत होता. यातूनच त्यांनी गावागावात लोकांपर्यंत पोहचून त्यांनी गोकुळ जिल्ह्यात रुजवला. याच काळात जिल्ह्यात अनेक दूधसंस्था आकार घेत होत्या मात्र चुयेकरांनी राखलेली गुणवत्ता आणि परिश्रम यामुळे गोकुळला जिल्ह्यातील दुधाची शिखर संस्था म्हणून मान्यता मिळवून दिली.

देशात दुग्धक्रांतीचे श्रेय वर्गीस कुरियन यांना दिले जाते. अमूलप्रमाणे क्रांती महाराष्ट्रात व्हावी असं तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं स्वप्न होतं. राष्ट्रीय दूग्धविकास मंडळाशी त्यांची चर्चा सुरु होती. सांगलीमध्ये दूध महापूर योजना सुरु व्हावी म्हणून वसंतदादा प्रयत्न करत होते.

पण एकदा खुद्द वर्गीस कुरियन पश्चिम महाराष्ट्राच्या भेटीला आले. तेव्हा पाहणी करताना त्यांना कोल्हापूरच्या गोकुळमध्ये अमूल प्रमाणे मोठे होण्याची क्षमता आहे हे ओळखलं. हिंदी इंग्रजी बोलता येत नसूनही आनंदराव चुयेकर पाटील यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद कुरियन यांना प्रभावित करून गेला. 

त्यांनीच जळगाव नंतर दूध महापूर योजना कोल्हापूरला मंजूर केली. यानंतर गोकुळचे भवितव्यच बदलून गेले .

आता जिथे संघाचे मुख्यालय आहे तिथे सरकारी डेअरी होती. डॉक यार्ड होते. जिल्ह्यांतून दूध संकलन करून ते मिरजेला पाठविले जाई. व मिरजेतून ते मुंबईला पाठविले जाई. तिथे ‘आरे’ या ब्रॅन्डनेमने ते विकले जाई. चुयेकर यांच्या प्रयत्नांतून सरकारी डेअरीही जिल्हा संघात विलीन झाल्यामुळे ताराबाई पार्कातील जागा गोकुळला मिळाली.

१९८१-८२ साली संघात पहिली निवडणूक झाली. त्याच वर्षी शिरगाव येथे २५ एकर जागा घेण्यात आली. या डेअरीच्या उदघाटनाच्या दिवशी आनंदराव पाटील चुयेकर बोलून गेले,

“आजपासून आपल्या गावागावात गोकुळ नांदेल.”

याच भाषणानंतर कोल्हापूर दूध संघाला गोकुळ हे नाव मिळालं. आता आरे नाही स्वतःच्या गोकुळ या ब्रान्ड नेम खाली कोल्हापूरचं दूध मुंबईमध्ये विकलं जाऊ लागलं. यशवंतरावांपासून ते वसंतदादांपर्यंत अनेकांनी पाहिलेलं श्वेतक्रांतीचं स्वप्न कोल्हापुरात प्रत्यक्षात साकार झालं.

फक्त मराठी बोलू शकणारे आनंदराव चुयेकर पाटील युरोपला जाऊन गोकुळची यशोगाथा आपल्या व्याख्यानातून सांगून येऊ लागले. 

गोकुळच्या माध्यमातून चुयेकर यांचा जिल्ह्याच्या राजकारणातही दबदबा तयार झाला. सहकारातील एक चांगला कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली व त्यातून त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला धुमारे फुटले. त्यातून त्यांनी एक मोठी उडी घेतली व तत्कालीन सांगरुळ विधानसभा मतदार संघातून १९९० च्या निवडणूकीत अपक्ष म्हणून चक्क तत्कालीन बडे नेते श्रीपतराव बोंद्रे यांनाच आव्हान दिले. या निवडणुकीत आनंदरावांचा पराभव झाला.

