मासपासून मारीपर्यंत आपली भावकी साऊथशी जोडली गेली, ती गोल्डमाईन्स टेलीफिल्म्समुळेच
हल्लीच्या पोरांना हॉलिवुड पिक्चरचं भारी ॲट्रॅक्शन असतंय. हल्लीच काय, पूर्वी पण असायचं. पण हे हॉलिवुडवाले फाड फाड इंग्रजीत भरकन काय बोलायचे कधी कळायचं नाय. मग सबटायटलचे चोचले सुरू झाले. पण खरी मजा यायची ती एखादा गोरा, सोनेरी केसवाला पोरगा इंग्लिश सोडून हिंदी किंवा मराठी बोलायचा तेव्हा. ही कमाल असायची डबिंगची.
हा, आता त्यांचे उच्चार आणि हावभाव भाषेशी मॅच व्हायचे नाहीत, फीलही द्यायचे नाहीत पण त्यांचं म्हणणं काय आहे ते तर समजायचं… आणि त्यातच आपण समाधान मानायला लागलो…
पुढं आपल्याला हॉलिवुडपेक्षा जास्त येड लागलं ,ते दाक्षिणात्य पिक्चरचं. मास, अल्लू अर्जुन, मेरी जंग वन मॅन आर्मी, मारी, इंद्रा द टायगर, कॉमेडी करणारा ब्रह्मानंदम हे आपल्या घरातले कार्यकर्ते झाले. आता आपल्यापैकी फार कमी जणांना दाक्षिणात्य भाषा येतात, पण पिक्चरचं, त्यातल्या लव्हस्टोरीचं आणि खुंखार हाणामारीचं आपल्या सगळ्यांना येड लागलं त्यामागचं कारण होतं, डबिंग.
कधीकधी हे डबिंग कॉमेडी वाटायचं, पण मजा यायची. एकदा पिक्चर बघता बघता प्रश्न पडला की, हे डबिंग कोण करत असेल..? उत्तर झटक्यात सापडलं.
भारतात अशी एक कंपनी आहे, जी टॉलीवुडच्या पिक्चरचं डबिंग करून रग्गड पैसा कमावते. पार २००४ साली आलेल्या मास पिक्चरपासून आत्ताच्या पुष्पापर्यंत अनेक तेलगू-तमिळ चित्रपटांचं डबिंग या कंपनीनंच केलंय, आणि या कंपनीचं नाव आहे गोल्डमाईन्स टेलीफिल्म्स.
CONTENT IS KING, BUT DELIVERING CONTENT IS EMPEROR.
म्हणजेच कंटेंट तर बाप असायलाच पाहिजे, पण तो जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचणं त्याहूनही जास्त महत्वाचं असतं. हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेऊन गोल्डमाइन्स टेलीफिल्म्सनं २००० साली सुरुवात केली. सुरुवातीला गोल्डमाईन्स टेलीफिल्म्सचा मेन उद्देश काय होता, तर हिंदी चित्रपटांचे संपूर्ण राइट्स म्हणजेच निगेटिव्ह राइट्स आपल्याकडे ठेवणं आणि ते सॅटेलाईट टेलिव्हिजन चॅनेल्सवर ब्रॉडकास्ट करणं.
यात गोल्डमाइन्स गेली अनेक वर्ष काम करत होती. पण नंतर कंपनीचे संस्थापक मनीष शाह यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, बॉलीवूडचा कल आता वास्तववादी सिनेमे दाखवण्याकडे वळतोय आणि यामुळे टिपिकल ॲक्शनपॅक्ड आणि मसाला असणाऱ्या सिनेमांची प्रेक्षकांना अनेक वर्षांपासून लागलेली चटक पूर्ण होत नाहीये.
ॲक्शन फिल्म्स टॉलिवुडमध्ये बनत होत्या, पण त्या असायच्या तमिळ आणि तेलगू भाषेत. अर्ध्याहून अधिक प्रेक्षकांना या भाषा समजणाऱ्याच नव्हत्या, म्हणूनच मनीष शाह यांनी हे भाषेचं बॅरियर तोडण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी डबिंगच्या दुनियेत पाऊल टाकलं ते २००७ साली, मास या सिनेमातून.
साधारण याच सुमारास सिंगल स्क्रीन थिएटर्सची जागा मल्टिप्लेक्सनं घेतली होती आणि मसालापट बनवणारे निर्मातेही मल्टीप्लेक्सवर गाजतील असे सिनेमे बनवायला लागले आणि यामुळेच २००५ सालापासूनच ॲक्शन फिल्म्सचा तुटवडा जाणवायला लागला.
नेमकं याच वेळी मनीष शाह यांनी ३-४ सिनेमांवर एक सेफ गेम खेळला.
चिरंजीवी, नागार्जुन, रजनीकांतसारख्या टॉलिवुड आणि बॉलिवुड गाजवलेल्या स्टार लोकांचेच सिनेमे डब करून त्यांनी प्रेक्षकांसमोर आणले. नेहमी हीट असणारे चेहरे स्क्रीनवर दिसतायत म्हटल्यावर लोकं हमखास सिनेमा बघायची आणि त्यामुळे हिंदी डब्ड साऊथ फिल्म्स हीट व्हायला लागल्या.
त्यावेळी ७ लाख रुपयांना विकत घेतलेल्या मास या सिनेमाची कमाई आज २० कोटींच्या घरात आहे.
डब केलेल्या साऊथच्या सिनेमांचं ८० टक्के मार्केट तर आता गोल्डमाइन्स टेलिफिल्म्सनंच खाल्लंय. डब केलेले चित्रपट टीव्ही चॅनलवर किंवा गोल्डमाइन्सच्या युट्युब चॅनेलवर तर हीट होतातच, पण पुढं त्यांनी या डब साऊथ सिनेमांच्या थिएटर रिलीजलाही सुरवात केली. यात दोन महत्वाच्या आणि मोठ्या सिनेमांचं नाव घेता येईल, ते म्हणजे बाहुबली आणि नुकताच आलेला पुष्पा.
एका मुलाखतीत मनीष शाह सांगतात, ‘डब्ड फिल्म्स काढण्यासाठी सिनेमांचं सिलेक्शन तगडं असायला लागतं, लोकांची आवड-निवड लक्षात घ्यावी लागते.’ मनीष शाह यांचा फोकस हा कायम तमिळ आणि तेलगू चित्रपटांवरच जास्त असतो. कारण त्यांच्या मते मल्याळम सिनेमे बऱ्यापैकी इंटेलेक्चुअल म्हणजेच डोकेफोडीचे असतात. अशावेळी तेलगू आणि तमिळ सिनेमांमधला एक्स फॅक्टर आणि मसाला लोकांना भावणारा असतो.
डबिंगची प्रोसेस पिक्चर पाहण्यापासून सबटाइटल्स वाचून नोट्स काढण्यापर्यंत चालते, पिक्चर कुठल्या भाषेसाठी डब केला जातोय ते पाहून कंटेंट जास्तीत जास्त आपला वाटण्यासाठी डायलॉग्समध्ये थोडेफार बदलही केले जातात.
आज गोल्डमाइन्स टेलीफिल्म्सच्या लायब्ररीत हजारहून जास्त पिक्चरचे टायटल्स आहेत ज्यात, हिंदी, गुजराती, मराठी आणि डब केलेल्या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे.
२०२० साली गोल्डमाइन्स टेलीफिल्म्सनं डब केलेल्या साऊथ इंडियन फिल्म्स साठी ‘Dhinchaak TV’ आणि १९६० ते २००० सालातले बॉलिवुड सिनेमे दाखवण्यासाठी ‘Dhinchaak 2’ अशी दोन टीव्ही चॅनेल्सही सुरू केली. शिवाय त्यांचं ‘Goldmines’ नावाचं एक युट्यूब चॅनलही आहे, ज्यावर त्यांना तब्बल ६७.६ मिलीयन सबस्क्राइबर्स आहेत.
थोडक्यात काय तर डबिंगच्या दुनियेत गोल्डमाईन्स टेलीफिल्म्स म्हणजे थलैवा आहे, हे नक्की.
हे ही वाच भिडू:
- ना मराठी, ना बॉलिवूड बॉक्स ऑफिसचं गणित फक्त तेलगू पिक्चरानांच कळलंय
- साऊथ पिक्चरचा ‘मास’ आज घडीला ३ हजार कोटींचा मालक आहे…
- नीट आठवून सांगा किती पिक्चरमध्ये बॅकग्राऊंडला आंबेडकरांचा फोटो आणि हिरो दलित बघितलाय