इथेच त्यांच्या गोकुळच्या सत्तेला देखील हादरे बसले.

असं म्हणतात की गोकुळच्या दूध वाहतूकीचा सगळा ठेका द्या अशी मागणारी करणारे महादेवराव महाडिक चुयेकरांनी त्यांना नकार दिल्या मुळे दुखावले होते. सगळे मी तुमचे ऐकणार नाही व मला इतर कार्यकर्त्यांनाही ही संधी द्यायला हवी असे चुयेकर यांचे म्हणणे होते. महादेवराव महाडिकांनी चुयेकरांची सत्ता हटवण्यासाठी आकाशपाताळ एक केलं.

पण निवडणुकीच्या पराभवानंतर चुयेकर यांचं अध्यक्षपद गेलं आणि संघाची सुत्रे अरुण नरके यांच्याकडे आली तेथून पुढे सलग दहा वर्षे ते संघाचे अध्यक्ष राहिले. या काळातच महादेवराव महाडिक संघाचे नेते बनले. संघातील सगळा व्यवहार त्यांच्या हातात आला.

आजही गोकुळची सत्ता महादेवराव महाडिक यांच्याच हातात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १२२० गाव आहेत. यात ४८०३ दूध सहकारी संस्था. या संस्थेतून रोज दूध गोकुळ ला येत. हे पाठवण्यासाठी संघाकड आता ९० टँकर आहेत. नूस्त्या मुंबईतच पाच लाख लीटरच्या पुढ विक्री आहे. दूध संघाचा आर्थिक डोलारा खूप मोठाय. मागच्या वर्षीची वार्षिक उलाढाल २३८२ कोटींचा आहे. संघात कर्मचारी २००० च्या पुढ काम करतात. 

आज महाराष्ट्रात एक नम्बर आणि देशात अमूलच्या खालोखाल गोकुळ जाऊन पोहचलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा गोकुळ शी संपर्क आहेच. गोकुळ मधूनच जास्त आर्थिक गणित आहे. गावातील पतसंस्था आहेत त्यांच सगळ आर्थिक गणित हे गोकुळवर अवलंबून असत. एखाद्या शेतकऱ्याला कर्ज घ्यायच असल तरी गोकुळ चा संचालक महत्वाचा असतो. त्यामुळे संचालकांचं ग्रामीण भागातील लोकांचा चांगलाच संपर्क असतोय.

गोकुळच्या संचालकांकडूनच जिल्ह्याच राजकारण चालत असत.

त्यामुळे गोकुळच्या संचालक पदासाठी अनेकजण इच्छुक असतात. जिल्ह्यातील जिल्हा परिषदे पासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत गोकुळ चा संचालक महत्वाचा मानला जातो. ज्या संचालकांचा उमेदवाराला पाठिंबा असतो त्या उमेदवाराचा विजय मानला झाला अस मानल जात. यामुळेच तर गोकुळचे संचालक जिल्ह्याच राजकारण चालवतात अस बोलल जात.

महादेवराव महाडिक यांच्या गोकुलमधल्या सत्तेला धडक देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. गेल्या काही वर्षांपासून गृहराज्यमंत्री सतेज पाटील प्रयत्न करत आहेत. गोकुळच्या सभांना ते स्वतः उपस्थितीत राहून विचारलेली प्रश्ने राज्यभरात ब्रेकिंग न्यूज बनतात. एका सहकारी संस्थेच्या सभासदांची सभा विधानसभेच्या अधिवेशनापेक्षाही जोरदार गाजते हेच कित्येकांसाठी धक्कादायक आहे.

कोल्हापूरच्या गावागावात विकासाची दुधगंगा वाहणारे गोकुळ आज पुण्यामुंबईच्या चाकरमानी लोकांना जगवतंय, इतकंच नाही तर फक्त कोल्हापूरचा नाही तर महाराष्ट्राचा ब्रँड म्हणून जगात आपला डंका वाजवतंय हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.